अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपी अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अंमली पदार्थविरोधी पथकाने (NCB) मंगळवारी अटक केली. तसेच न्यायालयाने तिचा जामीन अर्ज फेटाळून तिला ‘न्यायालयीन कोठडी’ सुनावली आहे. दरम्यान रियाच्या अटकेवरुन अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि शिबानी दांडेकर या दोघांमध्ये शाब्दिक द्वंद्व सुरु झालं आहे. रिया चक्रवर्तीचा इतका द्वेष तू का करतेस? असा प्रश्न शिबानीने अंकिताला विचारला आहे.

अवश्य पाहा – ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश; अभिनेत्री संजना गलरानीला अटक

अंकिता लोखंडे सुशांतची एक्स गर्लफ्रेंड होती. रियाला अटक होताच तिने सोशल मीडियाद्वारे समाधान व्यक्त केलं होतं. तिच्या पोस्टवर रियाची खास मैत्रीण शिबानी दांडेकर हिने संताप व्यक्त केला आहे. “अंकिताला सुशांतच्या नावाखाली केवळ प्रसिद्धी हवी आहे. रियावर टीका करुन आता ती खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आली आहे. परंतु कुठल्याही पुराव्यांअभावी टीका करणं चुकीचं आहे. गर्दीत राहून आरोप करणाऱ्या अंकितासारख्या महिलांमुळेच पुरुषप्रधान संस्कृती अद्याप टिकून आहे. पण रियाबाबत इतका द्वेष का? रियाने सुशांतवर खरं प्रेम केलं होतं.” अशा आशयाची इन्स्टापोस्ट लिहून शिबानीने अंकिताबाबत आपली नाराजी व्यक्त केली आहे.

अवश्य पाहा – “अनधिकृत बांधकाम उभारलं तेव्हा कुठे होता?”; BMCच्या कारवाईवर दिया मिर्झा संतापली

अंमली पदार्थ विकत घेणे, त्यासाठी अन्य आरोपींशी संगनमत करणे, याबाबत रियाविरोधात भक्कम पुरावे असल्याचा दावा ‘एनसीबी’ने केला. ‘एनसीबी’चे पथक रविवारपासून रियाची चौकशी करत होते. याआधी रियाचा भाऊ शोविक, सुशांतचा व्यवस्थापक सॅम्युअल मिरांडा, नोकर दीपेश सावंत, अमली पदार्थ विक्रेता झैद विलात्रा, कैझान इब्राहिम, अब्देल बसीत परिहारसह नऊ जणांना ‘एनसीबी’ने अटक केली आहे. त्यापैकी शोविक, सॅम्युअल, दीपेश यांच्यासमोर रियाची चौकशी करण्यात आली. सुशांतच्या मृत्यू प्रकरणाचे धागेदोरे अमली पदार्थाशी जोडलेले आहेत का, याबाबतही ‘एनसीबी’कडून तपास सुरू आहे.