मराठी साहित्य आणि प्रकाशन व्यवसायात आपली स्वत:ची स्वतंत्र नाममुद्रा उमटविणाऱ्या मौज प्रकाशन संस्थेचे भागवत बंधू अर्थात वि. पु आणि  श्री. पु या सख्ख्या काकांचे संस्कार आणि विचार ज्यांना मिळाले, अभिनेता हा उच्चशिक्षित नसतो हा समज ज्यांनी खोटा ठरविला, प्रसंगी अभिनयापासून दूर होऊन ज्या विषयात पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले त्याकडे ‘व्यवसाय’ म्हणून पुन्हा वळले आणि ज्या एका मालिकेमुळे मोठी प्रसिद्धी मिळाली ते ज्येष्ठ अभिनेते आणि ‘नुक्कड’ लोकप्रिय मालिकेतील ‘घन्शू’ आजच्या ‘पुनर्भेट’चे मानकरी आहेत.

भागवत कुटुंबीय मूळचे कोकणातील देवरुख गावचे. शालेय शिक्षण गावातीलच न्यू इंग्लिश स्कूलमध्ये तेव्हाची दहावी म्हणजे ११ वी मॅट्रिकपर्यंत झाले. पुढील शिक्षणासाठी ते मुंबईला आले. ‘रचना संसद’ महाविद्यालयातून त्यांनी ‘आर्किटेक्चर’ची पदवी संपादन केली. शाळेत किंवा दादरच्या सहकार निवासमध्ये राहात असताना स्नेह संमेलनात त्यांनी नाटकातून काम केले होते. पण पुढे नाटकच करायचे असे त्यांच्या डोक्यात नव्हते. ते योगायोगाने नाटकाकडे ओढले गेले.

out there screaming book
बुकबातमी: ‘भयप्रेमीं’साठीचा दस्तावेज..
Nita ambani in paithani
Video: पैठणी, चंद्रकोर अन् मराठमोळा साज! NMACC च्या वर्षपूर्ती कार्यक्रमात नीता अंबानी मराठीत म्हणाल्या…
devendra fadnavis said maha vikas and india aghadi are break engine public do not trust
इंडिया आघाडी म्हणजे तुटलेले इंजिन, देवेंद्र फडणवीसांनी उडवली खिल्ली…..
juna furniture teaser released by salim khan
ज्येष्ठ नागरिकांचा सहानुभूतीने विचार करायला हवा

त्याबाबतच्या आठवणींना उजाळा देताना भागवत म्हणाले, ‘रचना संसद’मध्ये असताना एकदा ग्रंथालयात पुस्तक बदलायला गेलो होतो. आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेसाठी ‘ऑडिशन’ सुरू होती. ‘पुलं’चे भाऊ आणि अभिनेते-दिग्दर्शक रमाकांत देशपांडे ऑडिशन घेत होते. मला पाहिल्यानंतर काय रे, नाटकात काम करणार का? अशी विचारणा त्यांनी मला केली आणि मी हो म्हटले. रीतसर ऑडिशन देऊन माझी निवडही झाली. भवन्स महाविद्यालयाच्या आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेसाठी सादर केलेल्या गंगाधर गाडगीळ लिखित ‘बंडू, नानू आणि गुलाबी हत्ती’ या एकांकिकेत ‘बंडू’ ही मुख्य भूमिका मी केली. त्या भूमिकेसाठी मला ‘उत्कृष्ट अभिनेता’ असे पारितोषिकही मिळाले आणि त्याच वेळी आपण ‘नाटक’ करायचे मी नक्की केले.

योगायोगाने पुढे तशी संधीही मला मिळाली. विजय तेंडुलकर एकदा आमच्या काकांच्या म्हणजे श्रीपुंच्या ‘मौज’ कार्यालयात आले होते. त्यांनी सुरेश नाटकात काम करेल का, असे विजया मेहता यांनी विचारले असल्याचे सांगितले. माझ्यासाठी ती मोठी संधी होती. कारण त्या अगोदर विजयाबाईंनी स्पर्धेतील एकांकिकेत काम केलेल्या एका मुलीला त्यांच्या ‘मी जिंकलो, मी हरलो’ या नाटकात संधी दिली होती. आपल्यालाही विजयाबाईंकडे काम करायला कधी मिळेल, असा विचार तेव्हा माझ्या मनात आला होताच आणि ती संधी मिळाली. स्पर्धेसाठी तेंडुलकर यांचे ‘कावळ्यांची शाळा’ हे नाटक केले. ‘आर्किटेक्टचर’चे शिक्षण घेत असतानाच हे सुरू होते. १९६५ मध्ये ‘आर्किटेक्चर’ची अंतिम परीक्षा दिली. निकाल लागल्यानंतर पुढची दोन वर्षे मुंबईतच नोकरी केली. नंतर परदेशात नोकरी करून अनुभव मिळवावा म्हणून संधी मिळताच मी इंग्लंडला गेलो. तिथे नोकरी करत असतानाच एकीकडे ‘इंडट्रियलाइज् हाऊजिंग’या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. तिथे नोकरी आणि ‘नाटक’ही सुरूच होते. १९७०-७१ मध्ये भारतात परतलो आणि पुन्हा ‘रंगायन’शी एकांकिका, नाटकाद्वारे जोडला गेलो.

