अभिनेता रितेश देशमुखने आपल्या दोन मुलांसोबत ट्विटरवर एक फोटो पोस्ट केला. या फोटोला भरभरून लाइक्स व कमेंट्स येऊ लागल्या. या फोटोवर सिद्धार्थ जाधवनेही कमेंट केली. ‘सर सुपर..’ म्हणत सिद्धार्थने रितेशच्या फोटोची स्तुती केली. रितेशचा हा फोटो जेनेलियाने काढला होता. म्हणून आपलं काहीच कौतुक नाही का असा गमतीशीर प्रश्न तिने सिद्धार्थला विचारला.

‘सर सुपर आणि जिने फोटो काढलाय तिच्याबद्दल काही नाही?,’ असं ट्विट जेनेलियाने केलं. वहिनीसाहेब अशा प्रकारे आपल्याला कोंडीत पकडतील याचा अंदाज सिद्धार्थला आलाच नसेल. अखेर सारवासारव करत सिद्धार्थने उत्तर दिलं, ‘सर सुपर वुमन आहेत जेनेलिया मॅम. आऊटस्टँडिंग फोटो काढलाय असं लिहायचं होतं. टायपिंग मिस्टेक.. सुपर क्लिक!’ सिद्धार्थने त्याच्या परीने जरी बाजू सावरण्याचा प्रयत्न केला असला तरी जेनेलियाने त्यावरही मजेशीर उत्तर दिलं. ‘तुम्ही रिअल लाइफमध्ये पण रिव्हर्स किंग आहात.. जमलंय बघा,’ असं जेनेलियाने म्हणताच सिद्धार्थने ‘वहिनीसाहेब’ म्हणत हात जोडले.

सिद्धार्थ व जेनेलियामधील हा गमतीशीर चॅट नेटकऱ्यांनाही भावला. जेनेलियाने मराठीत ट्विट केलं हे पाहून नेटकऱ्यांनीही तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.