गेली ५५ वर्षे २५ नाटय़संस्था आणि ७५ नाटकांचे पाच हजार प्रयोग त्यांनी केले आहेत. या नाटकांमधून विविध भूमिका केलेल्या या अभिनेत्याला अनेक दिग्गज कलाकारांचा सहवास मिळाला, त्यांच्याबरोबर काम करता आले. पण स्वभाव मुळातच भिडस्त. ‘आपण बरे नि आपले काम बरे’ असा. प्रसिद्धी व कामाची टामटूम अजिबात नाही. या ज्येष्ठ अभिनेत्याच्या डोळ्यांत कुठेतरी वेदनेचा झरा जाणवतो, पण तरीही जे मिळाले त्यात समाधान व आनंद मानणारे ७७ वर्षीय ज्येष्ठ अभिनेते वसंत इंगळे आजच्या ‘पुनर्भेट’चे मानकरी आहेत. शिवाजी मंदिर येथे झालेल्या गप्पांच्या वेळी ज्येष्ठ नाटय़ व्यवस्थापक अशोक मुळ्येही उपस्थित होते.

[jwplayer bZoVXId4]

Andhra pradesh , G. Nirmala, Defying child marriage,10th examination topper
जी. निर्मला… हौंसलों की उडान
jitendra awhad ajit pawar l
“नशीब त्यांनी डॉक्टरांना विषाचं इंजेक्शन…”, अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून जितेंद्र आव्हाडांचा टोला
Meenakshi Shinde
आचारसंहितेच्या कालावधीत बचतगटांना आनंद आश्रमातून अनुदान वाटप ? शिवसेनेच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदेंविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार
Garbage picker to video journalist Maya Khodve Journey
कचरा वेचक ते व्हिडिओ जर्नलिस्ट! माया खोडवे यांच्या जिद्दीचा प्रवास

आपले शिक्षण आणि सुरुवातीच्या प्रवासाच्या आठवणींना उजाळा देताना इंगळे म्हणाले, ‘‘मी मूळचा नागपूरचा. शालेय शिक्षण नागपुरातच झाले. १९५८ मध्ये मुंबईत आलो आणि कायमचा मुंबईकरच झालो. मुंबई सेंट्रल-‘आयटीआय’मधून पदविकाप्राप्त केल्यानंतर ‘इंडिया युनायटेड ट्रॉली मॅन्युफॅक्चरिंग कंपनी’ येथे दहा वर्षे नोकरी केली. नंतर काही वर्षे स्वत:चा व्यवसायही केला. पण नाटकाची आवड काही स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळे मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या कला विभागाचा नाटय़ प्रशिक्षण अभ्यासक्रम १९६१ मध्ये पूर्ण केला. काही कलाकार-लेखकांच्या मुलांनी एकत्र येऊन ‘किशोर कलावंत’ ही संस्था स्थापन केली होती. या संस्थेत रणजित बुधकर यांचा मुलगा दिलीप, मधुसुदन कालेलकर यांचा मुलगा अनिल, दामुअण्णा मालवणकर यांचा मुलगा जयंत, भोलाराम आठवले यांचा मुलगा पद्माकर अशी मंडळी होती. हे सगळे माझे मित्र होते. मीही त्यांच्यात असायचो. ‘किशोर कलावंत’ संस्थेतर्फे ‘तुज आहे तुजपाशी’ हे नाटक करायचे ठरले तेव्हा त्यांनी मला त्या नाटकात घेतले. आठ ते दहा प्रयोगांनंतर हे नाटक बंद पडले. या नाटकातील कामामुळे मधुसुदन कालेलकर यांच्या ‘नाटय़वैभव’ या संस्थेत १९६५ मध्ये माझा प्रवेश झाला. कालेलकर यांनीच लिहिलेल्या ‘अपराध मीच केला’ या नाटकात मला ‘नेव्हल पोलीस’ ही भूमिका मिळाली. यात अरुण सरनाईक, शरद तळवलकर यांच्याबरोबर काम करता आले. यातून खूप काही शिकायला मिळाले. या नाटकापासून माझा व्यावसायिक रंगभूमीवर सुरू झालेला प्रवास अगदी अलीकडच्या ‘लहानपण देगा देवा’ व ‘बेईमान’पर्यंत सुरू राहिला. आजवरच्या नाटय़ प्रवासात के. नारायण काळे, जयराम देसाई, प्रभाकर गुप्ते, स. ग. मालशे, बाबा लिमये आदींचे मार्गदर्शन मिळाले.’’

