त्यांनी कथ्थक, भरतनाटय़म्चे प्रशिक्षण घेतले होते. नृत्याचे कार्यक्रमही त्या करत होत्या. सितारादेवी, गोपीकृष्ण, मंजुश्री बॅनर्जी, रोशनकुमारी यांच्याप्रमाणे त्यांना शास्त्रीय नृत्यांगना  व्हायचे होते. पण नियतीने त्यांच्या बाबतीत काही वेगळेच योजिले होते. पुढे नृत्य सुटले ते सुटलेच. मराठी रंगभूमी व चित्रपटातून त्यांचा अभिनय प्रवास सुरू झाला आणि त्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. सोज्वळ, शालीन चेहरा आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व लाभलेल्या व मराठी रसिकांच्या हृदयात अढळ स्थान मिळविलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे-नाईक आजच्या ‘पुनर्भेट’च्या मानकरी आहेत.

नियती काही गोष्टी ठरवते आणि त्या तशाच घडतात. जे घडायचे ते घडते. नियतीवर त्यांचा विश्वासही आहे. नृत्याचे शिक्षण घेतले असल्याने केवळ नृत्याचे कार्यक्रम करायचे. रंगभूमी किंवा चित्रपटात काम करायचे नाही असे त्यांनी ठरविले होते. पण पुढे याच नियतीमुळे ‘अभिनय’ हाच त्यांचा श्वास बनला.

mugdha godbole shared angry post after kshitee jog receiving negative comments
“मंगळसूत्र घालावं की नाही?”, क्षिजी जोगच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या गलिच्छ कमेंट्स, प्रसिद्ध अभिनेत्री संतापून म्हणाली…
Amar Singh Chamkila first wife recalls their final meeting
“त्यांनी अमरजोतशी लग्न केलं, पण…” अमरसिंग चमकीलांच्या खुनाबद्दल पहिल्या पत्नीचं विधान; म्हणाल्या, “मला त्यांचा खूप…”
kalyan lok sabha seat, dr Shrikant Shinde, criticise uddhav thackeray, criticise vaishali darekar, lok sabha 2024, mimicry artist, uddhav thackeray mimicry artist, uddhav thackeray shivsena, eknath shinde shivsena, kalyan dombivali news, election 2024,
बॉस नकलाकार असला की कार्यकर्तेही नकलाकारच असतात, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची वैशाली दरेकर यांच्यावर टीका
amruta khanvilkar
‘नवनव्या भूमिकांचे आव्हान स्वीकारण्यात आनंद’

आशा काळे मूळच्या कोल्हापूरच्या. त्यांचा जन्म गडहिंग्लजचा. वडील रामकृष्ण ऊर्फ रावसाहेब काळे हे वनाधिकारी होते. शासकीय नोकरी असल्याने बदली ठरलेली. आई, वडील, मोठा भाऊ, धाकटी बहीण असे त्यांचे कुटुंब. रत्नागिरी, पाली, भोर, पुणे, कोल्हापूर अशा विविध ठिकाणी त्यांचे बालपण गेले. शाळाही त्यामुळे वेगवेगळ्या झाल्या. लहानपणापासून त्यांना नाटक किंवा चित्रपटाची आवड नव्हतीच. नृत्याची विशेष आवड असल्याने बाळासाहेब गोखले आणि हजारीलाल यांच्याकडे त्यांनी शास्त्रीय नृत्याचे (भरतनाटय़म्, कथ्थक) धडे घेतले. आठ-दहा वर्षांच्या असताना त्यांचे नृत्याचे कार्यक्रमही होत असत. आईचे मामा आप्पासाहेब इनामदार (अभिनेते प्रकाश इनामदार हे आशा काळे यांचे मामेभाऊ) यांच्या ‘कलासंघ’ संस्थेतही त्यांनी काम केले.

त्या वेळच्या आठवणींना उजाळा देताना त्यांनी सांगितले, माझ्या वडिलांना ज्योतिषाचीही थोडी जाण होती. माझा जन्म अमावास्येचा आणि शनिवारचा. त्यामुळे आई, घरचे काही नातेवाईक आणि परिचित यांच्यात माझ्या भविष्याबाबत चर्चा व्हायची. वडिलांनी माझी पत्रिका मांडून ही कलाकार होणार असे भविष्य तर जोशी नावाच्या आमच्या परिचित विद्वान गृहस्थांनी ‘अमावास्येची पोर सर्वाहुनी थोर’ असे माझ्याबद्दल सांगितले होते. घरातील वातावरण बाळबोध असल्याने नाटक, चित्रपटात काम करणे हा दूरचाच भाग  होता. पण म्हणतात ना नियती काही ठरविते आणि तसे घडते. माझ्याही बाबतीत तेच झाले.

