दोन वर्षांपूर्वीची गोष्ट. दक्षिणेतील दिग्गज चित्रपट दिग्दर्शक मणिरत्नम यांना हवाई दलातून निवृत्त झालेल्या एका उच्चाधिकाऱ्याने चित्रपटासाठी एक सत्यघटना सुचवली. कारगिल युद्धात पाकिस्तानी हद्दीत मिग कोसळल्याने भारताचा एक जवान युद्धबंदी झाला त्याची ही गोष्ट होती.. आणि त्याच गोष्टीची पुनरावृत्ती त्याच अधिकाऱ्याच्या जीवनात घडत आहे.. आज त्याचाच वीरपुत्र मिग विमान कोसळल्याने शत्रूच्या ताब्यात आहे!

शांततेच्या काळातील सर्वोच्च सेवेबद्दलच्या परम विशिष्ट सेवापदकाने गौरविले गेलेले एअर मार्शल सिंहकुट्टी वर्थमान यांचा पुत्र विंग कमांडर अभिनंदन बुधवारी पाकिस्तानच्या कैदेत जखडला. पहाटे सहा वाजून २० मिनिटांनी पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते मेजर जन. आसिफ गफूर यांनी अभिनंदन याच्या अटकेची बातमी ट्विटद्वारे जाहीर केली आणि देशभर ती वाऱ्यासारखी पसरली.

मणिरत्नम यांच्या ‘कात्रू वेलीयीदाइ’ या तामिळ चित्रपटासाठी सिंहकुट्टी सल्लागार होते. या चित्रपटाची कथा आणि सिंहकुट्टी यांच्या मुलासोबत घडलेली घटना अगदी सारखीच आहे. चित्रपटात भारतीय हवाई दलाचे स्क्वाड्रन लीडर वरुण चक्रपाणी कारगिल युद्धादरम्यान पाकिस्तानच्या कैदेत जखडले जातात. सिंहकुट्टी यांच्या जीवनातील हा योगायोग मनाला चटका लावून जाणारा आहे.

अभिनंदन यांना सुखरुप भारतात आणण्यासाठी केंद्र सरकारचे अथक प्रयत्न सुरू आहेत. अभिनंदन यांना कोणतीही इजा झाली नाही पाहिजे, अशा सक्त शब्दांत केंद्राने इस्लामाबादला सांगितले असून पाकिस्तानी लष्करानेही त्यांच्याशी योग्य वर्तणूक करण्याची हमी दिल्याचे सांगितले जाते.

अभिनंदन विवाहित असून त्याची आई डॉक्टर आहे. आठ वर्षांपूर्वी अभिनंदन आणि त्याचे दोन सहकारी एनडीटीव्हीच्या एका कार्यक्रमात झळकले होते. या दोघांनी लढाऊ विमानांचे पायलट या नात्याने त्यांच्या वाटय़ाला येणाऱ्या आव्हानांबाबत चर्चा केली होती.