अभिनेता अक्षय कुमारने नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुलाखती घेतली आहे. या मुलाखतीमध्ये मोदींनी पहिल्यांदाच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील बऱ्याच छोट्या-मोठ्या गोष्टी उलगडून सांगितल्या आहेत. अक्षय कुमार आणि मोदींच्या या मुलाखतीला चाहत्यांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे. परंतु अक्षयने घेतलेली ही मुलाखत दाक्षिणात्य अभिनेता सिद्धार्थला फारशी भावली नसल्याचे दिसत आहे.

दाक्षिणात्य स्टार सिद्धार्थने अक्षय कुमार आणि मोदींच्या मुलाखतीबाबत एक ट्विट केले आहे. ‘अक्षय कुमार एक चांगला खलनायक आहे, परंतु खलनायक म्हणून त्याला कमी लेखले जाते’ असे त्याने ट्विट केले होते.

सिद्धार्थचे हे ट्विट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे. त्याला या ट्विटमधून नेमकं काय म्हणायचे आहे याचा निष्कर्ष अनेक चाहत्यांनी लावला आहे. अनेक चाहत्यांनी तर ‘याला एखादा चित्रपट द्या’ असे म्हणत सडेतोड उत्तर दिले आहे.

आता सिद्धार्थच्या या ट्विटवर अक्षय कुमार काय प्रत्युतर करतो याची चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत. सध्या अक्षय कुमारचे चाहतेच सिद्धार्थला उत्तर देत आहेत. नुकताच अक्षयचा ‘केसरी’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे. तसेच या चित्रपटामुळे अक्षयचा भूमिकेची प्रशंसा देखील झाली आहे.