१९६२ मध्ये भारत-चीन युद्धाच्या वेळी देशाच्या संरक्षण निधीसाठी मदत म्हणून व्ही. शांताराम, बाबुराव पेंढारकर यांनी ‘शिवसंभव’ या नाटकाची निर्मिती केली होती. या नाटकात निजामशहाच्या दरबारातील एका प्रसंगात नर्तकीच्या भूमिकेसाठी ते मुलीचा शोध घेत होते. माझ्या वडिलांचा आणि पेंढारकर यांचा परिचय. पेंढारकर आमच्या घरी आले आणि आमच्या नाटकात तुमची मुलगी काम करेल का? असे विचारले. आशा भोसले यांनी गायलेल्या ‘गुलाबी ऑंखे है तेरी’ या ठुमरीवर मला नृत्य करायचे होते. आई-वडिलांनी परवानगी दिल्यामुळे नाटकात नर्तकी म्हणून मी काम केले. स्वत: बाबुराव पेंढारकर, बाळ कोल्हटकर आदी ज्येष्ठ कलाकार नाटकात होते. माझे नृत्य झाले की मी विंगेत येऊन बसायचे आणि पुढचे नाटक पाहायचे. एका प्रयोगाच्या वेळी  नाटकातील डोहाळजेवणाच्या प्रसंगात काम करणाऱ्या एक अभिनेत्री आल्या नाहीत. त्यामुळे ऐनवेळी केवळ गंमत म्हणून ते काम मी केले. त्यावेळी मी अवघी १४/१५ वर्षांंची होते. त्या नाटकाचे पुढे १५ ते २० प्रयोग केले. माझ्यातील नृत्य आणि अभिनय कला बाबुराव पेंढारकर यांनी पाहिली आणि ‘नाटय़ मंदिर’ संस्थेच्या (बाळ कोल्हटकर आणि बाबुराव पेंढारकर यांची भागीदारीतील ही संस्था होती) ‘सीमेवरून परत जा’ या नाटकातील भूमिकेसाठी विचारणा केली. पौगंडावस्थेतील नायिका मला त्यात साकारायची होती. माझ्यासाठी आणि आईसाठीही तो धक्काच होता. खरे तर मला नाटकात काम करायचे नव्हते. मुंबईला जाण्यापूर्वी मी आमच्या कोल्हापूरच्या अंबाबाईच्या देवळात गेले आणि देवीला त्यांनी मला नापास करू दे. तुला खडीसाखर ठेवेन’, असे साकडे घातले. पण देवीने आणि नियतीने वेगळेच ठरविले असावे. ‘सीमेवरून परत जा’ नाटकातील नायिकेच्या भूमिकेसाठी माझी निवड झाली. व्यावसायिक रंगभूमीवरचे ते माझे पहिले नाटक. याचे दिग्दर्शक आत्माराम भेंडे होते. नाटकात माझ्या नृत्यकलेला वाव मिळावा म्हणून दोन गाणीही होती. या नाटकापासून माझा रंगभूमीवरील प्रवास सुरू झाला. पुढे बाळ कोल्हटकर यांचे ‘वाहतो ही दुर्वाची जुडी’ हे नाटक मिळाले आणि या  नाटकाने मला ‘ताई’ अशी ओळख मिळाली.

आशा काळे यांनी वेगवेगळ्या नाटय़संस्थांच्या अनेक नाटकांमधून कामे केली. यात प्रामुख्याने ‘कलावैभव’, ‘अभिजात’, ‘नाटय़संपदा’, ‘सुयोग’ आदींचा समावेश आहे. ‘गहिरे रंग’, ‘गुंतता हृदय हे’, ‘घर श्रीमंतांचे’, ‘देव दीनाघरी धावला’, ‘लहानपण देगा देवा’, ‘वर्षांव’, ‘विषवृक्षाची छाया’, ‘महाराणी पद्मिनी’ आणि अन्य काही त्यांची गाजलेली नाटके.  ‘दुर्वाची जुडी’ चे ८४५, ‘गुंतता’चे ८७५ प्रयोग त्यांनी केले. रंगभूमीवरून पुढे मराठी रुपेरी पडद्यावर त्यांचा प्रवेश झाला. भालजी पेंढारकरांचा ‘तांबडी माती’ हा त्यांचा पहिला चित्रपट. ‘गनिमी कावा’, ‘घर गंगेच्या काठी’, ‘कैवारी’, ‘हा खेळ सावल्यांचा’, ‘सासुरवाशीण’, ‘थोरली जाऊ’,  ‘ज्योतिबाचा नवस’, ‘बाळा गाऊ कशी अंगाई’, ‘कुलस्वमिनी अंबाबाई’, ‘चांदणे शिंपीत जाशी’, ‘माहेरची माणसे’  ‘सतीची पुण्याई’, ‘सतीचं वाण’ हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट. त्यांचे बहुतांश सर्व चित्रपटांनी रौप्यमहोत्सव साजरा केला. राज्य शासनाच्या व्ही. शांताराम, अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या ‘जीवनगौरव’ पुरस्कारासह त्यांना अन्य अनेक पुरस्कार आजवर मिळाले आहेत.

