अभिनयासोबतच आपल्या फिटनेससाठी कायम चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे शिल्पा शेट्टी. ९० च्या दशकात आपल्या अभिनयाने प्रत्येकालाच भुरळ पाडणारी अभिनेत्री शिल्पा शेट्टीने काही वर्ष ब्रेक घेतला होता. पण आता १४ वर्षाच्या मोठ्या ब्रेकनंतर शिल्पा शेट्टी ‘हंगामा २’ मधून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणारेय. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता जावेद जाफरीचा मुलगा मीजान जाफरी, प्रणिता सुभाष आण अभिनेते परेश रावल सुद्धा मुख्य भूमिकेत दिसून येणार आहेत.

१४ वर्षानंतर पुन्हा एकदा रूपेरी पडद्यावर आपला अभिनयाचा जलवा दाखवण्यासाठी शिल्पा शेट्टी खूपच उत्साहित झालीय. तिच्या आगामी ‘हंगामा २’ चित्रपटासाठी तिने नुकतंच एका माध्यमाला मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना तिने आजवर कुठेच शेअर न केलेलं एक सीक्रेट देखील सांगितलं आहे.

१४ वर्षानंतरच्या कमबॅकवर काय म्हणाली शिल्पा शेट्टी?

या मुलाखतीत बोलताना अभिनेत्री शिल्पा शेट्टी म्हणाली, “१४ वर्षाच्या मोठ्या वनवासानंतर ‘हंगामा २’ चित्रपटातून मुख्य भूमिकेत पुन्हा एकदा एन्ट्री करतेय. याचा मला खूप आनंद होतोय. ज्या ज्या चित्रपटात माझं नाव ‘अंजली’ आहे तो चित्रपट सुपरहिट होतोच, असा माझा आतापर्यंतचा अनुभव आहे. या चित्रपटात सुद्धा माझं नाव ‘अंजली’च आहे. त्यामुळे हा चित्रपट सुद्धा सुपरहिटच होणार, असं मला वाटतं. हा चित्रपट थिएटरमध्ये नाही तर डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. तरीही मला विश्वास आहे की या चित्रपटाला सुद्धा प्रेक्षक पसंती देतील.”

 

मुलाने पाहिलेच नाहीत शिल्पाचे जुने चित्रपट

या मुलाखतीत एक सीक्रेट शेअर करताना शिल्पा शेट्टी म्हणाली, “माझं सुपरहिट गाणं ‘चुराकर दिल मेरा’ पाहिलं होतं त्याचवेळी माझे पती माझ्या प्रेमात पडले होते. तेव्हापासून तर ते माझे फॅन झाले होते. माझ्या मुलाबद्दल बोलायचं झालं तर त्याने माझे जुने कोणतेच चित्रपट पाहिले नाहीत. ‘हंगामा २’ मध्ये जे नव्या वर्जनमधलं ‘चुराकर दिल मेरा’ हे गाणं त्याने पाहिलंय. यात त्याने पहिल्यांदा त्याच्या आईला एका अभिनेत्रीच्या रूपात पाहिलं. हे थोडं निराळं वाटतंय पण यात मला आनंद वाटतो. आता मी पुन्हा अभिनयाकडे वळलीय तर आताच्या पिढीतील मुलांना, ज्यांना मी एक अभिनेत्री म्हणून परिचयाची नाही त्यांना आपलंसं करायचंय.”

‘हंगामा 2’ हा चित्रपट ‘हंगामा’ या पहिल्या चित्रपटाचा सिक्वल आहे. या चित्रपटाच्या टायटल सॉन्ग मध्ये शिल्पा अभिनेत्री हेलन यांच्या रुपात दिसून येणार आहे. येत्या २३ जुलै रोजी हॉटस्टार या डिजीटल प्लॅटफॉर्मवर स्टीम करण्यात येणार आहे.