सिद्धार्थ चांदेकर – response.lokprabha@expressindia.com, @sidchandekar
उन्हाळ्याच्या त्या सुट्टीत मी मनसोक्त क्रिकेट खेळलो. खूप शिकलो, खूप मजा केली. ते दोन महिने मी जणू काही सचिन तेंडुलकर बनूनच वावरत होतो, ते केवळ आईमुळेच..

‘आई, अजित आगरकर कसा बॉलिंग करतो बघायचं का? हे बघ… आणि आता झहीर खान कसा करतो बघ. द्रविड अशी बॅट धरतो, आणि गांगुली अशी..’, मी हे आईला करून दाखवत होतो. आई माझ्याकडे फक्त कौतुकानं बघत होती. ताईसुद्धा हसून तिच्या कानात काहीतरी कुजबुजत होती. मला फार वाटत होतं की माझा प्लान सक्सेसफुल झाला. पण आईच्या डोक्यात काहीतरी वेगळं चाललेलं. चेहऱ्यावर आनंद आणि कौतुक होतं, पण डोळ्यात कसली तरी काळजी होती. बोलत नव्हती काहीच.

सातवीची शेवटची परीक्षा संपल्यावर हेरंबने मला एकदा विचारलं, ‘तू काय करणार आहेस या सुट्टीत?’ माझ्याकडे सांगायला काहीच नव्हतं. सुट्टीत काय करणार? आंबे खाणार.. वाडय़ात रोज खेळणार.. सायकल शिकणार.. बास एवढंच. आणखी काय करणार?

‘मी क्रिकेटचा क्लास लावणारे, नेहरू स्टेडियमला’, हेरंब म्हणाला. हेरंब माझा शाळेतला मित्र. सगळ्यात हुशार. दरवर्षी स्टुडंट ऑफ द इअरचं बक्षीस मिळवायचा. ९० च्या खाली मार्क पडलेच नाहीत त्याला कधी. तो जे काही सांगायचा ते सगळं मला पटायचं. ‘तूपण लाव. आपण क्रिकेटर होऊ.’

उघडय़ा डोळ्यांनी सगळी स्वप्नं मला दिसायला लागली. मी इंडियासाठी खेळतोय, वानखेडे स्टेडियमवर. सचिन, सौरव आणि द्रविड मला बेस्ट ऑफ लक करत आहेत, अंपायरने शेक हॅण्ड केलं आणि मी माझी बॅट घेऊन पिचवर आलोय. सगळे माझ्या नावाने ओरडताहेत. समोर ब्रेट ली मला बघून घाबरलाय. तो बॉल टाकायला आला आणि..

‘ए येडपट, कुठे तंद्री लागली? जा अर्धा लिटर दूध आणि पोह्य़ाचे पापड घेऊन ये,’ आईने जमिनीवर आणलं. ‘आलोच’, असं म्हणून धावत बाहेर गेलो.

माझं ठरलेलं. मी आता क्रिकेट खेळणार. इंडियासाठी. मला कुणीच थांबवू शकत नाही. आणि उद्या आपण हे आईला सांगून टाकायचं.

मी सगळी तयारी करून ठेवली होती. आईला आवडतो तसा आल्याचा चहा करून ठेवलेला, केर-लादी करून ठेवली, माझे घाणेरडे मोजे धुवायला टाकले, कपडय़ांची घडी घालून कपाटात ठेवले. सगळं नीटनेटकं. आई इम्प्रेस झालीच पाहिजे. ‘काय हवंय नक्की?’, आईने आल्या आल्या विचारलं पाहिजे. हे सगळं बघून तिला ‘आपण चुकीच्या घरात तर नाही ना आलो?’ असं वाटत होतं. खूप खूश झाली. मला जवळ बोलवून गालावर पप्पी दिली आणि हातात क्रीम बिस्कीटचा पुडा ठेवला. ‘बोल आता. काय हवंय?’, आईने विचारलं. ‘मला क्रिकेट शिकायचं आहे आई. नेहरू स्टेडियमला. परब सर म्हणून एक कोच आहेत. त्यांच्याकडे ५०० रुपये महिना फी आहे आणि क्रिकेटचा युनिफॉर्म आणायचा आहे. मी शिकू? प्लीज?’ त्यानंतर मी तिला बॉलिंग कशी करतात आणि बॅट कशी धरतात हे सगळं करून दाखवलं. तिला एवढंच पटवून द्यायचं होतं की मला क्रिकेट येतं. आई खूश होती खरी; पण दाखवत नव्हती.

‘आपण पुढच्या वर्षी लावू या क्रिकेट? चालेल? आत्ता जरा अवघड आहे ना आपल्याला. चालेल?’ तिनं विचारलं. मी काहीही न बोलता खाली निघून गेलो. मला जे करायचं होतं, जी स्वप्नं पाहिली होती, त्यातलं काहीच घडणार नव्हतं. नो क्रिकेट!

काही वेळाने घरी आलो ते थेट गच्चीत जाऊन बसलो. कुणाशीही न बोलता. खूप रडू येत होतं. जेवायचं नव्हतं. बोलायचं नव्हतं. काहीच करायचं नव्हतं. सगळे क्रिकेट खेळणार. पण मी नाही. मी आता आयुष्यात कधीच क्रिकेट नाही खेळणार. बॅट-बॉलला हातही नाही लावणार. मित्रांनी खाली खेळायला बोलावलं तरीही नाही जाणार.

