टेलिव्हिजनच्या विश्वात एक विषय एकाने हातात घेतला की लागोपाठ तोच विषय सगळ्यांकडून एकाच वेळी वेगवेगळ्या पद्धतीने घेतला जातो. रिअ‍ॅलिटी शोजही त्याला अपवाद नाहीत. डान्सवरचे रिअ‍ॅलिटी शो एक सुरू झाला की लागोपाठ वेगवेगळ्या वाहिन्यांवर डान्स शोचं पीक दिसायला लागतं. सध्या तशी लहान मुलांच्या रिअ‍ॅलिटी शोची एकच लाट आली आहे. झी टीव्हीवर ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’, सोनी टीव्हीवर ‘सबसे बडा कलाकार’, ‘छोटे मियाँ धाकड’, ‘सुपर डान्स प्लस’, ‘इंडियाज बेस्ट ड्रामेबाज’ अगदी मराठीतही ‘ढोलकीच्या तालावर’सारख्या रिअ‍ॅलिटी शोजमधून लहान मुलांचा करिश्मा दिसू लागला. आत्तापर्यंत गुण्यागोविंदाने सुरू असलेल्या या सोहळ्यात रमलेल्या सगळ्यांनाच दिग्दर्शक शुजित सिरकारच्या ट्विटरवर केलेल्या मागणीने धक्का दिला आहे. लहान मुलांवरचे रिअ‍ॅलिटी शो तातडीने बंद करावेत, अशी मागणी शुजितने केली आहे. त्यांच्या या मागणीवरून पुन्हा एकदा रिअ‍ॅलिटी शोजमधील ‘बालजगत’ पुन्हा वादात सापडले आहे.

रिअ‍ॅलिटी शोजमधून काय किंवा एकूणच मालिका-चित्रपटांतून काम करण्यास लहान मुलांना मज्जाव केला पाहिजे, असा सूर गेले काही र्वष सातत्याने लावला जातो आहे. मात्र, नाटक-चित्रपट-मालिका-रिअ‍ॅलिटी शोज ते जाहिराती सगळ्याच माध्यमांमधून हे ‘बालजगत’ इतकं स्थिरावलं आहे की त्यांची स्वत:ची अशी एक प्रचंड अर्थव्यवस्था उभी राहिली आहे. त्यामुळे सरसकट मुलांना या माध्यमांमधून काम करण्यावर बंदी घालणे अशक्य आहे हे लक्षात आले असले तरी मधून मधून हा प्रश्न ऐरणीवर आल्याशिवाय राहात नाही. सध्या शुजित सिरकार यांच्या मागणीमुळे हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे खरा पण त्यावरही शुजितची बाजू घेणाऱ्यांचे प्रमाण अत्यल्पच असल्याचे दिसून येते आहे. पण अचानक लहान मुलांचे रिअ‍ॅलिटी शोज बंद करण्याची मागणी करण्यामागचे कारण काय हेही समजून घेणे गरजेचे आहे. आपल्या या मागणीमागचे कारणही सिरकार यांनी स्पष्ट  केले आहे. ‘आपण ज्या शोमध्ये सहभाग घेतो आहोत तो शो नेमका काय आहे, आपण तिथे सादरीकरण करतो आहोत म्हणजे काय करतो हे त्या मुलांनाही धड कळत नाही. शोमध्ये सहभागी होण्याची परवानगीही पालक देतात. मुलांना ते हवंय की नको आहे हे कळतच नाही. या शोजमधून आपली कला सादर करण्याचा ताण त्या मुलांवर इतका असतो की लहान वयात आपण त्यांची निरागसता, त्यांच्या मनाची निर्मळता घालवून बसतो आहोत’, असं सिरकार यांनी स्पष्ट केलं आहे. लहान मुलांच्या रिअ‍ॅलिटी शोजला मोठा प्रेक्षकवर्ग असल्याने अर्थकारण हा या शोजमागचा एकमेव उद्देश असल्याचा आरोपही सिरकार यांनी केला आहे.

शुजित सिरकार यांनी उपस्थित केलेला मुलांवरच्या दडपणाचा, तणावाचा मुद्दा याआधीही अनेकदा चर्चिला गेला आहे. काही वर्षांपूर्वी अशाच एका प्रतिष्ठित रिअ‍ॅलिटी शोमध्ये सादरीकरण करताना स्पर्धकाचा आवाजच गेल्याची घटना घडली होती. त्या वेळी शोजमधून परीक्षक ज्या कठोर भाषेत टीका करतात, मतं व्यक्त करतात त्यावर तीव्र नाराजी उमटली होती. कित्येकदा परीक्षकांच्या या टीकाटिप्पणीमुळे स्पर्धक तणावाखाली येतात, हताश होतात. त्यामुळे रिअ‍ॅलिटी शोजसाठी परीक्षक निवडतानाही काळजी घेतली जाऊ लागली. मालिका-चित्रपटांच्या चित्रीकरणात सहभाग घेणाऱ्या मुलांच्या बाबतीतही चित्रीकरणाच्या वेळा आणि इतर नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक असल्याकडे लक्ष वेधण्यात आले होते. मात्र त्याबद्दलही कित्येकदा आवाज उठवूनही बदल झालेला दिसत नाही.

