करोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे सिनेसृष्टीला जबरदस्त आर्थिक फटका बसला आहे. सद्य परिस्थिती पाहाता किमान वर्षभर तरी सिनेमागृह पुन्हा सुरु करण्याची परवानगी सरकार देणार नाही अशी शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर अनेक मोठे चित्रपट आता OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहेत. मात्र या OTT प्लॅटफॉर्ममुळे बॉलिवूडमधील स्टार सिस्टम संपून जाईल, असा दावा दिग्दर्शक शेखर कपूर यांनी केला आहे.

अवश्य पाहा – “पत्नीचा मार खाऊन ४८ कोटी रुपये गमावल्यासारखं वाटलं”; अभिनेत्याचा कोर्टात अजब दावा

“सिनेमागृह किमान पुढील वर्षभर तरी सुरु होणार नाहीत. त्यामुळे पहिल्याच आठवड्यात १०० कोटींची कमाई आता बंद होईल. याचा मोठा फटका बॉलिवूडमधील स्टार सिस्टमला बसणार आहे. ही स्टार सिस्टम आता संपणार आहे. लहान मोठ्या सर्वच स्टार्सला आता प्रदर्शनासाठी OTT प्लॅटफॉर्मवरच यावं लागेल. टेक्नोलॉजी आता खूप सोपी झाली आहे.” अशा आशयाचं ट्विट शेखर कपूर यांनी केलं आहे. गेल्या काही काही काळात बॉलिवूडमधील स्टार सिस्टमवर जोरदार टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर त्यांचे हे ट्विट सध्या चर्चेत आहे.

अवश्य पाहा – …जेव्हा अंकिताने सुशांतला केलं होतं प्रपोज; थ्रोबॅक व्हिडीओ होताय व्हायरल…

देशात २४ तासांत २८ हजार रुग्ण

देशात गेल्या २४ तासांमध्ये २८ हजार ७०१ करोना रुग्ण आढळले. त्यामुळे देशातील एकूण रुग्णसंख्या ८ लाख ७८ हजार २५४ झाली. देशात आतापर्यंत ५.५ लाख रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. गेल्या २४ तासांत १८ हजार ८५० रुग्ण करोनामुक्त झाले. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६३ टक्के आहे. १९ राज्यांमध्ये हे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहे. करोना रुग्णांच्या मृत्यूंचे प्रमाण राष्ट्रीय स्तरावर २.६४ टक्के आहे. गेल्या २४ तासांत ५०० रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृतांची एकूण संख्या २३ हजार १७४ झाली आहे. दरम्यान, महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत ६,४९७ नवे रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या २ लाख ६० हजार झाली आहे. करोनाने आणखी १९३ जणांचा बळी घेतल्याने राज्यात मृतांची एकूण संख्या १०,४८२ वर पोहोचली आहे.