चित्रपटांना सेन्सॉरशिपऐवजी वय, परिपक्वता आणि संवेदनशिलता यावर आधारित श्रेणी देण्यासाठी नवी पद्धती अंमलात आणण्याची आवश्यकता असल्याचे मत ज्येष्ठ चित्रपट निर्माते-दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी शनिवारी मुंबईत व्यक्त केले.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने केंद्रीय चित्रपट प्रमाणीकरण मंडळाकडून (सीबीएफसी) चित्रपटांच्या प्रमाणीकरणासंदर्भात मार्गदर्शक तत्वांची शिफारस करण्यासाठी बेनेगल यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना केली आहे. या समितीच्या मुंबईत झालेल्या बैठकीत बेनेगल बोलत होते. बैठकीस केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अरुण जेटली, प्रसारण राज्यमंत्री हर्षवर्धन राठोड, प्रसारण सचिव सुनील अरोरा आदी उपस्थित होते.
या वेळी बोलताना जेटली म्हणाले, प्रमाणपत्र देताना कलाकृतीची कलात्मकता आणि स्वातंत्र्याला धक्का लागणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे. तर बेनेगल यांच्या अध्यक्षतेखालील ही समिती सिनेमॅटोग्राफ कायदा व नियमातील तरतुदींचा अभ्यास करण्यासाठी योग्य आराखडा तयार करेल, असे राठोड यांनी सांगितले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 13, 2016 11:58 pm