‘स्कॅण्डल्स’ हा शब्द बॉलीवूडला इतका घट्ट चिकटलेला आहे की एका प्रेमप्रकरणाच्या चर्चेचा धुरळा खाली बसेपर्यंत दुसऱ्याच्या प्रेमप्रकरणाची कुजबूज सुरु होते; आणि मग कलाकारांच्या व्यक्तिगत आयुष्यातली दडलेली अनेक गुपितं नव्याने समोर येतात. कधी त्यांच्या आत्मचरित्रांमुळे, कधी त्यांच्यावर अन्य लेखकांनी लिहिलेल्या पुस्तकांतून तर कधी ते स्वत:च मुलाखती किंवा समाजमाध्यमांतून आपल्या ‘एक्स’वर राग व्यक्त करतात आणि चर्चेची वावटळ पुन्हा काही दिवस न शमण्यासाठी उठते. सध्या याचा प्रत्यय नवाझुद्दीन सिद्दिकीने त्याच्या चरित्रात्मक पुस्तकातून दिलेल्या अनेक प्रेमकथांच्या कबुलीवरून जो कलगीतुरा रंगला आहे त्यावरून येतो आहे. केवळ नवाझच नव्हे तर दुर्दैवाने, हॉलीवूडमध्येही प्रसिद्ध निर्माते हार्वे वेन्स्टिन यांच्यावर मान्यवर अभिनेत्रींकडून झालेले लैंगिक छळवणुकीचे आरोप, त्यांची ऑस्कर अकॅडमीतून झालेली हकालपट्टी आणि त्यावर आपल्याकडेही असे अनेक हार्वे वेन्स्टिन आहेत असा प्रियांका चोप्रा, इरफानसारख्या मंडळींनी दिलेला दुजोरा यामुळे हॉलीवूडसह बॉलीवूडच्याही झाकल्या कोंबडय़ांनी डोकं वर काढलं आहे.

ऑक्टोबरचा हा उत्तरार्ध खरं म्हणजे बिग बजेट चित्रपटांच्या चर्चेचा असतो, मात्र त्या आघाडीवर सध्या बॉलीवूड-हॉलीवूड दोन्हीकडे शुक शुकाटच आहे. या परिस्थितीत हॉलीवूडच्या अग्रणींमध्ये नावाजलेल्या हार्वे वेन्स्टिन यांचा खरा चेहरा उघडा पडला. त्यांच्यावर अनेक अभिनेत्रींनी याआधी लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. मात्र इतकी वर्षे स्वत:ची कृष्णकृत्ये लपवून ठेवलेल्या हार्वेचं वास्तव अखेर जगासमोर आलं. त्यांच्यावर कडक खटले चालवले जावेत, अशीच इच्छा ज्युलियन मूरेसारख्या अभिनेत्रीने जाहीर व्यक्त केली आहे. हार्वे प्रकरणाचे पडसाद आपल्याकडे उमटले नसते तरच नवल. खरं म्हणजे या घटनेने हॉलीवूडमधील दिग्गज कलाकारांनाही पहिल्यांदाच बोलतं केलं. पण असे अनेक हार्वे बॉलीवूडमध्ये आहेत, असं सांगत प्रियांका चोप्राने पहिल्यांदा या चर्चेला सुरुवात करून दिली. प्रियांकापाठोपाठ अभिनेता इरफान खाननेही बॉलीवूडमध्येच नव्हे तर जवळपास प्रत्येक क्षेत्रात सर्रास लैंगिक शोषण केलं जातं, हे सांगून स्वत:ला आलेले अनुभव विशद केले आहेत. एकीकडे हार्वे प्रकरण तर दुसरीकडे नवाझुद्दीन सिद्दिकीच्या आयुष्यावर आधारित ‘अ‍ॅन ऑर्डिनरी लाईफ’ या रितुपर्णा चॅटर्जी लिखित पुस्तकातून पहिल्यांदाच जगासमोर आलेल्या त्याच्या प्रेमकथांनी आणखीनच गोंधळ उडवून दिला आहे.

