राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा चर्चेत असतानाच शुक्रवारी नावाजलेल्या मराठी कलाकारांनी सोशल मीडियावर #पुन्हानिवडणूक? या हॅशटॅगने ट्विट केलं. कलाकारांचं हे ट्विट चांगलंच चर्चेत आलं आणि त्यामागच्या कारणाबाबत विविध अंदाज बांधले जाऊ लागले. तर काहींना हे पटलं नसून कलाकारांनी राजकारणात पडू नये असा सल्ला त्यांनी कलाकारांनी दिला. नेटकऱ्यांनी कलाकारांनी सुनावल्यानंतर अभिनेता सिद्धार्थ जाधवने याबाबतचं स्पष्टीकरण दिलं आहे.

”आमची पोस्ट ही कोणत्याही युती, आघाडी किंवा राजकीय पक्षाचं प्रमोशन किंवा खंडन करण्यासाठी नाही. राजकारण म्हटलं की निवडणूक आलीच. हाच निवडणुकीचा ‘धुरळा’ आपलं आयुष्य कसं बदलतो याचा अनुभव आपण घेतो आहोतच. असंच काहीसं आमच्याही बाबतीत झालंय, म्हणून आपल्याशी ते शेअर केलं. त्यामागची आमची ‘भूमिका’ लवकरच कळेल आणि आशा आहे आपल्याला आवडेलसुद्धा. सर्वांच्या भावनांचा आम्हाला नितांत आदर आहे. कुणाचीही कुठल्याही प्रकारची दिशाभूल करण्याचा आमचा हेतू नाही”, असं सिद्धार्थने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन स्पष्ट केलं.

सिद्धार्थ जाधवसोबतच सई ताम्हणकर, अंकुश चौधरी, सोनाली कुलकर्णी या कलाकारांनी सोशल मीडियावर #पुन्हानिवडणूक? हा हॅशटॅग पोस्ट केला होता. यावरून काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी आक्षेप नोंदवला होता. भाजपा आयटी सेलच्या माध्यमातून मुद्दाम कलाकारांच्या मदतीने पुन्हा निवडणूक घेण्यासंदर्भातील हा हॅशटॅग चालवला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

एकीकडून या कलाकारांवर टीकेचा भडीमार होत असला तरी हा हॅशटॅग म्हणजे ‘धुरळा’ नावाच्या आगामी सिनेमाचे प्रमोशन असल्याचे समजते.