करण जोहरच्या ‘स्टुडण्ट ऑफ द इयर’मध्ये वरुण धवन, आलिया भट यांच्या पेक्षाही नवोदित सिद्धार्थ मल्होत्रा जास्त भाव खाऊन गेला. तेव्हापासूनच सिद्धार्थवर बॉलिवूडच्या निर्मात्यांचे आणि दिग्दर्शकांचे विशेष लक्ष होते. आता तर ‘हंसी तो फंसी’ या त्याच्या दुसऱ्या चित्रपटातील एकूणच त्याचा ‘लूक’ आणि त्याची लोकांवर पडणारी छाप पाहता त्याच्याकडे निर्मात्यांच्या रांगा लागल्या आहेत. खुद्द करण जोहरने हॉलिवूडपटाच्या रिमेकसाठी सिद्धार्थची निवड केली आहे.
सिद्धार्थ मल्होत्राची सुरुवात मॉडेलिंगपासून झाली. त्यामुळे त्याचे व्यक्तिमत्व आकर्षक आहे. पण कोणीही गॉडफादर नसताना करण जोहरचा चित्रपट मिळणे आणि त्याला पहिल्या चित्रपटात मिळालेले यश ही त्याची जमेची बाजू ठरली आहे. एकीकडे अनुराग कश्यपने आपण सिद्धार्थच्या अभिनयाने प्रभावित झाल्याचे कबूल केले आहे. तर दुसरीकडे करण जोहरने आपल्या धर्मा प्रॉडक्सन्सतर्फे तयार होणाऱ्या हॉलिवूडपटाच्या रिमेकसाठी सिद्धार्थची निवड केली आहे.  करण जोहरचे धर्मा प्रॉडक्शन्स आणि यू टीव्ही हे एकत्रितरित्या ‘प्राइसलेस’ या हॉलिवूडपटाचा रिमेक करीत आहेत. ऑड्रे टॉट आणि गॅड एल्माले यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाच्या रिमेकमध्ये काम करण्यासाठी बॉलिवूडमधील काही आघाडीचे अभिनेते तयार होते. पण सिद्धार्थच्या ‘हसी तो फसी’मधील अभिनयाने निर्मात्यांना इतके प्रभावित केले की रांगेत असलेल्या कलाकारांची नावे सोडून त्यांनी सिद्धार्थ मल्होत्रावर शिक्कामोर्तब केले. अनुराग कश्यपनेही आपण सिद्धार्थसाठी पटकथा लिहीत असल्याचे जाहीर केले आहे. सध्या बॉलिवूडमध्ये कोणतीही पाश्र्वभूमी नसताना यश मिळविणाऱ्या कलाकारांचा बोलबाला आहे. यात रणवीर सिंग पाठोपाठ सिद्धार्थ मल्होत्राचे नाव आश्वासक अभिनेत्यांच्या यादीत सामील झाले आहे.