याउलट, रिअ‍ॅलिटी शोजच नव्हे तर दैनंदिन मालिकांमधून काम करणाऱ्या मुलांचा टक्काही वेगाने वाढलेलाच दिसून येतो आहे. सिरकार यांच्या विधानात अगदीच तथ्य नाही, असे म्हणणे धाष्टर्य़ाचे ठरेल पण म्हणून सरसकट बंदी आणण्याची त्यांची मागणी या शोजमधून परीक्षक, सूत्रसंचालक म्हणून काम करणाऱ्या सहकलाकारांनाही फारशी रुचलेली दिसत नाही. ‘छोटे मियाँ धाकड’सारख्या शोमध्ये परीक्षक म्हणून काम पाहणाऱ्या अभिनेत्री नेहा धुपिया हिने हे रिअ‍ॅलिटी शोज या लहान मुलांना आपली कलाप्रतिभा सिद्ध  करण्यासाठीचे मोठे व्यासपीठ असल्याचे म्हटले आहे. सिरकार यांच्या मताबद्दल आदर आहे पण या शोजची दुसरी बाजूही लक्षात घेतली पाहिजे, असे नेहाचे म्हणणे आहे. सध्याचं जगच स्पर्धेचं असल्याने अशा शोमधून नऊ ते दहा र्वष आधीच एखाद्याला आपल्या करिअरची दिशा मिळत असेल तर ते खूप महत्त्वाचे व्यासपीठ आहे. शिवाय, या शोमध्ये सहभागी होणाऱ्या अनेक मुलांची चित्रीकरणादरम्यान शाळा बुडत असली तरी त्यांचे पालक सेटवर खासगी शिक्षक ठेवून किंवा खासगी शिकवणीचा वेळ निश्चित करून त्या वेळात त्यांचा अभ्यास पूर्ण करून घेतात. सेटवरही त्यांची पुरेपूर काळजी घेतली जाते आणि आत्ताच्या मुलांनाही ते काय करतात हे माहिती असते, असे तिने म्हटले आहे. ‘ढोलकीच्या तालावर’ या शोमध्ये छोटय़ा स्पर्धकांना लावणी नृत्य शिकवून त्यांच्याबरोबरीने नृत्य करणाऱ्या प्रशिक्षिकोंपैकी एक असलेल्या अपूर्वा उंडाळकरनेही छोटय़ा मुलांचे मूड्स सांभाळूनच त्यांच्या तालमी आम्ही घेतो. त्यांची काम करायची तयारी नसेल तर त्यांच्या मनाविरुद्ध कधीच त्यांना शिकवलं जात नाही, असं स्पष्ट केलं.

आपल्या मुलांना त्यांच्या वयाच्या आठव्या-नवव्या वर्षीच त्यांचे कलागुण दाखवणारे, त्यांना त्यांच्या क्षेत्रातील मान्यवरांपर्यंत पोहोचवणाऱ्या या शोजचं व्यासपीठ मिळत असेल तर ती त्यांच्यासाठी खूप मोठी संधी ठरते, असं या स्पर्धकांच्या पालकांचं म्हणणं आहे. सिरकार मात्र आपल्या रिअ‍ॅलिटी शोजच्या मुद्दय़ावर ठाम आहेत. ‘इंडियाज बेस्ट ड्रामेबाज’, ‘सबसे बडा कलाकार’सारख्या शोमधून त्यांच्या वयाला शोभणारही नाहीत असे संवाद, दृश्ये ही मुलं लोकांसमोर सादर करताना दिसतात. इतक्या लहान वयात मोठमोठय़ा गायकांनी गायलेली गाणी त्यांनी हुबेहूब गाणं हेही चुकीचंच असल्याचं मत मानसोपचारतज्ज्ञ व्यक्त करतात. मात्र हल्ली इंटरनेट, मोबाइल, टीव्ही यांमुळे लहान मुलांपर्यंत हे जग फार लवकर पोहोचतं. चित्रपटांमधील गाणी-संवाद त्यांच्यापर्यंत सहज पोहोचतात. त्यामुळे फक्त शोजमधून काम करण्यावर बंदी घालून काय उपयोग, असाही उलट सवाल केला जातो आहे. ‘ढोलकीच्या तालावर’मध्ये समृद्धीने सहभाग घेतला असला तरी ते फक्त तिच्या आवडीमुळे आहे. तिथली हार-जीत म्हणजे आयुष्य नाही. आपल्याला शिकायचे आहे हे तिला आधीच समजावून सांगितलेले आहे आणि तिला तेवढीच मोकळीकही दिलेली आहे. त्यामुळे तीही आवडीने आणि कुठल्याही दडपणाविना या शोमध्ये काम करते आहे, असे तिची आई शुभांगी शेडगे यांनी सांगितले. त्यामुळे मुलांच्या रिअ‍ॅलिटी शोजवर काही एक नियंत्रण आवश्यक आहे हे वास्तव आहे. मात्र सरसकट बंदी हा पर्याय कोणालाच मान्य नसल्याने सिरकार यांनी उपस्थित के लेल्या मुद्दय़ांचं भिजतं घोंगडं असंच कायम राहणार!