चित्रपट समिक्षक व प्रेक्षकांकडून दाद मिळवणारा ‘जलिकट्टू’ हा चित्रपट ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर पडला असला तरीदेखील ‘बिट्टू’ या लघुपटाने बाजी मारली आहे. या लुघपटाने पहिली फेरी पार केली आहे. त्यामुळे आता तो लाईव्ह अ‍ॅक्शन फिचर फिल्म या विभागात नामांकन मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. ऑस्करसाठी भारताकडून ‘बिट्टू’ हा लघुपट पाठवण्यात आला होता. विशेष म्हणजे या चित्रपटाची निर्मिती एकता कपूरने केली आहे.

करिष्मा दुबे दिग्दर्शित या लघुपटाची पटकथा आणि अभिनय सरस ठरल्यामुळे हा लघुपट या स्पर्धेत लोकप्रिय ठरला आहे. या फिल्ममध्ये आरोही पटेल, मेहुल सोलंकी, हेमांश शाह आणि मौलिक नायक यासारखे कलाकार झळकले आहेत. भारताव्यतिरिक्त अमेरिका आणि युरोपमध्ये इंग्रजी भाषांतर करुन हा लघुपट प्रदर्शित करण्यात आला.

दरम्यान, करिष्मा देव दुबे यांनी दिग्दर्शित केलेला ‘बिट्टू’ हा लघुपट पुढच्या फेरीत पोहोचला आहे. ‘दा यी’, ‘फीलिंग थ्रू’, ‘दी ह्य़ूमन व्हॉइस’, ‘दी किक्सलेड कॉयर’, ‘दी लेटर रूम’, ‘दी प्रेझेंट’, ‘टू डिस्टंट स्ट्रेंजर्स’, ‘दी व्हॅन’ व ‘व्हाइट आय’ हे लघु चित्रपट पहिल्या दहामध्ये आहेत. यापूर्वी आशुतोष गोवारीकर यांचा ‘लगान’ हा चित्रपट २००१ मध्ये अंतिम फेरीत जाऊन बाद झाला होता.