गेल्या वर्षी मार्च महिन्यात चित्रीकरणापासून सगळेच व्यवहार थंडावले आणि मालिका-चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या तंत्रज्ञ-कर्मचाऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले. सप्टेंबर महिन्यात राज्य सरकारने सशर्त चित्रीकरणाला परवानगी दिली. मालिका-चित्रपटांचे चित्रीकरण सुरू झाले, मात्र लोकल नसल्याने अनेक कलावंत-तंत्रज्ञांना सेटच्या आसपासच सोय करावी लागली किं वा बस, टॅक्सी अशा वाहनांचा आधार घेत लांबलचक आणि खर्चीक प्रवास करून सेट गाठावा लागत होता. १ फेब्रुवारीपासून लोकल सर्वसामान्यांसाठीही सुरू होत आहेत, त्यामुळे सेटवर लवकर पोहोचण्यासाठी किं वा उशिराने निघणाऱ्यांना लोकल सेवा खूप फायदेशीर ठरणार आहे. त्यामुळे पैशांचीही बचत होईल, मात्र अजून सकाळच्या वेळेत लोकलसेवा उपलब्ध नसल्याने त्याचा पूर्णपणे लाभ घेता येईल का? याबद्दल मालिका-चित्रपट विश्वात काम करणारे कलावंत-तंत्रज्ञ साशंक आहेत.

‘वेळेची आणि पैशांची बचत’

मी बदलापूरला राहात असून आठवड्यातून चार दिवस चित्रीकरणाच्या निमित्ताने मीरा रोडला जावे लागते. लोकलमधून प्रवासाची सुविधा नसल्याने मी बदलापूर ते ठाणे आणि ठाणे ते बोरिवली अशा दोन बस बदलून जातो. परिणामी अनेक वेळा सेटवरही उशीर व्हायचा. यात माझे दररोज चारशे रुपये याप्रमाणे बारा हजार रुपये प्रवासातच खर्च होत होते. मला मिळणाऱ्या मानधनातील अर्धा हिस्सा हा प्रवासावरच खर्च होत होता. आता लोकल सर्वसामान्य प्रवाशांसाठी सुरू झाल्याने वेळेची तसेच पैशांचीही बचत होईल.  – विराज जगताप, साहाय्यक दिग्दर्शक – महाराष्ट्राची हास्यजत्रा

‘वेळेवर पोहोचता येईल’

मी डोंबिवलीला राहात असून चित्रीकरणामुळे कधी अंधेरी तसेच मालाड अशा दोन्ही ठिकाणी जावे लागते. कधी टॅक्सी तर कधी बस अशा तºहेने मी चार ते पाच महिने प्रवास केला. टॅक्सी तसेच बससाठी रोजचा होणारा हजार रुपये खर्च परवडत नसल्याने मी जवळपास राहणाऱ्या नातेवाईकांकडेही काही दिवस राहिलो. मात्र नंतर करोनाच्या धास्तीने त्यांनीही राहण्यास नकार दिला. परिणामी मला काही वेळेस सेटवरच रहावे लागले, मात्र आता लोकल सुरू झाल्याने प्रवासाचा वेळही वाचेल तसेच पैशांचीही बचत होईल आणि कामास विलंब लागणार नाही. – भाग्येश पाटील, कलाकार – अग्गंबाई सासूबाई

‘दुपारी १२ पर्यंत लोकल सेवा हवी’

मालिका-चित्रपटांच्या सेटवर काम करणारे अनेक जण मीरा रोड, विरार, वसई अशा उपनगरांतून येतात. टाळेबंदीच्या काळात प्रत्येकाने खर्च परवडत नसतानाही बस किं वा ओला टॅक्सीचा आधार घेत सेटवर पोहोचण्याची कसरत आत्तापर्यंत के ली आहे. सेटवर ७ वाजताची शिफ्ट असेल तर निर्मितीची व्यवस्था सांभाळणाऱ्या आमच्यासारख्या तंत्रज्ञांना त्याच्याआधी दोन तास लवकर सेटवर पोहोचावे लागते. प्रवासालाही खूप आधीपासून सुरुवात करावी लागते. निदान आता लोकल सुरू झाल्या आहेत तर दुपारी १२ वाजेपर्यंत आणि संध्याकाळी ६ नंतर प्रवास करण्याची मुभा मिळायला हवी. जेणेकरून आमचा आर्थिक ताण आणि प्रवासाची दगदग कमी होऊ शके ल. -धनंजय जाधव, प्रॉडक्शन कं ट्रोलर – एस एन्टरटेन्मेट

‘लोकलवरच अवलंबून’

मी विविध मालिकांमध्ये छोट्या भूमिका साकारतो. त्यामुळे चित्रीकरणासाठी कल्याणवरून ठाणे, मीरा भाईंदर, मालाड, गोरेगाव अशा ठिकाणी जावे लागते. माझ्याकडे स्वत:चे वाहन नसल्याने पूर्णत: लोकल गाड्यांवरच अवलंबून आहे. राज्य शासनाच्या परवानगीनंतर आता लोकल प्रवास सर्वसामान्य प्रवाशांसाठी खुला झाला आहे, मात्र अजूनही मर्यादित वेळा असल्याने येण्या-जाण्यास त्रास होऊ शकतो. – भूषण पगारे, अभिनेता

‘वेळेची मर्यादा नसावी’

मी ठाण्याला राहात असून विविध नाटक आणि मालिकांसाठी प्रकाशयोजनेचे काम करतो. माझ्याकडे स्वत:ची गाडी नसल्याने लोकलनेच प्रवास करावा लागतो. एका ठिकाणचे काम झाल्यावर गाडीपेक्षा लाइट्स लोकल ट्रेनने आणणे जास्त सोयीचे असते. तेवढा वाहतुकीचा खर्चही वाचतो. राज्य सरकारने वेळेची अट ठेवल्याने माझ्यासारख्या काम करणाऱ्या अनेक कालाकार तंत्रज्ञांना अडचणीचे ठरू शकते. कारण आमची येण्याची वेळ अनिश्चित असते. त्यामुळे राज्य सरकारने वेळेची मर्यादा काढून टाकावी. – देवाशीष भरवडे, प्रकाश योजनाकार