बिग बी अमिताभ बच्चन आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब कलाविश्वाशी विविध मार्गांनी जोडलं गेलं आहे. अशा या कुटुंबातील आणखी एका सदस्याने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. बिग बींच्या कुटुंबातील त्या नव्या सदस्याचं नाव आहे श्वेता बच्चन नंदा. झालात ना तुम्हीही आश्चर्यचकित. हे खरंय, श्वेताने या कलाविश्वात तिच्या अभिनयाचा नमुना सादर केला असून, सध्या सोशल मीडियावर त्यावषयीचीच चर्चा आहे.

मुख्य म्हणजे श्वेताने तिच्या वडिलांसोबत म्हणजेच महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबतच आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली आहे. ‘कल्यान ज्वेलर्स’च्या एका जाहीरातीतून ही वडील- मुलीची बहुचर्चित जोडी झळकली आहे. खुद्द बिग बींनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन या जाहिरातीचा व्हिडिओ पोस्ट करत हे अतिशय भावुक क्षण असल्याचं सांगितलं आहे.

अवघ्या एक- दीड मिनिटाच्या या जाहिरातीतून प्रामाणिकपणाचा आणि विश्वासार्हतेचा एक सुरेख संदेशही सर्वांनाच मिळत आहे. वडील आणि मुलीचच नातं या जाहिरातीतूनही साकारण्यात आल्यामुळे अनेकांसाठी ही जाहिरात म्हणजे पर्वणीच ठरत आहे.

वाचा : चाचा- चाचींना सलाम: १३ हजार फुटांवर जवळपास ४५ वर्षे चालवतायेत ढाबा

दरम्यान, अभिनय क्षेत्रात आपलं संपूर्ण कुटुंब सक्रिय असताना श्वेताने मात्र करिअरच्या वेगळ्या वाटा निवडल्या होत्या. काही कार्यक्रम आणि मुलाखतींना मात्र तिची उपस्थिती अनेकांचच लक्ष वेधून गेली होती. पण, आता मात्र श्वेताने अभिनय क्षेत्रात पदार्पण केल्यामुळे येत्या काळात ती आणखी कोणत्या प्रोजेक्टमध्ये दिसणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.