19 September 2020

News Flash

‘प्रेक्षक बदल सहजी स्वीकारत नाहीत’

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्या दिग्दर्शिका श्राबनी देवधर बऱ्याच वर्षांनी पुन्हा चित्रपट दिग्दर्शनाकडे वळल्या आहेत.

|| भक्ती परब

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्या दिग्दर्शिका श्राबनी देवधर बऱ्याच वर्षांनी पुन्हा चित्रपट दिग्दर्शनाकडे वळल्या आहेत. ‘लपंडाव’, ‘सरकारनामा’पासूनचा दिग्दर्शकीय प्रवास, त्यानंतर एका टप्प्यावर वाहिनीप्रमुखाची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे सांभाळली. चित्रपट माध्यमाकडे पुन्हा वळल्यावर त्यांच्या मनात नेमके कोणते विचार सुरू आहेत. चित्रपट माध्यमाने पुन्हा खुणावल्यावर ‘मोगरा फुलला’ या चित्रपटासारखी साधी-सोपी गोष्ट मांडण्यामागचा त्यांचा विचार काय होता, हे त्यांच्याकडूनच जाणून घेतलं..

आजूबाजूला खूप काही बदलतंय. जगणं धावपळीचं झालंय, या वातावरणात ‘मोगरा फुलला’सारखा तरल, ठहराव असणारा विषय का मांडावासा वाटला, यावर श्रावणी देवधर म्हणाल्या, आपल्या आजूबाजूला खूप बदल घडत असतात. हे बरोबर आहे. पण काही मूळ गोष्टी या बदलत नाहीत. त्या तशाच राहतात. आपण मातीशी जोडले गेलो आहोत. पण इतरांच्या तुलनेत आपण मागे पडू नये म्हणून बाहेर वावरताना एक मुखवटा घेऊ न वावरत असतो. घरी गेल्यावर मात्र आपल्यातलं खरं वागणं दिसू लागतं. आपण आईला आई म्हणतो, साधं वरण-भात जेवतो, सणावाराला श्रीखंड-पुरी खातो, या सगळ्या गोष्टी आपल्या संस्कृतीचा भाग आहेत. त्याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. सगळं बदललंय म्हणून आपणही आपल्या विचारधारा बदलाव्यात असं होऊ  नये. अजूनही आपल्या समाजात साधेपणाने जगणारी माणसं आहेत. त्यांना साधेपणात आनंद वाटतो. छोटय़ा छोटय़ा गोष्टी त्यांना खूप आनंद देतात. ती माणसं त्या साध्या आयुष्यात रमतात, अशा लोकांची गोष्ट सांगितली गेली पाहिजे. प्रत्येक वेळी यो संस्कृती, जबरदस्त व्यक्तिरेखा असंच का चित्रपटात दाखवावं, असं श्रावणी यांनी स्पष्ट केलं.

सध्या वेबसीरिजसारख्या माध्यमातून चित्रीकरणामध्ये भडकपणा दाखवला जातो. टोकाचं चित्रण केलं जातं. यावर दिग्दर्शिका म्हणून त्यांचं मत मांडताना सर्वानीच तशा प्रकारचा आशय दिल्यावर अतिरेक होणारच, असं त्या स्पष्टपणे सांगतात. पण काहींनी तरी या प्रवाहाच्या विरुद्ध जाऊ न साधेपणातली गोष्ट या माध्यमांतून मांडली पाहिजे. ज्याप्रकारे आपण भडकपणा आणि त्यासंबंधित इतर भावभावना माध्यमांतून दाखवतो, त्याचप्रमाणे हळवेपणा, आपलं साधं जगणं हेही मांडलं गेलं पाहिजे. नाहीतर ते कुठेतरी हरवून जाईल याकडे त्यांनी लक्ष वेधलं. ‘पिकू’ चित्रपटापासून हिंदी चित्रपटांमध्ये बदल होतो आहे. हा बदल प्रेक्षकांनाही आवडतो. तेही असे चित्रपट उचलून धरतात. हा बदल मी सध्या पाहते आहे, असे त्या म्हणाल्या. पटकथा लेखनात अलीकडे लेखिकांचा सहभाग वाढला आहे, याबद्दल बोलताना बिमल रॉय यांच्या चित्रपटांची आठवण होते, असे त्या सांगतात. त्यांनी ज्याप्रकारे त्यांच्या चित्रपटातून स्त्री व्यक्तिरेखा उभ्या केल्या, तशा पद्धतीने करणं अजून कुणाला जमलेलं नाही. मी स्त्री-पुरुष लेखक असा भेद करत नाही. लेखकांना आलेले अनुभव त्यांना समृद्ध करत असतात. लेखिका लिहिताना खबरदारी घेतात. त्या जाणून-बुजून काहीतरी गिमिक करायला जात नाहीत. पण पुरुष लेखकही अतिशय संवेदशीलपणे कथा हाताळताना दिसतात, असं त्या म्हणतात.

‘लपंडाव’, ‘सरकारनामा’ अशा चित्रपटांची दिग्दर्शिका म्हणून तुमची वेगळी ओळख निर्माण झाली होती, त्याच वेळी तुम्ही वाहिनीसाठी काम करण्याची जबाबदारी स्वीकारलीत, त्यावेळी तुमच्यातली दिग्दर्शिका तुम्हाला साद घालत होतीच. त्या दरम्यान तुमचा काय विचार सुरू होता, यावर त्या म्हणाल्या, त्यावेळी द्विधा मन:स्थिती व्हायची. पण तो अनुभव समृद्ध करणारा होता. वाहिनीप्रमुख म्हणून नाही तर मालिकांच्या निर्मितीवेळी जोडल्या गेलेल्या तंत्रज्ञांपैकीच मीसुद्धा आहे, असं समजून मी त्यांच्यात मिसळायचे. मालिकांचं कथालेखन, संकलन अशा सगळ्या पातळ्यांवर सहभागी व्हायचे, असं त्यांनी सांगितलं.