‘रंगायन’मध्ये असताना भागवत यांना दोन चांगल्या संधी आल्या. ‘रंगायन’मध्ये असताना दुसरीकडे कसे काम करायचे? या विचारातून त्यांनी नाही म्हटले. अभिनेते-दिग्दर्शक दामू केंकरे ‘तुज आहे तुजपाशी’ नाटकात ‘शाम’ची भूमिका करत होते. त्यांनी भागवत यांना, मी या भूमिकेत शोभत नाही असे मला वाटते. ही भूमिका तू करशील का? अशी विचारणा केली होती. बाळ कोल्हटकर यांच्या ‘वाहतो ही दुर्वाची जुडी’ या नाटकात काम करण्याची संधी आली होती. पण भागवत यांनी तीही नाकारली. ‘कलाकाराला एखादी चांगली भूमिका मिळत असेल तर ती साकारायची संधी कधीही सोडायची नाही’, असे  दामू यांनी त्यांना समजाविले होते.

पुढे ‘रंगायन’चेही विभाजन झाले. अरविंद देशपांडे यांनी ‘आविष्कार’ची स्थापना केली. ‘आविष्कार’च्या ‘शांतता कोर्ट चालू आहे’नाटकात एका कलाकाराच्या गैरहजेरीत त्याचे काम करण्याबाबत विचारणा झाली आणि भागवत यांनी ती संधी सोडली नाही. त्याच सुमारास अभिनेते अमोल पालेकर व भागवत यांची भेट झाली. ते ‘चल रे भोपळ्या टुणुक टुणुक’ हे नाटक दिग्दर्शित करणार होते. पालेकर यांनी या नाटकासाठी भागवत यांना विचारणा केली आणि त्यांनी होकार दिला. अच्युत वझे लिखित या नाटकात भागवत यांच्यासह दिलीप कुलकर्णी, सुबोध गाडगीळ, अरुंधती मुर्डेश्वर आदी कलाकार होते. १९७३ मध्ये राज्य नाटय़ स्पर्धेत हे नाटक दुसरे आले. स्पर्धेच्या प्राथमिक आणि अंतिम फेरीत भागवत यांना नाटकातील भूमिकेसाठी ‘उत्कृष्ट अभिनेता’ म्हणून पुरस्कारही मिळाला. पुढे या नाटकाचे काही प्रयोग सादर झाले. रवींद्र नाटय़ मंदिरात झालेल्या स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी हिंदीतील अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रयोग झाल्यानंतर कबीर बेदी आतमध्ये आले आणि त्यांनी भागवत यांना चक्क कडेवर उचलून घेतले. उंच व धिप्पाड असलेल्या बेदी      यांनी मला अगदी सहज उचलून घेतले, ते दृश्यच मजेदार होते, अशी आठवण भागवत यांनी सांगितली. सई परांजपे लिखित ‘जास्वंदी’नाटकात विजया मेहता, दिलीप कोल्हटकर, विक्रम गोखले, विमल जोशी, दिलीप कोल्हटकर यांच्यासह भागवतही होते. माधव वाटवे यांनी विजयाबाईंना सुरेशला या नाटकात का घेत नाही. तो ही भूमिका चांगली करेल, असे  सुचविले होते. नाटकात दोन बोक्यांच्या भूमिकेत भागवत व दिलीप कोल्हटकर होते. हे नाटक व भागवत यांची भूमिका गाजली. पं. भीमसेन जोशी यांच्या सारख्या दिग्गज गायकाकडून ‘जास्वंदी’ व ‘चल रे भोपळ्या’ मधील तुझे काम पाहिले आहे, छान. अशी शाबासकी मिळाल्याची आठवणही भागवत यांनी मनाच्या कुपीत जपून ठेवली आहे.

मुंबई दूरदर्शनसाठी ‘गजरा’, ‘मराठी नाटक’ आणि अन्य अनेक कार्यक्रम त्यांनी केले.

