27 February 2021

News Flash

नष्टचर्य

एखाद्या गोष्टीत माणूस अडकतो आणि मग त्यातून बाहेर पडण्याऐवजी पुन:पुन्हा अडकत जातो.

|| सुहास जोशी

एखाद्या गोष्टीत माणूस अडकतो आणि मग त्यातून बाहेर पडण्याऐवजी पुन:पुन्हा अडकत जातो. एकातून दुसरे, दुसऱ्यातून तिसरे असे करत सुरुवातीस किरकोळ वाटणारा गुंता आणखीनच वाढत जातो. त्या गुंत्याचे धागेदोरे इतके लांबवर पसरत जातात की त्याचा पाठलाग करणारादेखील अखेरीस थकून जातो. आर्थिक, शारीरिक नुकसान होतच राहते. गुंता काही प्रमाणात सुटत जातो, पण नवीन गुंता तयार असतोच. ‘यूएसए नेटवर्क’वरील ‘शूटर’ ही सिरीज याच वाटेने जाणारी आहे. ‘पॉइंट ऑफ इम्पॅक्ट’ नावाच्या कादंबरीवर आधारित ‘शूटर’ नावाचा चित्रपट २००७ साली प्रदर्शित झालेला होता. ही सीरिज त्या चित्रपटावर बेतलेली आहे. अमेरिकेत लोकप्रिय असलेली ही सिरीज आपल्याला वेबच्या माध्यमातून भारतात पाहायला उपलब्ध आहे. नुकताच या सिरीजचा शेवटचा भाग प्रदर्शित झाला आहे. तीन सीझनमधील ही वेबसिरीज शस्त्र बाजार, अमली पदार्थ अशा अनेक मार्गाने अमेरिकेच्या राजकारणात, प्रशासनातील हस्तक्षेप दाखवण्याचा प्रयत्न करते. याची रचना काहीशी हॉलीवूड चित्रपटांप्रमाणेच आहे.

बॉब ली हा तसा तरुणपणी सैन्यातून निवृत्त झालेला नेमबाज. छानसं घर घेऊन पत्नी आणि मुलीसोबत राहणारा हा सैनिक. एकेदिवशी त्याचा सैन्यातील वरिष्ठ अधिकारी त्याच्याकडे येऊ न त्याच्या कौशल्याची देशाला गरज असल्याचे सांगतो. हा वरिष्ठ अधिकारी अध्यक्षांच्या सुरक्षा पथकाचा प्रमुख आहे. लांबवरून गोळी झाडून अध्यक्षांचा खून होण्याची शक्यता असल्यामुळे तो बॉब लीला तांत्रिक मदतीची गळ घालतो. बॉब ली लांबवरून अचूक लक्ष्यभेद करण्यात तरबेज असतो, त्यामुळे तोच अध्यक्षांवरील नेमबाजीचे संभाव्य ठिकाण ओळखू शकतो. बॉब ली हा खून होऊ  नये म्हणून प्रयत्न करतो, मारेकरी गोळी झाडतात. पण अमेरिकी अध्यक्षाऐवजी युक्रेनच्या अध्यक्षांचा खून होतो. आणि या गोंधळात बॉब ली लाच खुनाच्या आरोपात अटक होते. तुरुंगात त्याला रशियन मदत करतात. कारण युक्रेनचा काटा निघालेला असतो. दुसरीकडे बॉब लीला संपवण्याचा कट होतो. यात सीआयएचादेखील हात असतो. कारण त्यांनी कधी काळी सैन्याच्या मदतीने एका गुप्त संघटनेच्या आणि दुसऱ्या देशांच्या मार्गाने अमली पदार्थ आणि बऱ्याच गोष्टींची हेराफेरी सुरू केलेली असते. आता त्या संघटनेने प्रचंड रूप घेतलेले असते. बॉब लीचे काम यामुळे आणखीनच जटिल होते. त्यातून तो नेहमीच सर्व नायक जिंकतात तसा बाहेर पडतो. पण पुढच्या टप्प्यात त्याच्या सैन्यातील युनिटमधील सर्व सैनिक एकत्र आलेले असताना त्यांच्यावर बॉम्बहल्ला होतो. हा हल्ला का होतो याचा पाठपुरावा करताना तीस वर्षांपूर्वी झालेल्या आपल्या वडिलांच्या खुनाचा मागोवा त्याला घ्यावा लागतो. या चालू घडामोडींचा संबंध बॉब ली सैन्यात असताना त्याच्या युनिटने अफगाणिस्तान अमली पदार्थाच्या विरुद्ध केलेल्या कारवाईशीदेखील असतो. गुप्तपणे कार्यरत असलेली कट्टरवादी संघटना, तिने ताब्यात घेतलेल्या अमेरिकी प्रशासनातील मोक्याच्या जागा, जणू काही समांतर यंत्रणाच चालवल्यासारखे हे संघटन उद्ध्वस्त करणे सहजसोपे नसते.

टिपिकल हॉलीवूड धाटणीचे हे कथानक असले तरी त्याला अतिशय पद्धतशीरपणे मांडलं आहे. प्रत्येक भागात कथानक व्यवस्थित पुढे जात राहते. महत्त्वाचे म्हणजे प्रेक्षकांना नवीन काही तरी खाद्य मिळालेले असते. हे मिळालेले खाद्य जसा गुंता सोडवत असते, तसेच बॉब ली समोरचे आव्हान वाढवत राहते. त्यामुळे बॉब ली असा आरामात कुठल्यातरी पबमध्ये बसून काहीतरी डावपेच करतोय असं होत नाही. त्याला सतत कशाच्या ना कशाच्या मागे पळत राहावे लागते. आणि त्यातच त्यांच्या वडिलांच्या खुनाचे रहस्य उलगडताना त्याला खूप मानसिक धक्के आणि त्रासदेखील सहन करावे लागतात. कथानकाचा हा बाज या मालिकेसाठी खऱ्या अर्थाने फायदेशीर ठरणारा आहे. बॉब लीच्या मागे जणूकाही नष्टचर्यच लागले आहे अशी ही रचना केली आहे.

जाता जाता अति उजवे कट्टरतावादी आणि परदेशी व अमली पदार्थासारखे व्यापार यांचे लागेबांधे कसे असतात असा एक दृष्टिकोन द्यायचा प्रयत्न यातून होतो. पण तो अगदी शेवटच्या टप्प्यावर. तोपर्यंत केवळ एक रहस्य उलगडणारी कथा अशीच याची मांडणी आहे. आणि त्यामध्ये जी काही गृहीतके पकडून कथा सांगितली जाते, त्यातून फार वास्तव दर्शन होत नाही, तसेच येथेदेखील होते. त्यामुळे केवळ एक करमणूक म्हणूनच पाहायला हरकत नाही, इतकेच.

  • ऑनलाइन अ‍ॅप – नेटफ्लिक्स
  • सीझन – १, २ आणि ३.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 9, 2018 1:47 am

Web Title: shooter netflix
Next Stories
1 धुरंधरांची थोरवी प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी..
2 Happy Birthday Akshay Kumar : बॉलिवूडच्या ‘खिलाडी’बाबत काही रंजक गोष्टी
3 ‘जन गण मन’चे सूर कानावर पडताच ऐश्वर्याचे डोळे भरून येतात तेव्हा…
Just Now!
X