सध्याच्या घडीला मस्त पाऊस पडलाय. चहा आणि कांदा भजीची आठवण साऱ्यांनाच आली असेल, काहींनी ती फस्तही केली असेल. पाऊस म्हटलं की घरातून पाय निघत नाही, पण कलाकारांना मात्र काही केल्या प्रयोगाला पोहोचणं भागच असतं. त्यामुळे या पावसाळ्यातील काही किस्से हे आजही कलाकारांच्या मनात चिरतरुण आहेत, ते विसरणं त्यांना शक्य नाही. कारण हे किस्से आठवल्यावर त्यांना मिळणारी ऊर्जा विलक्षण असते.

‘गेला उडत’ या नाटकाचा असाच एक किस्सा सांगितला तो सिद्धार्थ जाधवने. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये ‘गेला उडत’ नाटकाचा कर्नाटकमधील कागलमध्ये प्रयोग होता. हा प्रयोग कोणत्याही बंदिस्त नाटय़गृहात नव्हता. नाटकाची टीम कागलमध्ये पोहोचली. नाटकाचं नेपथ्य लावून पूर्ण झालं आणि धुवाधार पावसाला सुरुवात झाली. प्रेक्षकांच्या डोक्यावर कसलंही छप्पर नव्हतं. त्यांनी छत्र्या उघडल्या. जवळपास पाच हजार प्रेक्षक होते. पण तिथून कुणीही बाहेर जायला तयार नव्हतं. हा प्रयोग करायचा कसा?, हा सगळ्यांनाच पडलेला प्रश्न होता. सरतेशेवटी रसिक प्रेक्षकांना विचारलं तर त्यांनी प्रयोग व्हायलाच हवा, असं सांगितलं. कोसळणारा तुफान पाऊस, समोर छत्र्यांमध्ये बसलेले प्रेक्षक आपली आतुरतेने वाटत पाहत असल्याचं कळलं आणि अंगात एक वेगळीच ऊर्जा संचारली. आपल्यासाठी हे प्रेक्षक कसलीही तमा न बाळगता बसेलेले पाहिल्यावर त्या दिवशी जो प्रयोग रंगला तो कायम स्मरणात राहील असाच.. असं त्याने सांगितलं.

काही वर्षांपूर्वी जोरदार पाऊस पडत असताना प्रयोगासाठी विचित्र प्रवास केल्याच्या आठवणीही भाऊ कदम आणि सागर कारंडे यांच्या मनात घर करून आहेत. त्यांना या आठवणींना या पावसाच्या निमित्ताने वाट मोकळी करून दिली. ‘यदा कदाचित’ या नाटकात भाऊ काम करत होता. भाऊ राहायला डोंबिवलीला आणि प्रयोग होता तो कल्याणला. पाऊस जोरदार पडत होता. त्यामुळे काहीही झालं तरी आपल्यामुळे प्रयोगाचा खोळंबा व्हायला नको म्हणून भाऊ तीन तासांपूर्वीच घरातून बाहेर पडला. पावसात पाणी भरल्यामुळे गाडीने जाण्यात काहीच अर्थ नव्हता. भाऊने थेट डोंबिवली रेल्वे स्थानक गाठलं. डोंबिवली- कल्याण हे अंतर रेल्वेसाठी दहा मिनिटांचं. पण ठाकुर्लीलाच पोहोचायला भाऊला अर्धा तास लागला. ठाकुर्लीनंतर रेल्वे सुटल्यावर कल्याणच्या दिशेने जात असताना पुन्हा अर्धा तास थांबली. भाऊच्या मनावरचं दडपण वाढत चाललं होतं. प्रयोगाला कसं पोहोचणार?, या चिंतेत असताना भाऊने एक निर्णय घेतला. त्याने थेट रेल्वे ट्रॅकवर उडी घेतली. ट्रॅकमध्ये पाणी भरलेलं होतं. कसाबसा त्यातून मार्ग काढत भाऊने कल्याण रेल्वे स्थानक गाठलं. कल्याण रेल्वे स्थानकाच्या बाहेर पडल्यावर त्यांना एकही रिक्षा दिसत नव्हती. त्यांनी एका टांगेवाल्याला विनंती केली आणि टांग्याने प्रवास करत त्यांनी नाटय़गृह गाठलं. प्रवास कसाही का होईना, पण आपल्यामुळे नाटक वेळेत सुरू झालं, याचा आनंद भाऊला अधिक होता.