इंगळे यांनी कालेलकर यांच्या ‘नाटय़वैभव’सह ‘मुंबई मराठी साहित्य संघ’, ‘श्रीरंग साधना’, ‘धि गोवा हिंदूू असोसिएशन’, ‘नटेश्वर’, ‘कलावैभव’, ‘एनसीपीए’, ‘भद्रकाली’, ‘सुयोग’, ‘हर्बेरियम’ आणि इतर अशा सुमारे २५ नाटय़संस्थांच्या विविध नाटकांमधून कामे केली. जर्मन दिग्दर्शक फ्रिक्स बेनेवेट यांच्या ‘फाऊस्ट’ या नाटकासाठी ‘रंगमंच व्यवस्थापक’ म्हणूनही त्यांनी काम केले. ‘अकुलिना’, ‘तुज आहे तुजपाशी’, ‘नटसम्राट’, ‘लेकुरे उदंड झाली’, ‘एकच प्याला’, ‘लग्नाची बेडी’, ‘सूर्याची पिल्ले’, ‘जंगली कबूतर’, ‘सूर्यास्त’, ‘दिवा जळू दे सारी रात’, ‘कथा अकलेल्या कांद्याची’, ‘हयवदन’, ‘प्रेमा तुझा रंग कसा’, ‘बॅरिस्टर’, ‘माझी बायको माझी मेहुणी’, ‘बेईमान’, ‘लहानपण देगा देवा’, ‘संध्या छाया’, ‘रायगडाला जेव्हा जाग येते’, ‘मंतरलेली चैत्रवेल’, ‘काचेचा चंद्र’, ‘गुंतता हृदय हे’ ही त्यांची काही गाजलेली नाटके. विविध नाटकांमधून साकार केलेल्या भूमिकांविषयी माहिती देताना इंगळे यांनी सांगितले, ‘‘गोळे मास्तर’ (अपराध मीच केला), ‘मदन’ (दिवा जळू दे सारी रात), ‘तळीराम’ (एकच प्याला), ‘आचार्य’ (तुज आहे तुजपाशी), ‘गोरा’ (लेकुरे उदंड झाली), ‘अवधूत’ (लग्नाची बेडी), ‘विठोबा’ (नटसम्राट), ‘मामा मालवणकर’ (तीन चोक तेरा) या महत्त्वाच्या भूमिका केल्या. सुमारे दहा ते बारा नाटकांमध्ये एकापेक्षा जास्त भूमिका साकारायची संधीही मला मिळाली. माझ्या परीने प्रत्येक भूूमिका प्रामाणिकपणे साकारण्याचा व त्या भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न नेहमीच केला. ‘एकच प्याला’ नाटकात ‘सुधाकर’ ही भूमिका वगळली तर ‘तळीराम’सह हुसेन भटारी, जनुभाऊ, शास्त्री, खुदाबक्ष, बाबासाहेब, फौजदार, भगीरथ आदी भूमिका काही प्रयोगात केल्या.’’

