अभिनेत्री तनुश्री दत्ताने अभिनेता नाना पाटेकरांवर गैरवर्तणुकीचा आरोप केल्यानंतर कलाविश्वामध्ये या चर्चेला चांगलचं उधाण आलं आहे. कलाविश्वातील अनेक सेलिब्रेटींनी तिची पाठराखण केली आहे. तर तिने या अन्यायाविरोधात आवाज उठविल्यामुळे काही कलाकारांनी तिचं कौतुक केलं आहे. या साऱ्यामध्ये ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनीही त्यांचं मत व्यक्त केलं आहे.

‘महिलांवर गेल्या अनेक काळापासून अन्याय हा होतच आला आहे. पूर्वीच्या काळी महिलांना म्हणावं तसं स्वातंत्र्य नव्हतं. घराबाहेर पडून नोकरी करण्याचं किंवा आपलं विचार मांडण्याचं स्वातंत्र्य नव्हतं. मात्र हळूहळू काळ बदलत गेला. महिला सक्षम होऊ लागल्या. आपले विचार त्या मांडू लागल्या. त्यामुळे आज त्यांच्या व्यक्तिमत्वात बदल होत आहे, त्या प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहेत. मीदेखील अशाच परिस्थितीतून पुढे आले आहे’, असं आशाजी म्हणाला.

पुढे त्या असंही म्हणाल्या, ‘मीदेखील आधी चार भिंतींमध्येच रहात होते. मात्र स्वत:मध्ये बदल केला. मी टीव्ही, रेडिओ जास्त पाहत किंवा ऐकत नाही. त्यामुळे तनुश्री -नाना वादामध्ये नक्की काय झालं मला माहित नाही. पण एक महिला तिच्यावर झालेल्या अन्यायाविषयी जाहीरपणे बोलू लागली आहे ही खरंच चांगली गोष्ट आहे. महिलांनी त्याच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडलीच पाहिजे. जर महिलांनी मौन बाळगलं तर अन्याय करणाऱ्याला सूट मिळत राहिलं’.

दरम्यान, १० वर्षापूर्वी ‘हॉर्न ओके प्लीज’च्या सेटवर नाना पाटेकरांनी गैरवर्तन केल्याचा आरोप तनुश्रीने केला. तिच्या या वक्तव्यानंतर कंगना रणौत, स्वरा भास्कर, ट्विंकल खन्ना, फरहान अख्तरने तनुश्रीला पाठिंबा दिल्याचं पाहायला मिळत आहे.