सागरचीही अशीच एक आठवण आहे, कितीही पाऊस पडला तरी न पुसणारी अशीच. काही वर्षांपूर्वी सागरच्या एका नाटकाचा प्रयोग कल्याणला दुपारी साडेचार वाजता होता. या प्रयोगाच्या आदल्या रात्री जोरदार पाऊस झाला होता. त्यामुळे माहिमला राहणाऱ्या सागरने सकाळी ९ वाजताच घर सोडलं. मध्य रेल्वे विस्कळीत होती, काही ठिकाणी पाणी भरल्यामुळे बंदही होती. बोरिवलीला नाटकातील काही व्यक्ती होत्या त्यामुळे सागरने बोरिवलीला जाण्याचा निर्णय घेतला. पश्चिम रेल्वेचीही वाहतूक काही ठिकाणी ठप्पच होती. त्यामुळे रेल्वे आणि रिक्षा असाच प्रवास करत सागरने बोरिवली गाठली. तिथून भिवंडीसाठी एसटी पकडण्याचं त्याने ठरवलं. बोरिवली रेल्वे स्थानकाच्या बाहेर पडल्यावर त्याला धक्का बसला. कारण पावसामुळे बोरिवली स्थानकाबाहेर तळं साचलं होतं. पण काहीही करून प्रयोग चुकवायचा नाही, हे सागरने मनाशी पक्कं केलं होतं. त्या पाण्यात सागर उतरला. सुरुवातीला गुडघ्याएवढं, त्यानंतर कंबरेएवढय़ा पाण्यातून सागर एसटी स्थानकात पोहोचला. तिथे गेल्यावर पाहिलं तर तोबा गर्दी होती. कुणाचा कुणाला पायपोस नव्हता. जी एसटी येईल तिच्यामागे लोक धावत होते. काहीच कळायला मार्ग नव्हता.

सैरावैरा पळणारी माणसं आणि मध्येच एसटीचा होणारा शिडकावा, अशा वातावरणात सागर अडकला होता. पण त्यामध्येच एक भिवंडीची एसटी दिसली. सागरने कसलीही तमा न बाळगता धावत ती पकडली. बोरिवलीहून भिवंडी बायपासला तो उतरला. तिथून नाटय़गृहाला जाण्यासाठी रिक्षा केली. काही मिनिटे प्रवास केल्यावर पुन्हा एकदा पाणी साचल्यामुळे रिक्षा सोडावी लागली. नाटय़गृहाजवळ भरपूर पाणी साचलं होतं, त्या पाण्यातून पुन्हा एकदा स्वत:ला सावरत सागरने नाटय़गृह गाठलं. सकाळी ९ वाजता सुरू झालेला त्याचा हा मॅरेथॉन प्रवास दुपारी चार वाजता संपला. पण त्या वेळी नाटकाचे नेपथ्य, कपडे, रंगभूषा, वेशभूषा हे सारं साहित्य भिजलेलं होतं. प्रेक्षकांना सारी परिस्थिती सांगितली. आम्ही नेपथ्य न लावता, वेशभूषा, रंगभूषा न करता नाटक केलं तर चालेल का? अशी विनंती केली. तेव्हाचा प्रेक्षकवर्गही समजूतदार होता. त्यांनी ही विनंती मान्य केली. रंगमंचावर काहीही नसताना आम्ही हा प्रयोग केला, सारं काही वेगळं वाटत होतं. पण प्रयोग केल्याचं समाधान काही औरच होतं, असं सागर म्हणतो.

‘जाऊ बाई जोरात’ या नाटकाचा असाच एक पावसातला किस्सा सांगितला तो निर्माते दिलीप जाधव यांनी. ठाण्यामध्ये दुपारचा प्रयोग होता. पाऊस तुफान पडला होता. त्यामध्ये बरेच कलाकार अडकले होते. प्रयोग हाऊसफुल्ल होता, त्यामुळे तो करणं भाग होतं. काही वेळात बरेच कलाकार आले. पण जो नाटकाची सुरुवात करतो तो कलाकार ट्रॅफिकमध्ये अडकला होता. आता काय करायचं?, हा सर्वासमोर प्रश्न होता. कारण त्याच्यासाठी थांबून आम्हाला चालणार नव्हतं. त्या वेळी नाटकाच्या संचातील एका व्यक्तीला त्याचं काम करण्याची विनंती केली, त्याने ती मान्यही केली आणि आमचा प्रयोग अखेर सुरू झाला. पावसामुळे काही वेळा प्रयोग रद्द करावे लागतात, काही वेळा नाटकाचं साहित्य भिजतं आणि खराब होतं, आर्थिक नुकसान तर होतंच, पण मायबाप रसिकांना दिलेला शब्द पाळण्यासाठी ठरलेला प्रयोग करावाच लागतो. अशा वेळी कष्टपूर्वक पण जिद्दीने रंगलेल्या या प्रयोगांच्या आठवणी दरवर्षी पडणाऱ्या प्रत्येक पावसाबरोबर कलाकारांच्या मनात रिमझिमत राहतात.