rajkaran gela Mishit marathi movie on April 19 in theaters
‘राजकारण गेलं मिशीत’ १९ एप्रिलला चित्रपटगृहात
Bijay Anand on Maidaan vs Bade Miyan Chote Miyan clash
सोनाली खरे तिची लेक अन् पती, तिघांचे दोन सिनेमे एकापाठोपाठ प्रेक्षकांच्या भेटीला; बिजय त्यांच्या चित्रपटाबद्दल म्हणाले…
amruta khanvilkar
‘नवनव्या भूमिकांचे आव्हान स्वीकारण्यात आनंद’
artificial intelligence in indian movie
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भारतीय चित्रपट

हिंदी बिग बजेट चित्रपट आला की त्यांनी मुंबईसह अन्य उपनगरांतील चित्रपटगृहांमधील सारे शो बुक करणे हे नित्याचे समीकरण होऊन बसले आहे. कित्येकदा हा वाद दोन हिंदी मोठे चित्रपट जरी एक मेकांसमोर आले तरी उद्भवतो. आणि यातून हिंदी चित्रपटकर्मीमधला आपापसातला दोस्ताना बिघडून एकमेकांचे कट्टर वैरी झाल्याचे किस्सेही ज्ञात आहेत. मात्र हिंदीत काहीही झाले तरी त्यांची बाजारपेठ महाराष्ट्रापुरती मर्यादित नाही. उलट, मराठी चित्रपटांना महाराष्ट्र सोडून कुठली बाजारपेठ नसल्याने वर्षांतील कुठल्याही दिवशी मराठी चित्रपट प्रदर्शित झाला तरी त्यांना प्राईम टाईम शोज मिळायलाच हवेत. त्यासाठी दरवेळी वादाची परिस्थिती निर्माण होण्यापेक्षा ठोस उपाय निर्माण व्हायला हवा आणि त्यासाठी मराठी चित्रपट निर्माते एकत्रितरित्या प्रयत्न करणार आहेत.

केवळ हिंदी – मराठी नव्हे तर एकूणच चित्रपटसृष्टीच्या दृष्टिकोनातून हे वर्ष आर्थिकदृष्टय़ा सुखावर ठरलेले नाही. अनेक बिग बजेट चित्रपट दणक्यात आपटले. तर निदान वर्षांच्या अखेरीस ‘पद्मावती’सारखा चित्रपट व्यवसाय करेल, अशी गणितं होती तो प्रदर्शितच झाला नसल्याने चित्रपटगृहांचा दुष्काळ वर्षांखेरीसही कायम राहिला आहे. अशा परिस्थितीत सलमान खानचा ‘टायगर जिंदा है’ चित्रपट हा एकमेव बुडत्याला काडीचा आधार या तत्वाप्रमाणे चित्रपटगृहांसाठी आधारभूत ठरला आहे. हिंदीप्रमाणेच मराठीतही काही चित्रपट वगळता निर्मितीचा आकडा वाढला असला तरी व्यवसायाचा आकडा पल्लेदार झालेला नाही. त्यामुळे यावर्षीचा बहुचर्चित चित्रपट ‘देवा’ प्रदर्शित होईल आणि किमया करेल, ही अटकळ होती. मात्र सेन्सॉरच्या नियमामुळे १ डिसेंबरला प्रदर्शित होणारा चित्रपट या शुक्रवारी ‘टायगर जिंदा है’ बरोबर प्रदर्शित झाला असला तरी हिंदीच्या मक्तेदारीमुळे चित्रपटगृह मिळवण्यापासून या चित्रपटाला अडचणींचा सामना करावा लागला आहे. मराठी चित्रपटांना मल्टिप्लेक्समध्ये प्राईम टाईम शो दिलेच पाहिजेत, हा सरकारी नियम असला तरी प्रत्यक्षात हिंदीतील मोठा चित्रपट आल्यानंतर या नियमाला हरताळ फासला जातो हा मराठी चित्रपटकर्मीचा अनुभव आहे. मराठी चित्रपटांना केवळ काही चित्रपटगृहे किंवा शो मिळून पुरेसे ठरत नाही तर त्यांना ‘प्राईम टाईम’ शो मिळाले तरच ते फायेदशीर ठरतात. मात्र हिंदी आणि मराठी चित्रपटांसाठीचा ‘प्राईम टाईम’ वेगवेगळा आहे. मुंबई-पुण्यासारख्या शहरांत ‘प्राईम-टाईम’ म्हणजे साधारण दुपारनंतरचे शोज असतात मात्र जिल्हयांच्या ठिकाणीही निमशहरी भागात हेच शो रात्री ठेवून चालत नाही. तिथे संध्याकाळी दुकाने-बाजारपेठ लवकर बंद होत असल्याने रात्री चित्रपटांचे शो नसतात. त्यामुळे मराठी चित्रपटांसाठीचा ‘प्राईम टाईम’ नेमका कशाप्रकारचा हवा हेही लक्षात घेऊन त्यांना त्यापध्दतीने शो बुक करावे लागतात, अशी माहिती जनसंपर्क अधिकारी गणेश गारगोटे यांनी दिली.

