फेअरनेस क्रीम ‘फेअर अँड लव्हली’मधून फेअर हा शब्द काढण्यात आला आहे. त्या ऐवजी आता कंपनीने ‘ग्लो’ हा शब्द वापरण्यास सुरुवात केली आहे. परिणामी या क्रीमचं नाव आता ‘ग्लो अँड लव्हली’ असं ठेवण्यात आलं आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे दिग्दर्शक शेखर कपूर खुश झाले. त्यांनी ट्विट करुन आपला आनंद व्यक्त केला. मात्र त्यांच्या या ट्विटवर एका नेटकऱ्याने संताप व्यक्त केला. तुम्ही आपल्या चित्रपटांमध्ये सावळ्या तरुणींना काम का देत नाही? असा थेट प्रश्न त्याने विचारला. या प्रश्नावर शेखर कपूर यांनी देखील तितकेच करारी उत्तर दिले.

काय म्हणाले होते शेखर कपूर?

“तर आता फेअर अँड लव्हली ग्लो अँड लव्हली या नावाने ओळखले जाईल. हिंदुस्तान लिव्हर तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून देशातील तरुणींच्या डार्क स्कीनची निंदा करत होता. आता तरी क्रीमच्या पॅकेटवर कुठल्यातरी डार्क स्कीन असलेल्या तरुणीचा फोटो लावा.” अशा आशयाचे ट्विट शेखर कपूर यांनी केले होते.

त्यांच्या या ट्विटवर एका नेटकऱ्याने नाराजी व्यक्त केली. “तुम्ही आता डस्की स्कीनबद्दल बोलताय. तुम्ही आपल्या चित्रपटांमध्ये सावळ्या तरुणींना काम का देत नाही?” असा सवाल त्याने केला. या प्रश्नावर शेख कपूर यांनी ‘बँडेड क्वीन’ असं उत्तर देऊन त्याची बोलती बंद केली. शेखर कपूर यांचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. कारण ‘बँडेड क्वीन’ हा शेखर कपूर यांच्या करिअरमधील सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक आहे.