सध्याच्या घडामोडींमध्ये तुमच्यातली दिग्दर्शिका काय विचार करतेय, कुठले विषय खुणावत आहेत, म्हटल्यावर वेगवेगळे आणि गुंतागुंतीचे नातेसंबंध यांचं चित्रण करणं ही माझी शैली आहे. त्यामुळे अशा विषयावर चित्रपट यापुढेही करायला आवडतील, असं त्यांनी सांगितलं.

आपल्या आजवरच्या प्रवासाविषयी त्या म्हणाल्या, वाहिनीप्रमुख म्हणून ८-९ वर्ष काम करताना छान वाटत होतं. पण त्या दरम्यान माझ्यातील दिग्दर्शिका मला स्वस्थ बसू देत नव्हती. चित्रपट करायचा विचार मनात सारखा रुंजी घालत असायचा. वाहिनीप्रमुख असल्याने अनेक निर्माते वाहिनीवर मालिका निर्मितीचे प्रस्ताव घेऊ न यायचे, त्यांच्याशी निर्मितीविषयी बोलताना माझ्यातील दिग्दर्शिकासुद्धा सावध व्हायची. त्यानंतर एका वळणावर मी पुन्हा दिग्दर्शन करण्याचा निर्णय घेतला. त्याचदरम्यान अभिनेता स्वप्निल जोशीला ‘मोगरा फुलला’ची कथा सांगितली, त्यानेही होकार दिला. स्वप्निल मुळातच एक मनमिळाऊ , प्रेमळ मुलगा आहे. त्याचं वागणं, त्याच्या घरचं वातावरण हे सगळं पाहून मला वाटलं साधेपणा हा त्याच्या आयुष्याचा खूप मोठा भाग आहे. तो कधीच लोकप्रियतेने हुरळून गेला नाही. तुम्ही सांगताय तशा पद्धतीने सुनील कुलकर्णी करून बघूया, असं म्हणून स्वप्निल तयार झाल्याचं श्रावणी यांनी सांगितलं.

सुनील कुलकर्णीसारख्या खूप व्यक्तिरेखा आपल्या आजूबाजूला आहेत. आईचा पगडा त्यांच्यावरून सुटत नाही. त्यात त्या माय-लेकांचा दोष नसतो. पण कुठल्याही गोष्टीचा अतिरेक मात्र वाईट असतो. सुनील कुलकर्णीच्या आयुष्यात प्रेम आल्यावर काय होतं, तो काय करू शकेल, त्याला आईची परवानगी मिळेल का, तो पुढे जाऊ  शकेल का, ही साधारण चित्रपटाची संकल्पना होती. त्याला लेखक सचिन मोटे यांनी विस्तारित रूप दिलं, काही व्यक्तिरेखा त्या कथेत आणल्या आणि चित्रपट साकार झाला. असं, श्रावणी म्हणाल्या.

वाहिनीवर काम करत असताना काही गोष्टी अशा जाणवल्या की आपण कितीही पुढारलेल्या विचारांचं काही दाखवू म्हटलं तरी प्रेक्षकांना काही गोष्टी आहेत तशाच पाहायला आवडतात. एकदमच बदल करायला गेलो, तर तो बदल पटकन प्रेक्षकांकडून स्वीकारला जात नाही. नावीन्य आणि आपली मूल्यं याचं प्रतिबिंब प्रेक्षकांना विविध माध्यमांतून पाहायला आवडतं, असं मत श्रावणी यांनी मांडलं.

‘मोगरा फुलला’ या चित्रपटाचा प्रवास दीड वर्षांपूर्वी सुरू झाला. श्राबनीताई आणि मला एकत्र काम करण्याची तीव्र इच्छा होती. काहीतरी भव्य-दिव्य नको, साधी सोपी गोष्ट आपण चित्रपटातून मांडूया, या विचारातूनच चित्रपटाचा प्रवास सुरू झाला. आपल्या खऱ्या समस्या या साध्या-सोप्याच असतात. आपणच त्या समस्या मोठय़ा केलेल्या असतात. ही एका आई-मुलाची गोष्ट आहे, तशीच ती एका कुटुंबाची गोष्ट आहे. माझ्या आजवरच्या जडणघडणीत नातेसंबंधांचा खूप मोठा वाटा आहे. पैसा कमावणं सोपं असतं, पण नाती जोपासणं कठीण असतं. मला चित्रभाषेतून नातेसंबंधांवर बोलायला आवडतं. माणसाच्या ठायी असलेल्या मूळ संकल्पना कधी बदलत नाहीत. नातेसंबंध हे आपल्या अस्तित्वातील मूळ मूल्य आहे. ते कधीच बदलत नाही. या नातेसंबंधांना अनेक कंगोरे असतात. ते तुम्ही कितीही अनुभवा आणि कितीही दाखवा, प्रत्येक वेळी त्यात नवं काहीतरी सापडतंच. नातेसंबंधांवर भाष्य करणारे चित्रपट प्रेक्षकांनाही जवळचे वाटतात    – स्वप्निल जोशी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 15, 2019 11:36 pm

Web Title: shrabani deodhar
Next Stories
1 दृश्य आणि संवाद
2 मृत्यूपूर्वीचे मैत्रपर्व
3 अर्धवट गुंता..
Just Now!
X