15 November 2019

News Flash

अनुराधा पौडवाल यांनी नांदेडमधली दहा गावे घेतली दत्तक

मराठवाडा दुष्काळमुक्त व्हावा यासाठी हे काम हाती घेतल्याचं त्यांनी सांगितलंय.

अनुराधा पौडवाल

नांदेड जिल्ह्यातील दहा गावांना दत्तक घेत ‘सूर्योदय फाऊंडेशन दुष्काळ विमोचन समिती’च्या माध्यमातून जलसंधारणाची कामे सुरू केल्याची माहिती प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांनी दिली. समाजाने आपल्याला मोठे नाव व प्रतिष्ठा दिली असून ते ऋण फेडण्याची जबाबदारी समजून मराठवाडा दुष्काळमुक्त व्हावा यासाठी हे काम हाती घेतल्याचं त्यांनी सांगितलंय.

अनुराधा पौडवाल म्हणाल्या, ‘मी गत दोन महिन्यांपूर्वी श्रीक्षेत्र माहुर येथे गायनाच्या कार्यक्रमासाठी आले होते. तेव्हा येथील भाविकांनी मातृतीर्थ कुंडातील असलेल्या गाळाविषयी माहिती दिली. मी लगेचच सूर्योदय फाऊंडेशनच्या वतीने गाळ काढण्यास सांगितले. रेणुकामातेच्या आशीर्वादाने या कुंडातील झरे मोकळे झाले असल्याचे सांगत माहुरच्या कुंडासह नांदेड जिल्ह्यतील १० गावांना दत्तक घेतले आहे. यामध्ये लोहा तालुक्यातील वडेपुरी, कलंबर, भिलूनाईक तांडा, कामजळगा वाडी, पोलीस वाडी, पोखरभोसी येथे नाला सरळीकरणाचे कामे सुरू आहेत. हे नाला सरळीकरणाचे काम करत असताना वडेपुरी येथे एक मोठा झरा लागले असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच माळरानावर असलेल्या काही वाडी-तांडय़ांवर ही गावे पाण्याने स्वयंपूर्ण व्हावेत, यासाठी चर खोदण्याचे काम लोकसहभागातून सुरू असल्याचे स्पष्ट केले.’

याबरोबरच कलंबर, दापशेड, कलंबर (खु.), स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ येथे शिवनेरी बंधारे बांधण्याचे काम सुरू असून या जलसंधारणाच्या कामामुळे २० कोटी लीटर पाणी जमिनीत मुरणार असल्याचे त्यांनी सांगितले. या बंधाऱ्यांमुळे पाण्याची पातळी वाढेल, समाजाने आपल्याला दिलेल्या प्रतिष्ठेचे ऋण फेडण्यासाठी ग्रामीण भागातील दुष्काळग्रस्त गावासाठी परिपूर्ण विकासाच्या माध्यमातून मी त्यांचे ऋण फेडण्याचे प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी दुष्काळ विमोचन समितीचे संगमेश्वर नळगिरे, अमोल अंबेकर, अमोल कदम, अच्युत महाजन, इंद्रजित पाटील, ईश्वर पाटील यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

First Published on May 14, 2019 5:35 pm

Web Title: singer anuradha paudwal adapted 10 villages in nanded