शक्तिमान म्हणून लहानग्यांच्या मनावर राज्य करणारे अभिनेता मुकेश खन्ना यांच्या निधनाची सोशल मिडियावर चर्चा रंगू लागली होती. मात्र मुकशे खन्ना यांच्या निधनाची चर्चा ही केवळ अफवा असल्याचं समोर आलं आहे. मुकेश खन्ना यांनीच एक व्हिडीओ शेअर करत या अफवांचं खंडन केलं आहे.

मुकेश खन्ना यांच्या निधनाच्या अफवांमुळे सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र मुकेश खन्नांनी आपण अगदी ठीक असल्याचं सांगताच चाहत्यांच्या जीवात जीव आला. मीडियाला दिलेल्या मुलाखतीत मुकेश खन्ना यांनी आपली प्रकृती उत्तम असल्याचं सांगत या अफवांचं खंडन केलं आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असं ते म्हणाले. शिवाय या अफवा पसरवणाऱ्यांवर त्यांनी संताप व्यक्त केला आहे.” सोशल मीडियाची हिच समस्या आहे.” असं ते म्हणाले.

सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत मुकेश खन्ना म्हणाले, “तुमच्या आशिर्वादाने मी अगदी सुरक्षित आणि निरोगी आहे. मला करोनाची लागण झाली नसून मी कोणत्याही रुग्णालयात उपचार घेत नाहीय. मला माहित नाही ही अफवा कुणी पसरवली आणि ही अफवा पसरवण्या मागचं कारण काय? अशा खोट्या बातम्या पसरवून काही जण लोकांच्या भावनांशी खेळत आहेत.” असं ते या व्हिडीओत म्हणाले.

पुढे ते म्हणाले, ” अशा मानसिकरित्या अस्थिर लोकांचा कसा उपचार करावा? त्यांच्या या अशा वागण्यासाठी त्यांना कोण शिक्षा देणार? आता पुरे झालं. अशा खोट्या बातम्या आता थांबायला हव्यात.” असं म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला.

90 च्या दशकात दूरदर्शनवरील ‘शक्तीमान’ या मालिकेतून शक्तीमानची भूमिका साकारत मुकेश खन्ना यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहेत. तसचं ‘महाभारत’ या मालिकेतून त्यांनी पितामह भीष्म ही भूमिका साकारली आहे.