चित्रपट आणि नाटकांधील सोशीक, सहनशील मुलगी, सून, आई अशा भूमिका हीच त्यांची ओळख झाली. या पठडीतून बाहेर पडावेसे वाटले नाही का? यावर त्या म्हणाल्या, हो तसा प्रयत्न केला. ‘हा खेळ  सावल्यांचा’ हा चित्रपट आणि ‘गहिरे रंग’, ‘महाराणी पद्मिनी’ या नाटकातील भूमिका पठडीपेक्षा वेगळ्या होत्या. सोशीक व सहनशील भूमिकांप्रमाणेच या वेगळ्या भूमिकेतही रसिकांनी मला स्वीकारले. माझे कौतुक झाले. या भूमिकाही गाजल्या. वेगवेगळे कंगोरे असलेल्या विविध भूमिका करायला मी तयार असले तरीही माझ्या ‘चेहऱ्या’मुळे सोशीक, सहनशील, सोज्वळ, सुसंस्कृत आणि कौटुंबिक  प्रकारच्या भूमिकाच माझ्या जास्त प्रमाणात वाटय़ाला आल्या. अर्थात त्याचे मला अजिबात वाईट वाटत नाही. जे घडायचे ते घडले. पण या सर्व भूमिका मी अक्षरश: जगले. त्या जिवंत केल्या. त्यामुळे सर्वसामान्य प्रेक्षकांनाही मी तेव्हा आणि आजही ‘आपली’ वाटते. आई, ताई, मुलगी, सून असावी तर ‘आशा काळे’सारखी असे प्रेक्षकांना वाटायचे. माझ्या अभिनयाला मिळालेली ही दाद माझ्यासाठी नक्कीच आनंददायी आणि अभिमानास्पद आहे.

नाटय़-चित्रपट प्रवासात बाबुराव पेंढारकर, भालजी पेंढारकर, बाळ कोल्हटकर, आत्माराम भेंडे, नंदकुमार रावते, वसंत कानेटकर, पुरुषोत्तम दारव्हेकर, राजदत्त, शं. ना. नवरे, डॉ. काशिनाथ घाणेकर, वसंतराव जोगळेकर, विजया मेहता, सुलोचना दीदी आदी मान्यवरांचा सहवास आणि मार्गदर्शन मिळाले ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. बाबुराव पेंढारकर यांच्यामुळे रंगभूमीवर आणि भालजी पेंढारकर यांच्यामुळे रुपेरी पडद्यावर माझा प्रवेश झाला. आशा काळे म्हणून मी आज जी काही आहे त्यात माझे सर्व दिग्दर्शक, लेखक, निर्माते, सहकलाकार आणि रसिक प्रेक्षकांचे महत्त्वाचे योगदान असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

