‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटातील हस्तमैथुन करतानाचं दृश्य वादाच्या भोवऱ्यात सापडल्यानंतर आता पुन्हा एक वेबसीरिज वादाच्या भोव-यात सापडण्याची शक्यता आहे. चार वेगवेगळ्या कथा घेऊन निर्मिती करण्यात आलेली ‘लस्ट स्टोरीज’ ही वेबसीरिज सध्या वादाच्या भोव-यात सापडण्यास सुरुवात झाली असून या वेबसीरिजवर पहिला आक्षेप गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या कुटुंबियांनी घेतला आहे.
जोया अख्तर, करण जोहर, अनुराग कश्यप आणि दिबाकर बॅनर्जी या दिग्दर्शकांनी चार स्त्रियांच्या कथा या वेब सीरिजमध्ये मांडल्या असून ही वेबसीरिज१५ जून रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली. मात्र, या सीरिजमध्ये वापरण्यात आलेल्या गाण्यामुळे मंगेशकर कुटुंबीय करण जोहरवर चांगलेच संतापले असून लता मंगेशकर यांच्या गाण्याचा या सीरिजमध्ये वापर कसा काय करण्यात आला असा जाबही त्यांनी करणला विचारला आहे.
‘लस्ट स्टोरीज’ या वेबसीरिजमध्ये स्त्रियांच्या इच्छा, अपेक्षा आणि कामुकता याविषयी भाष्य करण्यात आले असून यात राधिका आपटे, कियारा अडवाणी, भूमी पेडणेकर या अभिनेत्रींनी आपल्या अभिनयाची जादू दाखविली आहे. या सीरिजमध्ये स्त्रियांच्या कामुकतेसंदर्भातील एका दृश्याचे चित्रिकरण करत असताना ‘कभी खुशी कभी गम’ या चित्रपटातील टायटल सॉगचा वापर करण्यात आला आहे. कभी खुशी गम या चित्रपटातील हे टायटल सॉंग लता मंगेशकर यांनी गायले आहे. त्यामुळे अशा दृश्यांना लताजींच्या आवाजातील गाण्याचा वापर केल्यामुळे मंगेशकर कुटुंबिय चिडल्याचे सांगण्यात येत आहे.
‘आक्षेपार्ह आणि लज्जास्पद दृश्यांसाठी लता मंगेशकर यांच्या आयकॉनिक गाण्याचा वापर का केलात’? असा प्रश्न मंगेशकर कुटुंबियांनी केला असून ‘कभी खुशी कभी गम’ या चित्रपटासाठी टायटल सॉंगचे रेकॉर्डिंग होत असताना करणच्या चेह-यावर एक वेगळाच आनंद झळकून येत होता. मात्र त्याने या वेबसीरिजसाठी याच गाण्याचा वापर कसा काय केला हे काही समजतं नाही. या दृश्यासाठी तो दुस-या एखाद्या गाण्याचीही निवड करु शकला असता, असं मंगेशकर कुटुंबिय म्हणाले.
मंगेशकर कुटुंबीय पुढे असंही म्हणाले, ‘लता मंगेशकर यांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचेल असं अजिबात वागू नका. या गाण्याच्या वापरामुळे लताजी यांनी आजपर्यंत जे नाव कमावलं आहे ते धुळीस मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दृश्यातून आणि या वेबसीरिजमधून लवकरात लवकर हे गाणं काढून टाकावं’.
दरम्यान, ‘लस्ट स्टोरीज’मध्ये वापरण्यात आलेलं गाणं २००१ मध्ये प्रदर्शित झालेल्या करण जोहर दिग्दर्शित ‘कभी खुशी कभी गम’ या चित्रपटातील असून चित्रपटाची सुरुवात लता मंगेशकर यांनी गायलेल्या गाण्यापासून झाली आहे. तसेच या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन, जया बच्चन, शाहरुख खान, ऋतिक रोशन, काजोल आणि करीना कपूर हे स्टरकास्ट झळकले होते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 23, 2018 10:18 am