दिग्दर्शक अपूर्व लाखियाला वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी चांगली भेट मिळाली आहे असं म्हणावं लागेल. कारण सेन्सॉर बोर्डाचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रसून जोशी यांनी त्याच्या ‘हसीना पारकर’ या चित्रपटामध्ये फक्त दोन कट सुचवले आहेत. श्रद्धा कपूरची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाला ‘U/A’ प्रमाणपत्र देण्यात आले आहे.

यासंदर्भात अपूर्व म्हणाला की, ‘चित्रपटातील फक्त एका शब्दावर आणि एका दृश्यावर सेन्सॉर बोर्डाने कात्री चालवली आहे. या निर्णयाने मी फार खूश आहे. सेन्सॉर बोर्डाने सांगितलेले हे दोन कट मला मान्य आहेत. शिवाय प्रमाणपत्रासाठी मला फार वेळ ताटकळत राहावं लागलं नाही.’

वाचा : प्रेयसीच्या मदतीने अभिनेत्याने रचला मुलाच्या अपहरणाचा कट

या चित्रपटात श्रद्धा वेगळ्याच अंदाजात दिसणार असून कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या बहिणीची भूमिका साकारणार आहे. एका बहिणीपासून सुरु झालेल्या हसीनाचा प्रवास ‘गॉडमदर’ आणि ‘गँगस्टर’पर्यंत येऊन कसा थांबला, याचं प्रभावी चित्रण ‘हसीना…’ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. चित्रपटातून गुन्हेगारी विश्व, टोळीयुद्ध आणि एका वेगळ्या मुंबईची झलक पाहायला मिळणार आहे. चित्रपटाची निर्मिती नाहिद खान करत असून या चित्रपटातून दाऊद इब्राहिमच्या भूमिकेत श्रद्धाचा भाऊ सिद्धार्थ कपूर झळकणार आहे. २२ सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.