मुंबई पोलिसांनी बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती उद्योगपती राज कुंद्रा यांना अश्लील चित्रपटांची निर्मिती करुन मोबाईल अॅपवर प्रदर्शित केल्याप्रकरणी अटक केली आहे. सोमवारी पोलिसांनी ही कारवाई केली. मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी या प्रकरणाची माहिती दिली.

मुंबई पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी अश्लील चित्रपटांची निर्मिती करून मोबाईल अॅप्सवर प्रदर्शित करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. या प्रकरणात एका अभिनेत्रीला देखील अटक करण्यात आली होती. त्यानंतर राज कुंद्रा यांचे नाव समोर आले होते. चौकशीसाठी राज कुंद्रा यांना बोलवण्यात आले होते. सोमवारी अश्लील चित्रपटांची निर्मिती करणे आणि ते प्रदर्शित करण्याच्या आरोपाखाली राज कुंद्रा यांना अटक करण्यात आली आहे.

फेब्रुवारी २०२१ मध्ये राज कुंद्रा यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. राज कुंद्रा यांच्या विरुद्ध अश्लील चित्रपट तयार करुन सोशल मीडियावर पोस्ट केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर मुंबई पोलिसांनी राज कुंद्रा यांची चौकशी केली. चौकशीदरम्यान राज कुंद्रा यांच्याविरोधात काही पुरावे अढळल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली आहे. राज कुंद्रा यांच्यासोबतच या प्रकरणी एकूण ११ जणांना अटक करण्यात आली आहे.

राज कुंद्रा यांना पहिल्यांदाच अटक झालेली नाही. यापूर्वीही त्यांना अनेकदा कोर्टाची पायरी चढावी लागली होती. मार्च २०२० मध्ये राज आणि शिल्पा शेट्टी यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. ही तक्रार मुंबईतील एनआरआय सचिन जोशी यांनी दाखल केली होती. तसेच आयपीएल सट्टेबाजी प्रकरणातही राज कुंद्रा हे अडकले होते. त्या प्रकरणात राजस्थान रॉयल्स संघाला कारवाईलाही सामोरे जावे लागले होते.

काय आहे प्रकरण?

फेब्रुवारी महिन्यात मुंबई पोलिसांच्या एका पथकाने मढ येथील ग्रीन पार्क बंगलोवर धाड टाकली होती. याठिकाणी पॉर्नोग्राफिक शुटिंग होत असल्याच्या माहितीनंतर ही कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी पोलिसांनी पाच जणांना अटक केली होती. तर एका मुलीची सुटका केली होती. अटक करण्यात आलेल्या पाच जणांमध्ये दोन अभिनेत्यांचा, तर दोन तरुणींचा समावेश आहे. या दोन्ही तरुणी अभिनयाच्या क्षेत्रात नशिब आजमवण्यासाठी आल्या होत्या. मात्र, त्या पॉर्नोग्राफिक व्हिडीओ तयार करणाऱ्या प्रोडक्शन हाऊसच्या जाळ्यात अडकल्या. ही मोठी कारवाई केल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू केला होता.