काही दिवसांपूर्वी अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या संपूर्ण कुटुंबाला करोना झाला होता. शिल्पाने स्वत: सोशल मीडिया पोस्टद्वारे या संदर्भात माहिती दिली होती. आता शिल्पाच्या कुटुंबीयांनी करोनावर मात केली आहे. आज ‘ब्रदर्स डे’ निमित्त शिल्पाने मुलगा विवान आणि मुलगी समीशाचा एक क्यूट व्हिडीओ शेअर केला आहे. सध्या व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

‘सुपर डान्सर ४’ची परिक्षक शिल्पा शेट्टीने ट्विटर अकाऊंटवर समीशा आणि विवानचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये विवान नारळ पाणी पिताना दिसत आहे आणि समीशा ते घेण्यासाठी प्रयत्न करत असते. पण विवान अनोख्या पद्धतीने तिला नारळ पाणी देताना दिसतो. दरम्यान तो फ्रेंच स्टाइलमध्ये समीशाशी बोलताना दिसत आहे. शिल्पाच्या मुलांचा हा क्यूट व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हा व्हिडीओ शेअर करत शिल्पाने ‘माझ्या आयुष्यात माझे राखी भाऊ थोडे उशिरा आले. पण समीशा लकी आहे की तिच्याकडे तिचा भाऊ आहे. ब्रदर्स डेच्या शुभेच्छा’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे.

२१ मे रोजी शिल्पा आणि राजने विवानचा ९वा वाढदिवस साजरा केला. वाढदिवस साजरा करताना त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.