बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती वादात अडकली. सुशांतच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर तिला ट्रोलर्सनी प्रचंड ट्रोल केलं आणि आता सीबीआय, ईडी, एनसीबी यासारख्या प्रमुख केंद्रीय यंत्रणा या प्रकरणात तपास करत आहेत. रियाचा चौकशीला सामोरं जावं लागलं. आरोपांनी घेरलेल्या रिया चक्रवर्तीच्या समर्थनार्थ काही अभिनेत्री देखील उतरल्या. यात अभिनेत्री आणि टेलिव्हिजन होस्ट शिबानी दांडेकर हिचा देखील समावेश होता. त्यानंतर आता तिने याबाबत नवा खुलासा केलाय. नुकतंच एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत तिने रिया चक्रवर्तीला त्यावेळी पाठींबा का दिला? यावर स्पष्टीकरण देताना दिसून आली.

अभिनेत्री आणि टेलिव्हिजन होस्ट शिबानी दांडेकर ही रिया चक्रवर्तीची खूप जवळची मैत्रिण आहे. नुकतंच तिने एका माध्यमाला मुलाखत दिलीय. या मुलाखतीत बोलताना तिने सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात रिया चक्रवर्तीला दिलेल्या पाठींब्याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केलीय. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात रिया चक्रवर्तीला पाठिंबा देणं हे शिबानी दांडेकरला चांगलंच भोवलं. यामुळे तिला आपल्या लाखो फॉलोअर्सना गमवावं लागलं. इतकंच नाही तर तिला सोशल मीडियावर बरंच ट्रोल देखील करण्यात आलं होतं. त्यानंतर अखेर शिबानी दांडेकरने यावर आपलं मौन सोडलं आणि आपली प्रतिक्रिया व्यक्त केलीय.

या मुलाखतीत बोलताना शिबानी दांडेकर म्हणाली, “गेल्या काही वर्षांमध्ये ज्या गोष्टी मला सांगायच्या आहेत, त्या सांगितल्या आहेत आणि त्यावर लोकांनी काही चांगल्या प्रतिक्रिया दिल्या नाहीत. ज्या गोष्टी मला योग्य वाटतात मी त्याच गोष्टींसाठी उभी राहीले. पण लोकांनी त्यावर चांगल्या प्रतिक्रिया दिल्या नाहीत. कदाचित यामुळेच मी माझा एक फॅनबेस गमावला आहे, याच कारणामुळे मी माझे फॉलोअर्स गमावले आहेत. पण म्हणून मी माफी मागणार नाही आणि रियाला पाठिंबा दिल्याचा मला पश्चाताप वाटत नाही. हे काय आहे हे तुम्हाला चांगलंच ठाऊक आहे. यासाठी मी माफी मागणार नाही..मला जे योग्य वाटतं ते मला करणं गरजेचं आहे आणि अखेरपर्यंत मी तेच केलं. याव्यतिरिक्त आणखी वेगळ्या पद्धतीने मला वागता येत नाही. एकदा तुम्हाला तुमचं सत्य काय आहे हे कळलं की मग लोक काय म्हणतात ते माझ्यासाठी खरोखर महत्त्वाचं वाटत नाही.”


रिया चकवर्तीला दिलेल्या पाठिंब्यानंतर शिबानीला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं. त्यावर बोलताना शिबानी दांडेकर म्हणाली, “मी ज्या लोकांना ओळखत नाही, ते कोण आहेत हे मला माहित नसेल तर ते लोक माझ्यावर कसा परिणाम करू शकतील.” सत्य बोलल्याने तुमचे काही लाख फॉलोअर्स कमी होत असतील तर त्याने मला फरक पडत नाही, असं देखील शिबानी दांडेकर म्हणाली.

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिच्या विरोधात सोशल मीडियावर मीडिया ट्रायल सुरू होतं. यावेळी रियाची मैत्रिणी शबानी दांडेकर हिने रियाच्या समर्थनार्थ आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केली. रियाला तिच्या वयाच्या 16 व्या वर्षांपासून आपण ओळखत असल्याचं म्हणत शिबानीने तिची बाजू मांडली. रिया मजबूत, जिवंत आणि उत्साहाने आयुष्य जगणारी आहे. मात्र गेल्या काही महिन्यांमध्ये तिच्या व्यक्तिमत्वाच्या विरोधात मी तिला पाहिलं आहे, असं देखील तिने या पोस्टमध्ये म्हटलं होतं.

त्याचप्रमाणे इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत सुद्धा शिबानी दांडेकर हिने रिया आणि सुशांतच्या नात्याबद्दल आणि सुशांतच्या आजाराबद्दल अनेक खुलासे केले होते. सुशांतच्या कुटुंबीयांना त्याची कथित गर्लफ्रेंड अर्थात रिया आवडत नसल्याचं शिबानीने सांगितलं. त्याचप्रमाणे एखाद्याच्या रिलेशनशिपमध्ये झालेली ही काही पहिली गोष्ट नाही असं अधोरेखित करत ती पुढे म्हणाली, “जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला डेट करता तेव्हा त्या व्यक्तीचे कुटुंबीयसुद्धा तुमच्या बाजूने असतील याची खात्री नसते. हे काही पहिल्यांदा घडलेलं नाही. रियासोबत सुशांतच्या बहिणींचं पटत नव्हतं आणि रियाने ही गोष्ट सुशांतला सांगितली होती. काही वेळा कुटुंबीयांसोबत गर्लफ्रेंडचं पटत नाही. पण अशावेळी तिनेच हत्या केली असा त्याचा अर्थ होतो का? किंवा तिने आत्महत्येला प्रवृत्त केलं असा होतो का? हे प्रत्येकासाठी लॉकडाउनमधील मनोरंजन झालंय का?” असे प्रश्न देखील तिने या मुलाखतीत उपस्थित केले होते.