काश्मिरी पंडितांवर चित्रपट बनवण्याची घोषणा अभिनेत्री कंगना रणौत हिने आज (बुधवारी) मुंबईत दाखल झाल्यानंतर एका व्हिडिओद्वारे केली. मात्र, तिच्या या घोषणेनंतर ‘शिकारा’ या काश्मिरी पंडितांवर आधारित हिंदी चित्रपटाचे लेखक राहुल पंडिता यांनी नाराजी व्यक्त केली आहे. केवळ काश्मिरी पंडितांवर चित्रपट बनवल्याने तुम्ही त्यांचं दुःख समजू शकत नाही, अशा शब्दांत त्यांनी कंगनाला सुनावलं आहे. ट्विटद्वारे पंडिता याने आपल्या भावना व्यक्त केल्या.

पंडिता ट्विटमध्ये म्हणतात, “मला माफ करा, पण तुमच्या घराची भिंत पाडण्यावरून तुम्हाला काश्मिरी पंडितांची वेदना समजू शकत नाही. तीन दिवसांत आपले केस पांढरे झाले की काय? वृद्ध लोक वनवासात मरतात आणि शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला घर पाहण्यास न मिळाल्याबद्दल रडतात.”

“आपल्या फायद्यासाठी, आमचं नाव घेऊ नका. आम्हाला तुमच्या अहंकाराच्या लढाईतील प्याद व्हायचं नाही. उद्या तुमच्या बोटाला कुठेतरी दुखापत झाली आणि तुम्ही म्हणाल मला काश्मिरी पंडितांची वेदना समजली?” कृपया असं होतं नाही.” अशा शब्दांत पंडिता यांनी कंगनाला सुनावलं आहे.

दरम्यान, काश्मिरी पंडितांच्या सामुहिक निर्वासनावर आधारित असलेल्या विधू विनोद चोप्रा दिग्दर्शित ‘शिकारा’ या हिंदी चित्रपटाची कथा राहुल पंडिता यांनी लिहिली असून त्यांच्या चित्रपटाला प्रेक्षकांनी मात्र म्हणावा असा प्रतिसाद दिला नाही.