या पुस्तकात नवाजने त्याच्या आयुष्यात आलेल्या तरुणी, त्यांच्याबरोबरची अफेअर्स याविषयी तपशीलवार माहिती दिली आहे. त्याच्या संघर्षांच्या काळातली त्याची पहिली पत्नी शीबा, पहिल्याच लग्नात शीबाच्या भावामुळे खावा लागलेला धोका, त्याआधी ज्युईश मॉडेलबरोबरचे प्रेमप्रकरण, न्यूयॉर्कमधील वेट्रेसबरोबर रंगवलेल्या रात्री, आत्ताची पत्नी अलियाशी असलेले आधीचे लिव्ह इन नाते, मध्यंतरीच्या काळात त्याची सहनायिका निहारिका सिंगशी जुळलेले सूत, पत्नी असतानाही निहारिकाबरोबर सुरू असलेला खेळ सगळ्याबद्दल नवाझने सांगितले आहे. त्याच्या या माहितीमुळे त्याच्या जनमानसांत आत्तापर्यंत रूढ असलेल्या प्रतिमेला धक्का बसला आहे. एकीकडे निहारिकाकडून आपल्याला फक्त शरीरसुखच हवे होते आणि ते तिच्या लक्षात आल्यानंतर तिने आपल्याला सोडून दिलं हे बरं झालं, असं सांगणाऱ्या नवाझचा हा नवाच चेहरा लोकांसमोर आला आहे. नवाझच्या या खुलाशांमुळे त्याची आत्तापर्यंत लपून असलेली ही प्रेमप्रकरणं अचानक बाहेर आली हे जसं खरं आहे. तसंच नवाझने आपली परवानगी न घेता या व्यक्तिगत गोष्टी जगासमोर आणल्याने निहारिकाने संताप व्यक्त केला आहे. चरित्र लिहून ते प्रकाशित करताना आपल्याशी कधीकाळी जोडल्या गेलेल्या व्यक्तींचा उल्लेख करण्याआधी त्यांची परवानगी घ्यायला हवी. मात्र नवाझने फक्त आपले चरित्र विकले जावे म्हणून स्त्रियांना लक्ष्य केले असल्याचा आरोप निहारिकाने केला आहे. नवाझुद्दीन सिद्दिकी आणि निहारिका सिंग यांचं प्रकरण नवाझच्या पुस्तकामुळे तरी बाहेर आलं, पण गेले काही महिने सतत या ना त्या कारणाने चर्चेत असलेलं हृतिक रोशन-कंगना राणावत हे प्रकरण अजूनही थांबायला तयार नाही.

इथे तर कंगनाने स्वत:च वेळोवेळी माध्यमांचा आधार घेत हृतिकने आपल्याला कशी मागणी घातली होती ते रोशन बाप-लेक वाईट आहेत आणि त्यांनी आपली जाहीर माफी मागायला हवी, हृतिकने कसा धोका दिला आहे हे जगाला ओरडून ओरडून सांगितले. परिणामी या दोघांनीही एकमेकांविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली, तपासा दरम्यानही आरोप-प्रत्यारोपांचा हा झंझावात असाच सुरू राहिला. अजूनही या दोघांच्या वादात नेमकं कोण खरं आणि कोण खोटं याचा शोध लावण्यात पोलिसांनाही यश आलेलं नाही. पण कंगनाचे आरोप थांबत नाहीत म्हणून हृतिकनेही आपले मौन सोडत तिच्याच पद्धतीने निवडक माध्यमांना जवळ करत आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. हृतिकच्याही आधी कंगनाने आदित्य पांचोलीबरोबरचे आपले संबंध जाहीर करत कारकीर्दीच्या काळात त्याने आपले कसे शोषण केले हे वेळोवेळी सांगितले. तेव्हाही कंगनाच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी पांचोली समोर आला नाही. तर त्याची पत्नी झरीना वहाब आणि मुलगा सूरज यांनी माध्यमांना असे काहीही घडले नसल्याचा निर्वाळा देत आपल्या वडिलांना सगळ्या दोषांतून मुक्त करण्याचा प्रयत्न केला. हृतिक आणि कंगनाचा वाद सुरू होण्याआधी हृतिक आणि सुझान खान यांच्या घटस्फोटाची घटना सामोरी आली. तेव्हा सुझान आणि अर्जुन रामपाल यांच्यातील तथाकथित प्रेमप्रकरणामुळे हे लग्न मोडले असा नवा तर्कवाद सुरू झाला. अखेर अर्जुन रामपालला या दोघांच्या विभक्त होण्याचा निर्णय पक्का झाला तेव्हा आपण भारतातच कसे नव्हतो हे खुलासेवार सांगावे लागले. हाच प्रकार अरबाझ खान आणि मलाईका अरोरा यांच्या घटस्फोटाच्या वेळीही झाला. मलायका आणि अर्जुन कपूर एकमेकांना कसे भेटतात, त्यांच्या प्रेमामुळे ‘खान’दान विशेषत: सलमान कसा रागात आहे याही गोष्टींना उधाण आलं होतं. फरहान अख्तरने अधुनाशी घटस्फोट घेतला तेव्हा श्रद्धा कपूर ते अदिती राव हैद्री अशा अनेकांबरोबर त्याची जोडी जमवली गेली.

