पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अलीकडेच ४९ प्रतिभावंतांनी पत्र लिहून देशातील वाढत्या झुंडबळींच्या (मॉब लींचिंग) घटना रोखण्याची मागणी करीत निषेध व्यक्त केला होता. तर दुसरीकडे या पत्राला ६१ नामवंतांनी खुल्या पत्राद्वारे उत्तर दिलं होतं. केवळ मोजक्या प्रकरणांचा निषेध आणि विरोध करण्यात येत असल्याचा आरोप या पत्रात करण्यात आला होता. हा वाद सुरू असतानाच दिग्दर्शक शेखर कपूर यांनी ट्विट करत ‘बुद्धिवंतांना’ टोमणा मारला. ‘मला या देशात अजूनही निर्वासित असल्यासारखं वाटतं,’ असं ते म्हणाले. त्यांच्या या ट्विटवर गीतकार जावेद अख्तर यांनी संताप व्यक्त केला.

‘फाळणीनंतर निर्वासित म्हणून आयुष्याची सुरुवात केली. आयुष्य घडवण्यासाठी पालकांनी सर्वकाही दिलं. पण बुद्धिवंतांची नेहमीच भीती वाटायची. त्यांनी मला सतत कमी लेखलं आणि अचानक माझ्या चित्रपटांनंतर त्यांनी मला जवळ केलं. मला अजूनही त्यांची भीती वाटते. त्यांनी जवळ घेणं म्हणजे सापाने दंश मारण्यासारखं आहे. मी अजूनही निर्वासितच आहे,’ असं ट्विट शेखर कपूर यांनी केलं. त्यांच्या या ट्विटवर जावेद अख्तर भडकले. हे बुद्धिवंत कोण आहेत, असा सवाल त्यांनी शेखर कपूर यांना केला. इतकंच नव्हे तर तुमची तब्येत बरी नसून तुम्हाला मानसोपचारतज्ज्ञाकडे जायची गरज आहे, असा सणसणीत टोलाही अख्तर यांनी लगावला.

Avengers Endgame मधील डिलीट केलेला भावनिक सीन व्हायरल, पाहा व्हिडीओ

‘तुम्ही उल्लेख करत असलेले बुद्धिवंत कोण आहेत? श्याम बेनेगल, अदूर गोपाल कृष्णा, राम चंद्र गुहा? शेखर साहेब तुमची तब्येत बरी नाही वाटतं. मानसोपचारतज्ज्ञाकडे जाऊन उपचार घेण्यात काहीच गैर नाही. जर भारतात तुम्हाला निर्वासित असल्यासारखं वाटत असेल तर तुम्हाला कुठे निर्वासित असल्यासारखं वाटणार नाही, पाकिस्तानात? हा मेलोड्रामा बंद करा,’ अशा शब्दांत अख्तर यांनी सुनावले.