‘शिकाल तर टिकाल’ हे कुणीतरी उगाच नाही म्हणून ठेवलंय. शिक्षण, हा प्रत्येकाचाच अधिकार आहे. शिक्षणामुळे प्रत्येकासाठी नवी क्षितिजं खुली होतात, शिक्षण आपल्याला जगण्याचं नवं बळ आणि स्वतःची नवी ओळख निर्माण करण्याचं सामर्थ्य देतं. अशा या शिक्षणाचं महत्व अधोरेखित करणारा ‘शिक्षा’ हा लघुपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या लघुपटाच्या निमित्ताने गाव गाता गजाली या विनोदी मालिकेतून घराघरात पोहोचलेला खोडकर क्रिश म्हणजेच बालकलाकार सार्थक वाटवेही झळकणार आहे.

‘कलाश्री इंटरटेनमेंट’ निर्मित ‘शिक्षा’ या लघुपटाचे पोस्टर आणि ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला असून, त्याला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. मुख्य म्हणजे सतत खोड्या करणाऱ्या, काही ना काही खुरापती करणारा ‘क्रिश’ म्हणून ओळख प्राप्त असणारा सार्थक या लघुपटाच्या माध्यनातून एका वेगळ्याच भूमिकेत झळकणार आहे.

आपण नेहमीच आपल्या आजूबाजूला काही गरीब मुलांना काम करताना पाहतो, जसे रस्त्यावर वृत्तपत्र आणि खेळणी विकणे, बूट पॉलिश करणे, कचरा आणि प्लास्टिक किंवा भंगार गोळा करणे अशी कामे करताना अनेक लहान मुले आपल्या नजरेस रोज पडत असतात. त्यावेळी आपण त्यांना काही खाद्यपदार्थ, पैसे किंवा आपल्या मुलांनी वापरलेले जुने कपडे देऊ करतो. पण आपण त्यांच्या शिक्षणाच्या मूलभूत गरजेचा विचार कधी करतो का? तर नाही. हिंदी मध्ये ‘शिक्षा’ म्हणजे शिक्षण आणि मराठीमध्ये ‘शिक्षा’ म्हणजे दंड. त्या मुलांची गरज आणि आपण केलेली मदत लक्षात घेता या दोन वेगवेगळ्या भाषेतील एकाच शब्दाच्या दोन अर्थांचे केलेले चित्रण म्हणजे हा लघुपट.

वाचा : Maharashtra MSBSHSE SSC 10th Result 2018 : तुम्हालाही अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले आहेत?

‘शिक्षा’चं दिग्दर्शन राष्ट्रपाल प्रकाश काकडेने केलं असून निर्मिती महेश महादेव कांबळेने केली आहे. या लघुपटात सार्थक वाटवे सोबतच योगिता पाखरे आणि संतोष सावंत हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. लघुपटाचा एकंदर विषय हा समाजातील एका अत्यंत संवेदनशील मुद्द्याला हात घालणारा असल्याने हा लघुपट प्रेक्षकांची मनं जिंकण्यात नक्कीच यशस्वी ठरेल यात शंका नाही.