तर ग्रामीण भाग असेल किंवा मुंबई-पुण्यासारखी शहरे मराठी चित्रपटांना प्राईम टाईम म्हणजे साधारणपणे एक नंतरचेच शो प्रामुख्याने बघावे लागतात. फक्त शोज घेताना मला जर दोन शो हवे असतील तर मग एखादा बारा-एकचा आणि मग एक संध्याकाळचा असं काहीसं वर्गीकरण करून ते नियोजन करावं लागतं, अशी माहिती निर्माते संजय छाब्रिया यांनी दिली. हिंदीमध्ये जर मग अशावेळी मोठा चित्रपट प्रदर्शित झाला तर अडचणी येतातच अशावेळी निर्मात्यांचे नियोजन महत्वाचे ठरते. एरव्हीही मराठीत कौटुंबिक चित्रपटांची संख्या जास्त असल्याने सकाळच्या वेळेत कोणी चित्रपट पाहू शकत नाही. कामावरून मंडळी घरी येतात त्यानंतरच्याच शोना हजेरी लावली जाते. शनिवार-रविवारच्या शोजना फारशा अडचणी येत नाहीत. मात्र इतरवेळी शोजच्या वेळा आणि संख्या यांचा काटेकोर विचार करावा लागतो. दुसरं म्हणजे मराठी चित्रपटांना तिकीटाचे दरही फारसे वाढवता येत नाहीत. ४०० रुपयाचे तिकीट ठेवले तर प्रेक्षकांची संख्या घटणारच आहे. त्यामुळे जास्तीत जास्त प्रेक्षकसंख्या मिळवून देणाऱ्या शोजच्या वेळांना प्राधान्य द्यावं लागतं, असेही छाब्रिया यांनी सांगितले. मात्र मुळातच त्यासाठी निर्मात्यांनी आपल्या चित्रपटांचं नियोजन काटेकोर करायला हवं, हा मुद्दा त्यांनी आग्रहाने मांडला. दरवेळी चित्रपटगृहांना दोष देऊन उपयोग नाही. कुठल्या चित्रपटाचे शोज लावायचे हा त्यांचा अधिकार आहे, व्यवसायाचं गणित लक्षात घेता ज्या चित्रपटाला प्रेक्षक जास्त त्याचे शो जास्त हे त्यांचं गणित योग्यच असतं, असंही त्यांनी सांगितलं. मात्र निर्मात्यांनी कितीही नियोजन करायचं ठरवलं तरी अनेकदा शुक्रवारी चित्रपट प्रदर्शित होतो त्याच्या दोन दिवस आधीच मराठी निर्मात्यांच्या हातात चित्रपटगृह आणि शोजची यादी मिळते. त्यासाठी कितीही आधी प्रयत्न केले तरी ते बुक करता येत नाहीत, अशी माहिती निर्माते नितीन वैद्य यांनी दिली.

