अभिनेता सिध्दार्थ मेनन याने नुकताच आपल्या पत्नीचा वाढदिवस जरा हटक्या स्टाइलने साजरा केला आहे. काही महिन्यांपूर्वीच सिध्दार्थचे लग्न पूर्णिमा नायर हिच्याशी झाले. त्यामुळे साहजिकच लग्नानंतरचा पत्नीचा पहिला वाढदिवस तिच्या कायम लक्षात राहावा म्हणून त्याने थेट दुबईच गाठली. सिध्दार्थची पत्नी ही कामानिमित्त दुबईला असते. वाढदिवसा दिवशी सिध्दार्थ खास तिला सरप्राइज द्यावं म्हणून दुबईला गेला. त्याच्या या सरप्राइजबद्दल पूर्णिमाला काहीच माहित नव्हतं. त्यामुळे अचानकमध्ये सिद्धार्थला तिकडे पाहून ती चकीत झाली. नकळत तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले.
सिद्धार्थने हा सरप्राइज व्हिडीओ त्याच्या फेसबूकवर अपलोड केला आहे. या व्हिडीओमध्ये सिध्दार्थ चक्क तिच्या ऑफीसमध्ये जाऊन पोहोचला. यावेळी त्याने पांढऱ्या रंगाचे शर्ट आणि निळ्या रंगाची जिन्स घातली होती. सिध्दार्थने तिला एक सुंदर गुलाबाच्या फुलांचा गुच्छा देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच तुझ्या जीवनातील सगळया इच्छा आकांक्षा पूर्ण होवोत. मी सदैव तुझ्यासोबतच आहे. आय लव्ह यू म्हणत त्याने सोशलमिडीयावर देखील तिला वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या. पत्नीचा वाढदिवस साजरा करण्याची त्याची ही अनोखी पद्धत अनेकांनाच आवडली असणार यात काही शंका नाही.
सिद्धार्थने आपले फिल्मी करिअर सुरु करण्याअगोदर ‘नेव्हर माईंड’ ‘संगीत संशयकल्लोळ’ आणि ‘मानापमान’ या नाटकांमधून रंगभूमीही गाजवली होती. ‘एकुलती एक’ या सिनेमातून सिद्धार्थने मराठी सिनेसृष्टीत दमदार पदार्पण केले. ‘पोपट’, हॅप्पी जर्नी’ राजवाडे अँड सन्स’ ‘पोश्टर गर्ल २’, ‘& जरा हटके’ यांसारख्या अनेक सिनेमातून आपल्याला त्याच्या अभिनयाचे विविध पैलू पाहायला मिळालेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 27, 2016 9:29 pm