‘पद्मावती’ चित्रपटाच्या वादावरून आता दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. दिग्दर्शक आणि अभिनेत्यांना धमक्या येत असताना सरकार गप्प का आहे, असा सवाल त्यांनी केला आहे. ‘ही लोकशाही आहे. माझ्या विचारांशी लोक असहमत असू शकतात, पण मला बोलण्याचा अधिकार आहे. लोक उघडपणे शिरच्छेद करण्याच्या धमक्या देतात, त्यासाठी पैशांचीही ऑफर दिली जाते आणि हे सर्व प्रकार थांबवण्यासाठी राज्य सरकार कोणतीच पावलं उचलत नाही? गृह विभाग आणि पोलिसांनी तातडीने सुरक्षा पुरवायला हवी. जर मुख्यमंत्री आणि सरकारी सदस्य असा दृष्टिकोन ठेवत असतील तर मग प्रशासनाने काय करावं?,’ असं बेनेगल म्हणाले.

संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावती’ चित्रपटाला काही राजपूत संघटनांकडून तीव्र विरोध होत आहे. करणी सेनेकडून जयपूर इथं चित्रपटाच्या सेटवरही तोडफोड करण्यात आली होती. पोस्टर आणि ट्रेलर प्रदर्शनानंतर हा विरोध आणखी तीव्र होत गेला. अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि भन्साळी यांना करणी सेनेकडून धमक्या दिल्या जाऊ लागल्या. या वादाच्या पार्श्वभूमीवर बेनेगल यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला. बेनेगल यांच्याकडे सेन्सॉर बोर्डाची नवीन नियमावली आखण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
‘हत्या आणि हल्ल्याच्या धमक्या देणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची सरकारची जबाबदारी नाही का? बेधडकपणे इथं लोकांना धमकावलं जात आहे,’ असंही ते म्हणाले. चित्रपट प्रदर्शित केल्यास सिनेमागृहात जाळपोळ करू आणि शूर्पणखेप्रमाणे दीपिकाचं नाक कापण्यासही करणी सैनिक कमी करणार नाहीत, अशा धमक्या राजपूत संघटनांकडून देण्यात आलेल्या.

वाचा : मध्य प्रदेशात ‘पद्मावती’वर बंदी, मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांची घोषणा

दुसरीकडे चित्रपटात आवश्यक ते बदल केल्याशिवाय प्रदर्शित करू नये यासाठी राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी शनिवारी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांना पत्र लिहिलं. प्रसिद्ध इतिहासकार, चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ कलाकारांच्या सदस्यांची समिती स्थापन करण्यात यावी आणि या समितीने पद्मावतीच्या कथेवर सविस्तर चर्चा करावी, असं त्यांनी या पत्रात नमूद केलं.

तर ‘पद्मावती’ वादात ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनीही ट्विटरच्या माध्यमातून मोदी सरकारवर निशाणा साधला. ‘मोदी सरकारच्या नावाखाली सर्वांचं दुकान चालतं,’ अशी टीका त्यांनी केली. या वादाच्या पार्श्वभूमीवर चित्रपट निर्मात्यांनी ‘पद्मावती’च्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे १ डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार नाही. प्रदर्शनाची निश्चित तारीख अद्याप निर्मात्यांकडून सांगण्यात आलेली नाही.