भागवत यांच्या आयुष्यात ‘नुक्कड’ मालिकेला महत्त्वाचे स्थान आहे. या मालिकेतील ‘घन्शू भिकारी’ या भूमिकेने त्यांना अमाप प्रसिद्धी, यश दिले आणि नुकसानही केले असे ते सांगतात. ते म्हणाले, अझिज आणि सईद मिर्झा तेव्हा ‘नुक्कड’ची जुळवाजुळव करत होते. मालिकेतील विविध भूमिकांसाठी सुमारे २०० कलाकारांना ‘ऑडिशन’साठी बोलाविण्यात आले होते. ‘ऑडिशन’ दिली आणि ‘नुक्कड’मधील ‘घन्शू भिकारी’ या भूमिकेसाठी माझी निवड झाली. लेखनात ‘घन्शू ’ दोन/चार भागातच होता. प्रत्यक्ष चित्रीकरणाला सुरुवात झाली आणि ते भाग पाहून मिर्झा बंधूंनी ‘घन्शू ’सह गणपत हवालदार, खोपडी, दगडू ही पात्रे मालिकेच्या प्रत्येक भागात असतील असे नक्की केले. या मालिकेने इतिहास घडविला. मालिकेला आणि आम्हा कलाकारांना अमाप लोकप्रियता मिळाली. आमच्या मूळ नावाऐवजी मालिककेतील भूमिकेच्या नावाने आम्ही ओळखले जाऊ लागलो. इतक्या वर्षांनंतरही त्यात बदल झालेला नाही. महाराष्ट्रात, देशात व परदेशातही ‘घन्शू ’ लोकप्रिय झाला, प्रेक्षकांना आवडला. एखाद्या भूमिकेत कोणताही कलाकार लोकप्रिय झाला की त्याला त्याच प्रकारच्या भूमिका मिळतात. माझ्याही बाबतीत तेच झाले. ‘घन्शू ’ प्रकारच्याच भूमिका मिळत गेल्या. ‘नुक्कड’ व माझी भूमिका लोकप्रिय झाली, मला प्रसिद्धी, यश मिळाले असले तरी अभिनेता म्हणून मला त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका करता आल्या नाहीत. माझ्या अभिनयाला वाव मिळेल, तो प्रेक्षकांपुढे येईल अशा भूमिका मिळाल्या नाहीत याची मनात खंत आहे.

‘नुक्कड’मुळे त्यांचा बॉलीवूडमध्ये प्रवेश झाला. देव आनंद, अमिताभ बच्चन (शहेनशहा) यांच्याबरोबर भागवत यांना काम करण्याची संधी मिळाली. ‘अर्धसत्य’, ‘आक्रोश’, ‘घातक’, ‘चलते चलते’, ‘मेरे दो  अनमोल रतन’, ‘खिलाडी’, ‘इंग्लिश बाबू देसी मेम’, ‘फिर भी दिल है हिंदुस्तानी’, ‘अंदाज अपना अपना’, ‘ठिकाना’ आदीहिंदी चित्रपटांतही त्यांचा सहभाग होता. ‘एतराज’ हिंदी चित्रपटात मोठी, ‘लव्ह के लिए कुछ भी करेगा’ या चित्रपटात मुख्य खलनायकाची त्यांची भूमिका होती. पण चित्रपट जेव्हा पडद्यावर आले तेव्हा आपल्या भूमिकांना कात्री लावण्यात आल्याचे त्यांना कळून चुकले. अशा उद्विघ्न करणाऱ्या अनुभवामुळे त्यांनी यापुढे चित्रपट करायचे नाहीत असा निर्णय घेतला आणि ते पुन्हा आपल्या मूळ व्यवसायाकडे वळले. हिंदी चित्रपटांबरोबरच ‘इंतजार’, ‘उम्मीद’, ‘मनोरंजन’ आदी हिंदी मालिकाही त्यांच्या नावावर जमा आहेत. ‘गुपचूप गुपचूप’ या आणि अन्य काही मराठी चित्रपटांतूनही त्यांनी काम केले आहे.

एक मुलगी, जावई आणि नातवंडे असा त्यांचा परिवार. २००९ मध्ये भागवत यांच्या पत्नीचे निधन झाले. भागवत यांची मुलगी, जावई दोघेही डॉक्टर असून ते परदेशात स्थायिक आहेत. ‘बाबा तुम्ही मुंबईत-पुण्यात एकटे राहू शकता. पण कधी वेळ प्रसंग आला तर आम्हाला पटकन तुमच्याकडे येता येणार नाही. त्यामुळे तुम्ही आमच्याकडेच राहायला या’ असा मुलगी व जावयाचा प्रेमळ हट्ट असतो. पण कायमचे तिकडे येऊन राहणे मलाही आवडणार नाही. त्यामुळे काही महिने तुझ्याकडे व काही महिने मुंबई-पुण्यात मी राहेन, असे त्यांनी दोघांना सांगितले आहे. त्याप्रमाणे ते दोन्हीकडे येऊन-जाऊन असतात.

प्रमोद पवार दिग्दर्शित ‘ट्रकभर स्वप्ने’ या आगामी मराठी चित्रपटात त्यांनी अलीकडेच काम केले. चित्रपट अद्याप प्रदर्शित झालेला नाही. शेखर ढवळीकर लिखित ‘के दिल अभी भरा नही’ या नाटकाची परदेशातील संस्कृतीशी सांगड घालून, तेथील ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न मांडून आणि तेथील स्थानिक कलाकारांना घेऊन हे नाटक इंग्रजीत करण्याचा त्यांचा मानस आहे.

मुंबई-पुण्यात असले की चांगली नाटके पाहतो, साहित्य-सांस्कृतिक कार्यक्रम, संगीत मैफलींना उपस्थित राहतो, ललित साहित्याचे वाचनही करतो. हा माझा सध्याचा विरंगुळा आहे. ‘आर्किटेक्ट’विषयात मी आजही जमेल तसा वेळ देतो, काम करतो. त्यामुळे मी सतत गुंतून राहतो. मलाही त्यातून समाधान व आनंद मिळतो, असे भागवत यांनी गप्पांचा समारोप करताना सांगितले.