28 February 2021

News Flash

‘भाषेची बंधनं ओलांडणारा सिनेमा करायचाय’

हिंदीत निवडक भूमिकांमधून आपला ठसा उमटवणारे मराठी कलाकार फार कमी आहेत.

|| देविका जोशी

हिंदीत निवडक भूमिकांमधून आपला ठसा उमटवणारे मराठी कलाकार फार कमी आहेत. जाहिराती आणि अजब प्रेम की गजब कहानी, जब वुई मेटसारख्या चित्रपटांतून घराघरांत लोकप्रिय झालेला मराठी कलाकार म्हणजे अभिनेता श्याम मशाळकर. आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित पानिपत या चित्रपटातून श्याम प्रेक्षकांसमोर येणार आहे. शिवाय, स्टार प्लस वाहिनीवरील नम: या आगामी पौराणिक  मालिकेतही तो नारदाच्या भूमिकेत दिसणार आहे. लोकसत्ता ऑनलाइनशी मारलेल्या गप्पांमध्ये हिंदी चित्रपट-जाहिरातींमधील आपली कारकीर्द उलगडताना भविष्यात भाषेची बंधनं नसणाऱ्या उत्तम सिनेमात काम करायची इच्छा त्याने व्यक्त केली.

आगामी पानिपत चित्रपटामध्ये आशुतोष गोवारीकरांसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता, याबद्दल बोलताना आशुतोष गोवारीकर यांनी पानिपत चित्रपटातील भूमिकेविषयी विचारल्यानंतर मी लगेचच होकार दिला होता, कारण आशुतोष गोवारीकर हे माझ्या मते स्वत:च एक चालताबोलता ग्रंथ आहेत. त्यांच्याकडून जेवढं शिकू तेवढं कमी आहे, असे श्यामने सांगितले.  या चित्रपटातील भूमिका आपल्यासाठी आव्हानात्मक होती, असे सांगतानाच या चित्रपटाच्या सेटवरचा अनुभव मात्र खूप आनंददायक होता, असे त्याने स्पष्ट के ले. आमच्या सेटवर खूप मोकळं वातावरण होतं. अगदी छोटय़ाशा समस्येसाठीसुद्धा आम्ही आशुतोष सरांकडे जायचो. जयपूरमध्ये आम्ही चित्रीकरण करत असताना जवळपास ७५० लोकांचं युनिट होतं. हत्ती, घोडे असा खूप मोठा लवाजमा होता. इतकं मोठं युनिट असूनसुद्धा ते खूप शांत होते. त्यांची एक गोष्ट मला खूप आवडते ती म्हणजे ते स्वत: अभिनेतेही  असल्यामुळे समोरच्या कलाकाराचं म्हणणंही ते तितक्याच शांतपणे ऐकून घेतात. सगळ्यांना समोर बसवून ते प्रत्येक दृश्य समजावून सांगायचे. त्यांच्या दिग्दर्शनाखाली काम करताना घरी चित्रीकरण केल्यासारखा एक आपलेपणा अनुभवायला मिळाल्याचेही श्यामने सांगितलं.

एकीकडे पानिपत तर दुसरीकडे थेट सनी लिऑनीबरोबरचा चित्रपट.. या दोन्ही टोकाचे अनुभव असले तरी सनीबरोबर काम करतानाही मस्त मजा आली, असे त्याने सांगितले. तिच्याबरोबर तो कोका कोला हा चित्रपट करतो आहे. हा एक विनोदी भयपट असल्याचे त्याने सांगितले. सनीला अस्खलित हिंदी बोलता येत नाही. तिचं इंग्रजीवर प्रभुत्व आहे. मात्र एक अभिनेत्री म्हणून सनी खूप वक्तशीर आहे. मेहनती आहे, असे तो सांगतो. सध्या या चित्रपटाच्या एका भागाचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे. सनीला हिंदी नीट बोलता येत नसलं तरी ती भाषेवर मेहनत घेण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असते. तिच्या हिंदीच्या उच्चारणामुळे, मजामस्करीत आमचे अनेकदा रिटेक व्हायचे हेही श्यामने स्पष्ट के ले.

हिंदीमध्ये सहकलाकार म्हणून नाव कमावणं फार कठीण असतं, पण मुख्य कलाकारापेक्षा अनेकदा सहकलाकारही महत्त्वाचा असतो. त्याविषयी काही सांगशील का?, असे विचारल्यावर आपल्याला कायमच सहकलाकाराची भूमिका खूप आव्हानात्मक वाटते, असे त्याने सांगितले. आम्ही ‘अजब प्रेम की गजब कहानी’ या चित्रपटाचं चित्रीकरण करत असताना मला रणबीर कपूर म्हणाला होता की, मी जरी या चित्रपटाचा प्रमुख अभिनेता असलो तरीही मला सहकलाकाराकडूनच खूप ऊ र्जा मिळते. त्याच्या प्रतिक्रियेवर माझा अभिनय अवलंबून असतो, असे तो म्हणतो. चित्रपटाचं यश हे टीमवर्कवर अवलंबून असतं. त्यामुळे माझ्या मते, सहकलाकार असला तरी त्याची निष्ठा व सातत्य तितकंच असणं महत्त्वाचं आहे. त्याने जर समरस होऊ न काम केलं तरच चित्रपट यशस्वी होऊ  शकतो. चित्रपटातील प्रत्येक भूमिका महत्त्वाची आहे असं मला वाटतं. कोणतीच भूमिका लहान किंवा मोठी नसते, असंही त्याने स्पष्ट केलं.

मला एक असा चित्रपट करायचा आहे ज्याला भाषेचं कोणतं बंधन नसेल. चित्रपटाची स्वत:ची भाषा नसते. एक अभिनेता म्हणून तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरील हावभावांवरून प्रेक्षकांपर्यंत गोष्टी पोहोचवू शकता. मला एक मूक चित्रपट करायचा आहे. माझ्या मते, मूक अभिनयात तुमच्या कौशल्यांचा कस अधिक लागतो. त्यामुळे ‘पुष्पक’सारखा एखादा चित्रपट करायला मला नक्की आवडेल.    – श्याम मशाळकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 3, 2019 11:15 pm

Web Title: shyam mashalkar panipat movie mpg 94
Next Stories
1 ज्यांच्या सेटवरून चित्रपट निर्माण झाला..!
2 “लोकांना न्यूड सिनेमेच पाहायचे असतील, तर ते पॉर्न पाहू शकतात”
3 प्रभास अमेरिकन उद्योगपतीच्या मुलीशी लग्न करणार?
Just Now!
X