बेदरकारपणे गाडी चालवून ऑटोरिक्षाला धडक दिल्याप्रकरणी आणि दोन व्यक्तींना जखमी केल्याप्रकरणी गायक, सूत्रसंचालक आदित्य नारायण चांगलाच अडचणीत सापडला होता. वर्सोवा पोलिसांनी त्याला अटक करुन काही वेळानंतर जामीनावर त्याची सुटकाही करण्यात आली होती. मंगळवारी या सर्व प्रकरणी आदित्यने माफी मागत अपघातात जखमी झालेल्यांचा संपूर्ण वैद्यकीय खर्च उचलण्याची तयारी दाखवली आहे.

‘तो एक दुर्दैवी अपघात होता. जे काही झालं त्याबद्दल मी मानपासून माफी मागतो’, असे आदित्य ‘आयएएनएस’ या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना म्हणाला. आदित्य त्याची मर्सिडिझ बेंझ ही कार चालवत असताना हा अपघात घडला. या अपघातात ऑटोरिक्षा चालक आणि महिला प्रवासीही जखमी झाली होती.

लोखंडवाला सर्कल येथे झालेल्या त्या अपघाताविषयी सांगत आदित्य म्हणाला, ‘मला वाटलं समोरुन येणारा चालक त्याच्या गाडीचा वेग कमी करेल. पण, त्याने तसं काहीच केलं नाही. त्याने आपली गाडी उजवीकडे वळवली. त्याच्या गाडीला माझी धडक लागू नये यासाठी मी कार डावीकडे वळवली आणि तेव्हाच तिथे असणाऱ्या एका ऑटोरिक्षावर जाऊन माझी कार धडकली.’ एकाएकी रस्त्यावर गोंधळाचे वातावरण पाहून त्या ठिकाणी गर्दी होण्यास सुरुवात झाली. पण, कोणीच मदतीसाठी पुढे सरसावले नव्हते. त्यावेळी आदित्यनेच सुरेखा शिवेकर (३२) आणि चालक राजकुमार बाबुराव (६४) यांना कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात दाखल करत त्यांच्यावर उपचार सुरु करण्याची व्यवस्था केली. इतकंच नव्हे तर जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्चही करण्याची जबाबदारी घेत त्याने जखमींची चौकशी करण्यासाठी रुग्णालयात भेटही दिली होती.

वाचा : अठराव्या वर्षीच तिने अंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ‘हा’ अनोखा विक्रम आपल्या नावावर नोंदवला

एक जबाबदार नागरिक म्हणून आदित्यने त्याचं कर्तव्य पार पाडलं आहे. जखमींवर उपचार सुरु असून त्यांचे कुटुंबीयसुद्धा त्यांची काळजी घेत आहेत’, असं आदित्यचे वकिल जुल्फीकर मेमन यांनी स्पष्ट केलं. कलम ३३८ आणि २७९ अंतर्गत आदित्य नारायण विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.