बॉलिवूड अभिनेत्री शिल्‍पा शेट्टीने आतापर्यंत अनेक भूमिका साकारल्‍या आहेत. अभिनेत्री, रिअॅलिटी शोची परीक्षक आणि दोन पुस्‍तकांच्‍या लेखनापासून आरोग्‍यदायी पाककलांसाठी तिचे स्‍वत:चे यूट्यूब चॅनेल, अशा विविध भूमिका तिने पार पाडल्‍या आहेत. एक उत्‍कट योगी आणि सक्रिय माता म्‍हणून ती या सर्व भूमिका अगदी उत्‍साहाने पार पाडते. शिल्‍पाला खाण्याचीदेखील खूप आवड आहे. ती आठवड्यातून किमान एकदा तरी चमचमीत जेवणाचा आस्‍वाद घेते. पण तिच्‍या आहारामध्‍ये एका घटकाचे प्रमाण कमी असते, तो म्‍हणजे साखर. ती ही गोष्‍ट तिच्‍या मुलामध्‍येदेखील बिंबवण्‍याचा प्रयत्‍न करत आहे.

इन्फोटेन्‍मेंट चॅनेल ‘सोनी बीबीसी अर्थ’च्‍या पहिल्‍या वर्धापन दिन साजरीकरणाच्‍या कार्यक्रमादरम्‍यान ती म्‍हणाली, ‘साखरदेखील एक प्रकाराचे व्‍यसन आहे आणि हे ऐकूनच खूप भयावह वाटते. साखर इतकी धोकादायक आहे की मी माझ्या मुलापासून साखर लांबच ठेवते. आज आपण अशा युगात राहत आहोत, जिथे प्रत्‍येक कॉर्नरवर एक तरी मॉल आहेच आणि त्‍या मॉलमध्‍ये लॉलीपॉप्‍स व गोड मिठाई असतातच. ही सर्व मिष्‍ठान्‍ने लहान मुलांना आकर्षून घेतात. पण त्‍यांना कोणते पदार्थ चांगले व कोणते खराब हे समजत नाही. म्हणूनच मी माझ्या मुलाला शक्यतो या सर्व गोष्टींपासून दूर ठेवते. मी त्‍याला समजवते की साखरेमुळे तू आळशी होशील. असे म्‍हणतात की एक चमचा साखर पुढील सहा तासांसाठी एखाद्याची रोगप्रतिकार शक्‍ती कमी करते. तर मग विचार कर साखरेचा तुझ्या संपूर्ण शरीरावर काय परिणाम होऊ शकतो.’ तिच्या या वक्तव्यावरून ती एक शिस्तीची आई असणार यात काही शंका नाही.