लेखक, दिग्दर्शक, अभिनेता दिग्पाल लांजेकर वेगवेगळ्या ऐतिहासिक चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’ या यशस्वी चित्रपटांनंतर दिग्पाल आता एक नवा ‘शिव’पट घेऊन आला आहे. या चित्रपटातून शिवचरित्रातला एक नवा अध्याय उलगडला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजलखान यांच्या भेटीचा आणि अफजलखानाच्या वधाचा प्रसंग प्रत्येक शिवप्रेमीला अभिमान वाटावा असा आहे. हाच प्रसंग ‘शेर शिवराज है’ या चित्रपटात चित्रीत करण्यात येणार आहे. या सिनेमाची पटकथा लिहून पूर्ण झालेली असून लवकरच त्याचं चित्रीकरण सुरु होणार आहे. लवकरच या चित्रपटाचं पोस्टर आणि टीझर प्रदर्शित होईल. पण त्यासाठी प्रेक्षकांना थोडी वाट पाहावी लागेल.
View this post on Instagram
शिवाजी महाराजांची वेगवेगळी रुपे दाखवणारी आठ चित्रपटांची ‘शिवराज अष्टक’ अशी मालिका दिग्पालला करायची आहे. हा चित्रपट या मालिकेतला महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. यापूर्वी दिग्पालने ‘फत्तेशिकस्त’, ‘फर्जंद’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. त्याचा ‘जंगजौहर’ हा चित्रपट अजून प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 20, 2021 12:54 pm