काही वेळानं जेवायचं ताट आणि एक वर्तमानपत्र घेऊन आई गच्चीत आली. माझ्यासमोर मांडी घालून बसली. ‘हे बघ बाळा, मला मान्य आहे तुला क्रिकेटचं वेड आहे आत्ता. आणि तू खेळशील ना. फक्त या वर्षी नाही, पुढच्या वर्षी. हे बघ आज पेपरला काय आलंय. सुट्टीतल्या शिबिरांची आणि क्लासेसची लिस्ट आहे. तू गिटार शिकतोस का? किंवा स्विमिंगला जातोस का? आत्ता असं काहीतरी कर मग पुढच्या वर्षी तुला क्रिकेट. प्रॉमिस.’ हे समजावताना ती मला एक-एक घास भरवत होती. मी अख्खं ताट कधी संपवलं मलाच कळलं नाही. राग खूप आलेला पण भूकही तेवढीच लागलेली. जरा बरं वाटलं. तरीही रडू आवरत नव्हतं. ‘पण मला जायचंय ना क्रिकेटला याच वर्षी. तो हेरंब जाणार. नवीन बॅट घेऊन. मी का नाही जाणार? मी का नाही शिकायचं क्रिकेट? पुढच्या वर्षी नको. आत्ताच जाऊ दे ना गं.. प्लीज ना आई.’ धाय मोकलून रडत होतो मी.

आईने जवळ घेतलं. ‘हो रे बाळा. सगळं पटतंय रे मला. पण आत्ता आपल्याला परवडणार नाही हे सगळं.’ आई म्हणाली. काहीही विचार न करता मी जोरात ओरडलो, ‘आपल्याला कधीच का नाही काही परवडत?’ आणि मान वळवून बसून राहिलो. आईसुद्धा काहीच बोलली नाही. उठून आत निघून गेली. नंतर माझ्या लक्षात आलं की मी खूप चुकीचं बोललो. तिला वाईट वाटलं असणार, नक्कीच. तिला सॉरी म्हणायची हिंमत नव्हती, आणि क्रिकेट नाही खेळता येणार याचं वाईटही वाटत होतं. काय करावं कळेना. अख्खी रात्र गच्चीत काढली.

दुसऱ्या दिवशी डोळे चोळत घरात गेलो तर आईने लगेच माझ्यासमोर दुधाचा कप ठेवला. ‘आवर पटकन, चल’, ती म्हणाली. ती आवरून तयार होती. कुठे चाललोय काय माहीत. रिक्षेत बसवून ती मला टिळक रोडवरच्या शक्ती स्पोर्ट्समध्ये घेऊन आली. पहिल्या मजल्यावरच्या बॅट सेक्शनमध्ये आम्ही गेलो. माझे डोळेच मोठे झाले एकदम. साधारणपणे हजार-दोन हजार बॅट असतील. एमआरएफ, आरएनएस, सीजी, इंग्लिश विलो, काश्मीर विलो. एक एक बॅट हातात घेऊन पाहत होतो. फिरवून बघत होतो. ‘आई? आपण घेणार आहोत? खरंच? नक्की?’ मी आईला विचारत सुटलो. ‘तुला हवं ते घे’, तिनं सांगितलं. मी इतका खूश आधी कधीच झालो नव्हतो. ती सगळी स्वप्नं मला परत दिसायला लागली. आईने फक्त बॅट नाही तर अख्खा युनिफॉर्म मला घेऊन दिला. माझी नेहरू स्टेडियमची फीसुद्धा भरून टाकली. माझ्या आयुष्यातला सगळ्यात चांगला दिवस. सगळं माझ्या मनासारखं होत होतं. सगळं. घरी आल्यावर मी आईला परत चहा करून दिला. तिच्या जवळ गेलो आणि म्हणालो, ‘आई, कालसाठी सॉरी. मी परत नाही असं बोलणार कधीच. खरंच सॉरी.’

‘मीपण सॉरी. मी परत तुला कशालाच ‘नाही’ म्हणणार नाही’, ती एवढंच बोलून बघत राहिली माझ्याकडे. कौतुकाने, आनंदाने. माझ्या कालच्या बोलण्याचं तिला अजूनही वाईट वाटतंय हे मला जाणवत होतं. तिचे डोळे भरून आले होते. परवडत नसतानादेखील तिनं माझ्यासाठी एवढं केलं. कसं केलं? काय केलं? माहीत नाही. पण माझ्या चेहऱ्यावरच्या आनंदासाठी ती काहीही करू शकते हे मला त्या दिवशी कळलं. उन्हाळ्याची ती सुट्टी मला आजही ठळकपणे आठवते; ती केवळ आईमुळे. मी क्रिकेट खूप खेळलो. खूप शिकलो. खूप मजा केली.. आयुष्यभराची! मी अर्थातच क्रिकेटर नाही झालो. पण ते दोन महिने मी माझ्या आईमुळे सचिन तेंडुलकरसारखा वावरू शकलो.
सौजन्य – लोकप्रभा