अभिनेत्री आलिया भट सध्या स्वत:साठी घर शोधत असली, तरी पदार्पणातच आपल्या नावावर दोन हिट चित्रपट करणारी कुटुंबवत्सल अभिनेत्री श्रद्धा कपूर अद्याप आपल्या पालकांचे घर सोडून दुसरीकडे राहाण्याच्या मन:स्थितीत नाही. आपल्या कुटुंबियांसमवेत राहण्यासाठी घरातच तिने आपल्यासाठी अधिक जागा आणि एकांत मिळेल अशी सोय करून घेतली आहे. याविषयी बोलताना ती म्हणाली, या घरापासून दूर वेगळं राहण्याचा विचारसुद्धा मी करू शकत नाही. घरातील सर्वांशी मी खूप जोडली गेली आहे. असे असले तरी, आता माझी खोली वाढविण्यात आली आहे. मी ज्या क्षेत्रात काम करते, तेथे वेळेचे बंधन नाही. याचा माझ्या आई-वडिलांना त्रास होऊ नये म्हणून घरात येण्या-जाण्याचा माझ्यासाठी खास मार्ग करून घेतला आहे. सध्या श्रद्धाचे सर्व लक्ष ‘हैदर’ या तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रदर्शनावर केंद्रित आहे. या चित्रपटाविषयी उत्सुक असलेली श्रद्धा म्हणाली, चित्रपटातील भूमिकेसाठी मी योग्य असल्याचे विशाल सरांचे मत असल्याने, त्यांनी मला ही भूमिका देऊ केली. जेव्हा आम्ही भेटलो, तेव्हा ‘तुमसे बेहतर अर्शिआ तो मुझे मिल ही नही सकती’ हे त्यांचे वाक्य मला खूप भावलं. माझा आनंद गगनात मावत नव्हता! ‘हैदर’ हा आपल्यासाठी जीवनाकडे नव्या दृष्टिकोनातून पाहाण्याचा अनुभव असल्याची भावना व्यक्त करत श्रद्धा म्हणाली, ही भूमिका साकारताना मी खऱ्या अर्थाने काश्मीर अनुभले. चित्रपटात मी काश्मिरी तरुणीची भूमिका साकारत असून, काश्मिरी तरुणी बनून मी काश्मिरमध्ये सहजपणे वावरू शकत होते. विशाल सरांबरोबर काम करण्याची माझी इच्छा होती. अजुन एक दिग्दर्शक म्हणजे संजय लीला भन्साळी यांच्याबरोबर काम करण्याची माझी खूप इच्छा आहे.
अनेक भूमिकांना नाकारत असलेली श्रद्धा याविषयी म्हणाली, निवडक चित्रपट स्वीकारण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नाही. आता, लोकांच्या माझ्याकडून खूप अपेक्षा आहेत, कधी कधी याची भिती वाटते. एक बहुआयामी अभिनेत्री म्हणून माझी ओळख निर्माण करायची आहे. कलाकार एखाद्या मातीच्या गोळ्यासारखा असतो, जो कुठल्याही व्यक्तिरेखेत सहजपणे सामावला गेला पाहिजे. प्रत्येक कलाकाराची हीच तर आकांक्षा असते, बरोबर? असे म्हणत, येणाऱ्या काळात चाहत्यांना तिचा वैविध्यपूर्ण अभिनय पाहायला मिळण्याचे संकेत तिने दिले.