‘महाराणी पद्मिनी’ नाटकाच्या वेळचा एक किस्सा सांगताना त्या म्हणाल्या, दारव्हेकर मास्तरांनी तालमीच्या वेळी एक कागद दिला. त्यावर ‘शांतारामचा ससा आषाढात मेला, हे ऐकून सान्यांची शकू फार कष्टी झाली’ हे वाक्य लिहिलेले होते. खरे तर नाटकाचा आणि या वाक्याचा काहीच संबंध नव्हता. पण दारव्हेकर मास्तरांनी दिले म्हणून कोणताही प्रश्न न विचारता ते वाक्य पाठ केले. दुसऱ्या दिवशी त्यांना वाक्य पाठ केल्याचे सांगितले. तर हसून आणि लटक्या रागाने ते म्हणाले, अगं ते वाक्य पाठ करण्यासाठी दिले नव्हते. तुझे शब्दोच्चार शुद्ध व स्पष्ट होण्यासाठी ते तुला दिले होते. ‘शांताराम’ मधील ‘श’चा उच्चार शहामृगाच्या ‘श’चा, ‘आषाढातल्या’ ‘ष’चा उच्चार पोटफोडय़ा ‘ष’चा. श, स, ष यातील फरक कळावा म्हणून ते वाक्य तुला दिले होते. आणि तुम्हाला सांगते त्या नाटकातील माझ्या ‘अश्रु पुसू शकेल अशा पुरुषासमोर स्त्रीने रडायचे असते’ या वाक्यावर प्रेक्षकांकडून मला कडाडून टाळी मिळायची. दारव्हेकर मास्तरांचे ते मार्गदर्शन मोलाचे ठरले. या सगळ्याचे मूळ कुठे तरी माझ्या लहानपणातही रुजले गेले. संध्याकाळी घरी आल्यानंतर दिवेलागणीच्या वेळेस घरातील लहान मुलांनी रामरक्षा िंकंवा व्यंकटेश स्तोत्र म्हणण्याची आमच्याकडे पद्धत होती. ते स्तोत्रपठण मी तोंडातल्या तोंडात,  पुटपुटत केले किंवा घाईघाईत म्हटले तर आई मला ओरडायची आणि अगं मोठय़ाने म्हण, स्पष्ट उच्चार कर असे सांगायची. आईच्या त्या ओरडण्याचाही पुढे फायदा झाला.

नियतीचा आणखी एक योगायोग सांगताना त्या म्हणाल्या, बाबुराव पेंढारकर यांचे मित्र आणि सिने फोटोग्राफर पांडुरंग नाईक ‘वाहतो ही दुर्वाची जुडी’ या नाटकाच्या एका प्रयोगाला आले होते. पुढे आणखी काही वर्षांनी त्यांच्याच मोठय़ा चिरंजीवांबरोबर माधव नाईक यांच्याबरोबर माझा विवाह होणार आहे, अशी तेव्हा कल्पनाही केली नव्हती. पण पुढे तसे झाले. लघुपट निर्माते-दिग्दर्शक माधव नाईक यांच्याबरोबर माझा विवाह झाला. म्हटले तर माझे लग्न उशिराच झाले. पण नाटय़-चित्रपटातील यशस्वी प्रवासाप्रमाणेच माधवरावांसोबतचा माझा २५ वर्षांचा वैवाहिक जीवनाचा प्रवासही सुखाचा झाला. लग्नानंतरही त्यांच्यामुळेच मी नाटक-चित्रपटात काम करू शकले. माझे आई-वडील, भाऊ अनिल आणि पती माधवराव अशी माझी जीवाभावाची माणसे आज या जगात नाहीत. पण तितक्याच उत्कटतेने माझ्यावर प्रेम करणारी चांगली माणसे आजुबाजूला आहेत. रसिक प्रेक्षक आजही भरभरून प्रेम करतात. माझ्यासाठी हा खूप मोठा ठेवा आहे.

वयाच्या ६५ व्या वर्षांत असलेल्या आशाताईंना आजही चित्रपट, मालिका यात काम करण्यासाठी विचारणा होते. त्या सांगतात, गेली बावन्न वर्षे मी या क्षेत्रात काम केले. जे मिळाले त्यात मी समाधानी आणि तृप्त आहे. थोडेसे वेगळे काही करावे, त्याला वेळ देता यावा त्यासाठी विचारणा झाली तरी नम्रपणे नाही म्हणते. ‘भारती विद्यापीठा’च्या संचालक मंडळावर मी सध्या आहे. वृद्धाश्रम, मूकबधिर, मतिमंद मुलांच्या शाळा येथे मी जाते. कर्करोगाच्या शेवटच्या पायरीवर असलेल्या रुग्णांना भेटते. सगळ्यांशी बोलते. त्या भेटीतून लोकांच्या चेहऱ्यावर फुललेला आनंद पाहून मिळणारे मानसिक समाधान खूप मोलाचे आहे. मला वाचनाचीही आवड असल्याने एकीकडे पुस्तकांचे वाचनही सुरू असते. या सगळ्यात खूप छान वेळ जातो.

एक वेळ विष पचविणे सोपे आहे, पण यश पचविणे अवघड आहे. हे क्षेत्रच असे आहे की इथे जमिनीवरचे पाय हलतात. पण तू तुझे पाय कायम जमिनीवरच ठेव, असे माझी आई मला नेहमी सांगायची. आईचे ते वाक्य मी कायमचे मनावर कोरून ठेवले असल्याचे सांगत आशा काळे यांनी गप्पांचा समारोप केला.