नानासाहेब फाटक, बापुराव पेंढारकर, दाजी भाटवडेकर, मामा पेंडसे, डॉ. श्रीराम लागू, निळू फुले, प्रभाकर पणशीकर, काशिनाथ घाणेकर, धुमाळ, राजा गोसावी, राजा परांजपे, चंद्रकांत गोखले, विक्रम गोखले, बबन प्रभू, दत्ता भट आणि इतर अनेक दिग्गज कलाकारांसह काम करता आले (सगळ्यांचीच नावे घेणे शक्य नाही. ज्यांची राहिली त्याबद्दल क्षमस्व) हे मी माझे भाग्य समजतो,’’ असेही इंगळे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

नाटकांप्रमाणेच इंगळे यांनी पन्नासहून अधिक मराठी चित्रपटांतही काम केले असून यात ‘आम्ही जातो आमुच्या गावा’, ‘कलावंत विकणे आहे’, ‘या सुखानो या’, ‘भालू’, सुंदरा सातारकर’, ‘कुलस्वामीनी अंबाबाई’, ‘मुंबईचा फौजदार’, ‘माफीचा साक्षीदार’, ‘पुढचं पाऊल’, ‘हमाल दे धमाल’, करायचं ते दणक्यात’, ‘जेता’ या चित्रपटांचा समावेश आहे. ‘घर परिवार’ या हिंदी चित्रपटात त्यांनी राजेश खन्नाच्या मित्राची भूमिका केली होती. ‘आदमी सडक का’, ‘सारांश’, ‘भूकंप’, ‘रावसाहेब’ हे हिंदी चित्रपटही त्यांच्या नावावर जमा आहेत. अलीकडेच ‘कलर मराठी’ वाहिनीवरील ‘तू माझा सांगाती’ या मालिकेच्या दोन भागांत त्यांनी छोटी भूमिका केली होती. ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांचे स्वीय साहाय्यक म्हणून २२ वर्षे इंगळे यांनी काम केले. अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेचे गणपतराव जोशी पारितोषिक, मुंबई मराठी साहित्य संघाचा नाटय़सेवा गौरव पुरस्कार, ‘नाटय़ संपदा’चा व्यवस्थापन पुरस्कार, दाजी भाटवडेकर प्रतिष्ठानचे ज्येष्ठ कलावंत पारितोषिक, राष्ट्र सेवा दलाचा कार्यकर्ता सन्मान पुरस्कार त्यांना मिळाला आहे.

वयाच्या ७७ वर्षांतही इंगळे कामात व्यग्र आहेत. व्ही. शांताराम फाऊंडेशनतर्फे ‘शतक महोत्सवी मराठी चित्रसंपदा’ हा संदर्भ ग्रंथ नुकताच प्रकाशित झाला आहे. मराठी मुकपटापासून ते २०१३ पर्यंत प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटांची सूची यात असून या ग्रंथासाठी इंगळे यांनी संपादन साहाय्यक म्हणून काम केले आहे. आता २०१६ पर्यंतच्या मराठी चित्रपटांच्या सूचीचे काम सुरू असून दररोज दुपारी आपला काही वेळ इंगळे या कामासाठी देतात. ५५ वर्षांच्या नाटय़ प्रवासानंतरही इंगळे यांचे आज स्वत:च्या मालकीचे किंवा ‘दहा टक्के’ कोटय़ातून मिळविलेले घर नाही. ते चाळीत भाडय़ाच्याच घरात राहतात. राज्य शासनाच्या वृद्ध कलावंत योजनेच्या मानधनासाठीही त्यांनी आजपर्यंत अर्ज केलेला नाही. अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या वृद्ध कलावंत योजनेत त्यांना गेल्या दोन वर्षांपासून मानधन मिळत आहे. पत्नी पौर्णिमा आणि मुलगी रुपाली हा त्यांचा परिवार. त्या दोघी शारीरिक विकलांग आहेत. जमेल तशी घरातील कामे त्या करत असतातच. पण त्यांना इंगळे सर्वतोपरी व सर्व प्रकारची मदत करतात. घरची आर्थिक जबाबदारी इंगळे यांच्यावरच आहे. त्यामुळे चित्रपट किंवा मालिकेतून चांगली भूमिका मिळाली तर घराला मदत म्हणून करायची आजही त्यांची तयारी आहे.

[jwplayer psUg1N0g]