‘कुमकुम भाग्य’ ही मालिका सर्वाधिक लोकप्रिय मालिकांपैकी एक असून तिचेही पुन्हा प्रसारण सुरू झाले आहे. नव्याने सुरू झालेल्या या मालिकेच्या कथानकाला काही अनपेक्षित वळणे मिळाली आहेत. गेली अनेक वर्षे अभी (शब्बीर अहलुवालिया) आणि प्रज्ञा (श्रुती झा) यांच्या प्रेमकथेने प्रेक्षकांना भारून टाकले असून टीव्हीवरील ते सर्वात लोकप्रिय कलाकारांपैकी एक बनले आहेत. पण तुम्हाला हे ठाऊक आहे का, की प्रज्ञाला मुळात अभिनेत्रीच बनायचे नव्हते?
बिहारमधील बेगुसरायमधील श्रुती ही लहानपणापासूनच अभ्यासू मुलगी होती. पण आपण कधी अभिनेत्रीही होऊ, अशी गोष्ट तिने कधी स्वप्नातही पाहिली नव्हती. तिने शाळेत अनेकदा नाटकांतून भूमिका साकारल्या होत्या, पण मुंबईत येऊन अभिनयाच्या क्षेत्रात कारकीर्द करण्याची कल्पनाही तिने कधी केली नव्हती. तिची मोठी बहीण मीनाक्षी हिने तिची समजूत काढली. मीनाक्षीनेच तिच्या आई-वडिलांचीही समजूत घातली आणि श्रुतीला मुंबईला पाठवीले.
“मीनाक्षीच माझ्यावतीने सर्वांशी भांडत असे. मी एक अभिनेत्री आहे, हे माझं मलाच पटत नव्हतं आणि मुंबईत येऊन या क्षेत्रात काम करण्याचा मी कधी विचारही केला नव्हता. मी माझी पहिली ऑडिशन दिली, तेव्हा मला ही भूमिका मिळेल, असं मला अजिबात वाटलं नव्हतं. ही ऑडिशन एका मॉडेलिंग कंपनीच्या कार्यालयात घेतली जात होती. तेव्हा तिथे खूप सुंदर मुली आल्या होत्या. मी कॉलेजातून थेट तिथे गेले होते. ना मी मेक-अप केला होता, ना माझे कपडे चांगले होते. मी अगदी साध्या वेशात होते. मी तर तेव्हा चष्माही लावला होता. ऑडिशनच्या वेळी मला तो काढायला सांगण्यात आला. त्यानंतर माझी खात्रीच पटली की माझी निवड काही होणार नाही. त्यामुळे मी फारसा प्रयत्नही केला नाही. पण मला वाटतं, त्यांना माझा नैसर्गिक अभिनय आवडला आणि म्हणून मला ही भूमिका मिळाली. पण ही भूमिका मिळाल्यावरही मला खात्री वाटत नव्हती की या भूमिकेमुळे माझी अभिनय क्षेत्रात मोठी कारकीर्द उभी राहील. मी मुंबईला जाईन आणि एक अभिनेत्री बनेन असं मला कधीच वाटलं नव्हतं” असे श्रुती म्हणाली.
पुढे श्रुती म्हणाली, माझ्या बहिणीचा माझ्यावर पूर्ण विश्वास होता आणि तिनेच आमची सर्वांची समजूत घातली. तिला इतका विश्वास का वाटत होता, ते मलाही सांगता येणार नाही. खरं तर तिने मला कधी रंगमंचावर अभिनय करताना बघितलंही नव्हतं. तरीही ती म्हणाली की मी ही संधी वाया घालविता कामा नये. आज मला वाटतं की जर माझ्या बहिणीने माझी समजूत घालून मला अभिनय करण्यास तयार केलं नसतं, तर मी मुंबईत आले नसते आणि तुमची प्रज्ञाही बनले नसते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 2, 2020 7:03 pm