करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये अभिनेत्री कंगना रनौतने बॉलिवूडमधील घराणेशाहीबाबत नवा वाद निर्माण केला होता. हा वाद गेल्या दोन वर्षात नेपोटिझम म्हणून प्रचंड चर्चेत राहिला. दरम्यान यावर अनेक सेलिब्रिटी व त्यांच्या मुलांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. ही प्रतिक्रियांची मालिका अद्याप संपलेली नाही. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री अनन्या पांडे हिने देखील नेपोटिझमबाबत प्रतिक्रिया दिली. परंतु त्याच मुलाखतीत अनन्याच्या उत्तरावर ‘गल्ली बॉय’ फेम सिद्धांत चतुर्वेदी याने दिलेले जबराट प्रत्युत्तर सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

काय म्हणाली अनन्या?

अनन्या प्रसिद्ध अभिनेता चंकी पांडेची मुलगी आहे. तिने या मुलाखतीत सेलिब्रिटी मंडळींच्या मुलांच्या वाट्याला येणाऱ्या स्ट्रगलबद्दल सांगितले. “सर्वांना वाटते आम्ही किती सुखी आहोत. आमच्या आयुष्यात कुठल्याही प्रकारचे स्ट्रगल नाही. आमचे आई-वडील कलाकार आहेत म्हणून आम्हाला चित्रपटात काम करण्याची संधी मिळते. परंतु या अफवा आहेत. आम्ही देखील इतर सर्वसामान्य कलाकारांप्रमाणेच मेहनत करतो. जेव्हा लोक असं म्हणतात की मला वशिलेबाजीमुळे चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली तेव्हा मला त्याचे काहीच वाटत नाही. त्यावेळी मी कोणाची मुलगी आहे ते अधिक जोराने सांगते. कारण उत्कृष्ट अभिनेत्री होणे हे माझे स्वप्न आहे. आणि लहानपणापासून त्यावर मी मेहनत करत आहे. माझ्या वडिलांना कधीच ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये मुलाखतीसाठी बोलवण्यात आलेले नाही. त्यामुळे करण जोहरकडे माझ्या वडिलांनी विनंती केली त्यामुळे मला ‘स्टूडेंट ऑफ द इयर’मध्ये काम करण्याची संधी मिळाली असे वाटणे चुकीचे आहे. प्रत्येकाचा संघर्ष वेगळा असतो.” अशी प्रतिक्रिया अनन्याने न्यूज १८वर दिलेल्या मुलाखतीत दिली.

या मुलाखतीत अनन्या व्यतिरिक्त सिद्धांत चतुर्वेदी, तारा सुतारीया, अभिमन्यु दसानी, विशाल जेठवा ही कलाकार मंडळी देखील हजर होती त्यांनी देखील बॉलिवूडमधील घराणेशाहीवर आपली मते मांडली. परंतु यांपैकी सिद्धांतने दिलेले उत्तर जास्त चर्चेत आहे.

काय म्हणाला सिद्धार्थ?

“अनन्या म्हणाली ते अगदी योग्य आहे. प्रत्येकाचा संघर्ष वेगळा असतो. त्याची तुलना करता येत नाही. परंतु जिथे आमची स्वप्न पूर्ण होतात तिथे या सेलिब्रिटींच्या मुलांचा संघर्ष सुरु होतो.” सिद्धांत एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेला अभिनेता आहे. त्यामुळे त्याने दिलेल्या या प्रतिक्रियेचे सोशल मीडियावर प्रचंड कौतुक केले जात आहे.