News Flash

‘माणूस एक माती !’ विचार बदलायला लावणारा चित्रपट

प्रत्येक माणसाची शेवटी माती होते, हे जरी खरं असलं तरी, जर जिवंतपणीच आयुष्याची माती झाली तर ?

माणूस एक माती !

सध्या मराठी चित्रपटांच्या विषयात आणि आशयात खूप विविधता दिसून येत आहे आणि या चित्रपटांची नावं सुद्धा खूप वैविध्यपूर्ण असून, ‘माणूस एक माती’ हा असाच एक नाविन्यपूर्ण नाव असलेला चित्रपट प्रदर्शित होत आहे. येत्या २४ मार्चला प्रदर्शित होणाऱ्या ‘माणूस एक माती !’ या आगामी चित्रपटाच्या प्रगल्भ नावाप्रमाणे चित्रपटाचा आशय देखील प्रगल्भ आहे. प्रत्येक माणसाची शेवटी माती होते, हे जरी खरं असलं तरी, जर जिवंतपणीच आयुष्याची माती झाली तर ? यावरच हा चित्रपट भाष्य करतो.

‘आई’ या विषयावर बरचं लिहिलं, बोललं आणि ऐकलं गेलं आहे परंतू बाबाचं, न दिसणारं हळुवार मन अत्यंत सुंदरपणे उलगडत नेणारा ‘माणूस एक माती’ हा एक उच्च निर्मिती मूल्य असलेला कौटुंबिक-सामाजिक चित्रपट आहे. कुटुंब व्यवस्था, नाते संबंध यांची महती सांगणारा हा चित्रपट म्हणजे कुटुंबाने एकत्र बसून बघण्यासारखा एक हृदयस्पर्शी अनुभव असेल. शिवाय या चित्रपटाचे नाव आपल्याला बरच काही सांगत असून, २४ मार्चला प्रदर्शित झाल्यावर चित्रपट सुद्धा आपल्याला बरचं काही सांगणार आहे !

‘शिवम एन्टरटेंमेन्ट इंडिया लिमिटेडच्या’ निर्माती शारदा विजयकुमार खरात,  सह निर्माते डॉ विजयकुमार खरात, दिलीप निंबेकर आणि कार्यकारी निर्माते देवा पांडे  हे कायमच आशयघन कलाकृतीला महत्त्व देतात. त्यामुळे ‘माणूस एक माती’ सारख्या प्रगल्भ सामाजिक विषयाला त्यांनी उचलून धरले आणि लेखक-दिग्दर्शक सुरेश झाडे यांनी हा विषय अतिशय कल्पकतेनं मांडला आहे. चित्रपटाची कथा सुरेश झाडे यांची असून पटकथा आणि संवाद सुरेश झाडे आणि राजू सपकाळ या द्वयींची आहे.

उर्जेचा स्त्रोत असलेल्या सिद्धार्थ जाधवचा ‘बाप अभिनय’ आणि चित्रपटातील त्याचा बाप गणेश यादवचाही ‘बाप अभिनय’ म्हणजे प्रेक्षकांना एक पर्वणी असणार आहे. रुचिता जाधव, स्वप्नील राजशेखर, हर्षा गुप्ते, डॉ विलास उजवणे, वरद चव्हाण, किशोर महाबोले व जगन्नाथ निवंगुणे  यांनी सुद्धा चित्रपटात आपापल्या भूमिका सुंदरपणे साकारल्या आहेत.  चित्रपटातील गाणी प्रशांत हेडाऊ यांनी लिहिली असून चित्रपटाला संगीत सुद्धा त्यांनीच दिले आहे. ही श्रवणीय गाणी स्वप्नील बांदोडकर, डॉ नेहा राजपाल, आदर्श शिंदे, बेला शेंडे, शिना अरोरा, पी गणेश  यांनी आपल्या सुरेल आवाजात गायली आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 4, 2017 3:02 pm

Web Title: siddharth jadhav manus ek mati maathi movie releasing on 24 march
Next Stories
1 प्रयोगापूर्वी सागर चौगुलेने घेतले होते अंबाबाईचे दर्शन
2 सेहवाग, गुरमेहरला आरजे नावेदचा अनोखा सल्ला
3 ‘डॉ. रखमाबाई’ चित्रपटाचा टीझर
Just Now!
X