मराठी चित्रपटांच्या प्राईम टाईमचा मुद्दा वास्तव आहे, अनेक निर्मात्यांना शो मिळवण्यासाठी अडचणी येतात, हे निर्मात्यांना मान्य आहे. अशावेळी राजकीय पक्षांकडे जाऊन प्रश्न सोडवण्याचा मार्ग बदलला पाहिजे, असे मत नितीन वैद्य यांनी व्यक्त केले. राजकीय पक्ष मराठी चित्रपटांना नेहमी मदत करत आले आहेत मात्र सातत्याने त्यांच्याकडे जात राहिलो तर या समस्येला राजकीय वळण लागेल. त्यापेक्षा मराठी चित्रपट निर्मात्यांनी एकत्रित येऊन हिंदी चित्रपट निर्माते, स्टुडिओचे अधिकारी यांच्याशी बोलून हा प्रश्न सोडवायला हवा. आणि तसे प्रयत्न आता आम्ही करत आहोत, असे वैद्य यांनी सांगितले. याआधीही हिंदीत रोहित शेट्टीसारख्या दिग्दर्शकाने मराठी चित्रपटांनाही शोज मिळतील, याची काळजी घेत आपले चित्रपट प्रदर्शित केले होते. ‘दुनियादारी’ला चांगला प्रतिसाद मिळत असूनही ‘चेन्नई एक्स्प्रेस’ प्रदर्शित होतो आहे म्हटल्यावर ‘दुनियादारी’चे शोज चित्रपटगृहांनी कमी केले होते. त्यावेळी राज ठाकरे यांच्या भेटीने हा मुद्दा सोडवण्यात आला होता. तर त्यानंतर ‘रेगे’ आणि ‘सिंघम रिटर्न्‍स’ एकत्र प्रदर्शित होणार म्हटल्यावर रोहित शेट्टी आणि महेश मांजरेकर, रवी जाधव, अभिजीत पानसे यांनी एकत्र परिषद घेऊन चित्रपटगृह आणि शोचा मुद्दा सामोपचाराने सोडवण्यावर भर दिला होता. एखादा हिंदी चित्रपट गाजल्यानंतर जसे मराठी चित्रपटांचे शो कमी होतात तसेच मराठी चित्रपट गाजला आणि हिंदी पडला तर त्याचे शोजही कमी होतात. ‘टय़ुबलाईट’ प्रदर्शित झाल्याने ‘मुरांबा’चे शोज कमी झाले. मात्र ‘टय़ुबलाईट’ आपटला हे शुक्रवारीच निकाल लागल्यानंतर रविवारी ‘मुरांबा’चे शोज वाढले होते, अशी माहिती वैद्य यांनी दिली. त्यामुळे सतत मराठी चित्रपट निर्मात्यांना सरकार दरबारी किंवा राजकीय पक्षाकडे जाण्याची वेळ बॉलीवुडनेही त्यांच्यावर आणता कामा नये. प्रादेशिक चित्रपटांचाही त्यांनी विचार करायला हवा. हिंदीत मोठा चित्रपट असो वा छोटा.. मल्टिप्लेक्समध्ये एक-दोन स्क्रीन्स कायमच्या मराठी चित्रपटांसाठी राखून ठेवल्या तर हा वादाचा मुद्दाच उद्भवणार नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले. मात्र यासाठी मराठी चित्रपट निर्मात्यांनीच पुढाकार घेऊन हिंदीतील निर्मात्यांच्या संघटनांबरोबर चर्चा करून हा तोडगा अंमलात आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करायला हवा, असे ते म्हणाले. हिंदीला देशभरात बाजारपेठ आहे, मराठीला फक्त इथे महाराष्ट्रातच व्यवसाय करायला मिळतो हे त्यांनी लक्षात घेऊन हिंदी-मराठी चित्रपटकर्मीनी दोघांचेही सहअस्तित्व मान्य करून पुढे जायला हवं तरच या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघेल आणि त्यादृष्टीने या नवीन वर्षांत ठोस पावले मराठी चित्रपट निर्मात्यांकडून उचलली जाणार असल्याचे सूतोवाचही वैद्य यांनी केले.