एरव्हीही अफे अर्स किंवा स्कॅण्डल्स ही बॉलीवूडसाठी नवीन गोष्ट राहिलेली नाही. कित्येकदा चित्रपटाच्या निमित्ताने एक अभिनेता आणि अभिनेत्री दोघेही एकत्र आले की त्यांच्या संबंधांची चर्चा सुरू होते. चित्रपट संपला की हे संबंधही संपतात आणि चर्चाही थांबते. पुन्हा नव्या चित्रपटाबरोबर त्या कलाकाराच्या नव्या जोडीची चर्चा रंगते. ही गोष्ट बॉलीवूडच्या आघाडीच्या फळीलाही टाळता आलेली नाही. आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्रा ही जोडी दरवेळी अशा संशयकल्लोळाची धनी झालेली पाहायला मिळालेली आहे. सिद्धार्थ आणि आलियाचं प्रेमप्रकरण आहे असं अनेक जण छाती ठोकून सांगत असले, तरी या दोघांनी कधीही याला दुजोरा दिला नाही. मधल्या काळात आलियाचं नाव कित्येकदा वरुण धवनबरोबर जोडलं गेलं. तर ‘जेन्टलमेन’च्या निमित्ताने सिद्धार्थ जॅकलिनच्या अगदी जवळ आला आहे, या वृत्तांना उधाण आलं. सिद्धार्थवरून आलिया आणि जॅकलिनमध्ये वादाची ठिणगी पडल्याचंही अनेकांनी प्रत्यक्ष पाहिल्याचं सांगितलं. आलिया-सिद्धार्थ-जॅकलिन हा प्रेमाचा तिरंगी लढा चवीचवीने चघळून झाल्यानंतर अचानक सोनम कपूरने मागच्या         आठवडय़ात आयोजित केलेल्या दिवाळी पार्टीमध्ये आलिया-जॅकलिन यांच्यात कुठलीही शत्रुत्चाची भावना नाही, याचाही साक्षात्कार माध्यमांना झाला. त्यामुळे कित्येकदा बॉलीवूड कलाकारांची नावं दर चित्रपटामागे नव्या माणसाशी जोडली जातात. त्याचं सोयरसूतक ना कलाकारांना उरलं आहे ना प्रेक्षकांना..

पण स्कॅण्डल्स किंवा कु ठेतरी गडबड आहे.. असं स्वत:च दाखवून देण्याचा प्रयत्न कलाकारांकडून होतो किंवा त्यांच्यावर लिहिणाऱ्यांकडून होतो तेव्हा खऱ्या अर्थाने समाजात गंभीर चर्चा सुरू होते. कलाकारांची प्रसिद्ध होणारी आत्मचरित्रं किंवा चरित्रं ही या अशा अनेक वादांच्या जन्मासाठी कारणीभूत ठरली आहे. रेखावर आधारित यासीर उस्मान लिखित ‘रेखा : द अनटोल्ड स्टोरी’ या पुस्तकानेही असाच बवाल निर्माण केला होता. यासीरच्या या पुस्तकातून रेखाचे पती मुकेश अगरवाल यांचा तिच्या आयुष्यात झालेला प्रवास ते त्याची आत्महत्या असा तपशील वाचायला मिळाल्यानंतर अनेक गोष्टी नव्याने चर्चिल्या गेल्या. नंतरच्या काळात रेखाचे नाव जवळपास प्रत्येक कलाकाराबरोबर जोडले गेले होते. त्यात संजय दत्त आणि अक्षय कुमार या दोघांचाही समावेश होता, असा उल्लेख त्या पुस्तकात आहे. रेखा आणि संजय दत्त यांनी लपूनछपून विवाह केल्याच्या वृत्तांनी त्यावेळी इतका जोर धरला होता की, खुद्द संजयला अधिकृतरीत्या असे काहीही घडले नाही हे जाहीर करावे लागले होते, असा ठळक उल्लेख पुस्तकात असूनही हे प्रकरण गेल्या काही दिवसांत वेगवेगळ्या वृत्तांमधून फिरत राहिलं. शत्रुघ्न सिन्हा यांचे आत्मचरित्र प्रकाशित झाल्यानंतर त्यांचे आणि अभिनेत्री रिना रॉय यांचे प्रेमसंबंधही पुन्हा प्रकाशात आले. पण प्रत्येकवेळी संबंधित कलाकारांनी या विषयावर काहीही बोलणे टाळल्यानेच हे वाद चर्चेतच विरले.

बॉलीवूडमध्ये अफेअर्स किंवा तथाकथित प्रेमप्रकरणांच्याच चर्चा इतक्या रंगतात की त्यात अनेकदा इंडस्ट्रीत संघर्षांच्या काळात अभिनेता असो वा अभिनेत्री दोघांनाही ‘कास्टिंग काऊच’सारखे अनुभव येतात हे वेळोवेळी उघड होऊनही त्याविरोधात कधीच ठोस पाऊल उचलता आलेलं नाही. त्यामुळे बॉलीवूडमधला हा संशयकल्लोळाचा खेळ दरवेळी नव्या नाव-चेहऱ्यांनी रंगतो आणि काही काळ चर्चा होऊन तिथेच संपतो. हॉलीवूडमध्ये जशी हार्वे वेन्स्टेनवर कारवाई व्हावी म्हणून प्रयत्न होत आहेत, तसे प्रयत्न तर सोडाच विचारही बॉलीवूडमध्ये फारसा कोणी करताना दिसत नाही. त्यामुळे हा खेळ नेमेचि येणाऱ्या पावसाप्रमाणे रोजचाच झाला आहे.