अभिनेत्री कंगना रणौतचा ‘सिमरन’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामुळे कंगना बरीच चर्चेत आली आहे. खरंतर कंगना स्वतःच तिच्या चित्रपटांची हिरो असते. त्यामुळे तिच्या चित्रपटातील इतर कलाकारांचा प्रसिद्धी कार्यक्रमांमध्ये फार कमी उल्लेख होतो. पण, कंगनाच्या या चित्रपटात एक हिरो असून, तो तिच्या प्रियकराची भूमिका साकारताना दिसेल. बॉलिवूड जगतात सध्या या अभिनेत्याची फार काही चर्चा नसली तरी तो चित्रपटातील एक महत्त्वाचा भाग आहे.

वाचा : ट्रोलिंग करणाऱ्यांना तापसी म्हणते..

‘सिमरन’मध्ये कंगनाच्या प्रियकराची भूमिका साकारणारा सोहम साहू हा चित्रपटसृष्टीसाठी काही नवीन नाही. याआधी तो ‘तलवार’ आणि ‘शिप ऑफ थीसियस’ या चित्रपटांमध्ये झळकला होता. मेघना गुलजारच्या ‘तलवार’मध्ये त्याने अभिनेता आणि निर्माता अशी दुहेरी भूमिका साकारलेली. क्रिकेट किंवा बॉलिवूड अशी केवळ दोनच क्षेत्र अधिक प्रसिद्ध असलेल्या गांधीनगरमध्ये तो राहतो.
बालपणापासून अभिनेता होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या सोहमच्या वाटेत अनेक अडथळे आले. तो एका सामान्य कुटुंबातून येत असल्यामुळे त्याचा बॉलिवूड प्रवास खडतर होता. पण, एक ना एक दिवस आपल्याला बॉलिवूडचे तिकीट नक्की मिळेल यावर त्याला विश्वास होता. त्यामुळे आयुष्यात स्थिरस्थावर झाल्यानंतर त्याने मुंबईला येण्याचा निर्णय घेतला.

वाचा : ‘या’ अभिनेत्रीमुळे अक्षय कुमार त्रस्त

‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला की, मी आजवर कोणतेही मोठे पुस्तक वाचले नाही किंवा हिंदी आणि इंग्रजी चित्रपटही पाहिले नाहीत. शाहरुख खानचा ‘दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगे’ चित्रपट पाहिल्यावर मला अभिनय क्षेत्राकडे वळण्याची प्रेरणा मिळाली.

२००९मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यापासून सोहमने पाच चित्रपटांमध्ये काम केले. ‘तलवार’ चित्रपटातील त्याचे काम पाहून ‘सिमरन’चे दिग्दर्शक हंसल मेहता यांनी त्याला काम दिले. ‘सिमरन’मधील त्याच्या निवडीबद्दलही रंजक किस्सा आहे. सुरुवातीला त्याला चित्रपटातील भूमिका पसंत न पडल्याने त्याने काम करण्यास नकार दिला होता. हंसल यांना हे कळताच त्यांनी त्याची भेट घेऊन त्याला भूमिकेबद्दल सविस्तर माहिती दिली. त्यानंतर सोहमने चित्रपटात काम करण्यास होकार दिला. त्याने होकार देताच केवळ ५०० रुपये मानधन देऊन त्याच्यासोबत चित्रपटातील भूमिकेसाठी करार करण्यात आला.