फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप आदी सोशल मीडियावर प्रतिदिन शेकडो व्हिडीओ क्लिप्स पडत असतात. त्यापकी बहुतांश निर्थकच असतात. गेल्या आठवडय़ापासून यू-टय़ूबवर सतत फिरणाऱ्या एका क्लिपने मात्र कानसेनांमध्ये खळबळ उडवून दिलीये. उणीपुरी तीन मिनिटं आणि सात सेकंदांची ही क्लिप पाहणारा प्रत्येक जण तोंडात बोटं घालतोय. असं काय आहे, या क्लिपमध्ये..
साधारण १५ वर्षांची एक काळीसावळी, स्मार्ट मुलगी मनापासून, सहज गात्ये.. ईश्वर सत्य है, सत्यही शिव है, शिवही सुंदर है.. तो पक्का सूर आणि दाणेदार आवाज ऐकून पहिल्या क्षणापासूनच चकित व्हायला होतं. सत्यम् शिवम् सुंदरम्.. अगदी मूळ गाण्याप्रमाणे प्रत्येक जागा, प्रत्येक आलाप, प्रत्येक तान ती विनासायास घेत्ये. आवाजाची जातकुळी तर थेट लतादीदींशी नातं सांगणारी! रामा अवध में.. हा अंतराही ती तन्मयतेनं म्हणते आणि ही छोटीशी क्लिप संपते. कानांवर आणि डोळ्यांवर विश्वास न बसल्याने ती क्लिप लगेचच पुन्हा पाहिली जाते. पुन्हा तोच गोड अनुभव!
या मुलीचा किमयागार स्वर जेवढा थक्क करतो, त्यापेक्षाही जास्त थक्क व्हायला होतं ते ढोबळ मानाने तिची पाश्र्वभूमी समजल्यानंतर. ही कोणा सुखसंपन्न घरातली, गाण्याच्या शिकवणीला जाणारी मुलगी नाही, तर चक्क घरकाम करणारी आहे. ‘ए मेड हू सिंग्ज लाइक लता मंगेशकर’ असं टाइप केल्यानंतर यू-टय़ूबवर ही क्लिप पाहण्यास मिळते. ‘ही एक घरकाम करणारी मुलगी असून लतादीदींसारखं गाते, तिला कृपया मदत करा’, असं आवाहन त्यासोबत दिसतं. मात्र, तिचा तपशील, नाव, ठावठिकाणा याची काहीच माहिती या क्लिपमधून मिळत नाही, तरीही ती घरकाम करणारीच मुलगी असावी, याची खात्री पटते. तिचा पेहराव खूपच साधा व चेहऱ्यावर अतिशय निरागस भाव आहेत. एका जिन्याखाली बसून ती गात्ये, चेहरेपट्टीवरून ती दाक्षिणात्य असावी, असं वाटतं. मात्र यापलीकडे या अनामिकेचा काहीच थांग लागत नाही.
गाणं चांगल्या प्रकारे गाण्यासाठी आधी ते खूप ऐकावं, असं म्हटलं जातं. ही मुलगी त्याची साक्ष देते. ती उत्तम कानसेन आहे, हे लक्षात येतं. सत्यम् शिवम् सुंदरम् हे गाणं तिने एकलव्याच्या निष्ठेने आत्मसात केल्याचं दिसतं. (लतादीदींची आणखी कोणती गाणी तिला येत असतील, याची उत्सुकता आता चाळवली गेली) कौतुकाची गोष्ट म्हणजे लतादीदींनी एवढय़ा प्रभावीपणे गायलेलं हे कठीण गीत (हा सिनेमा हृदयनाथ मंगेशकर यांना द्यावा, अशी मागणी लतादीदींनी राज कपूर यांच्याकडे केली होती, मात्र आरकेने लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनाच हा सिनेमा दिल्याने या गाण्याच्या ध्वनिमुद्रणाच्या वेळी लतादीदी कमालीच्या संतापल्या होत्या, त्या रागातच केवळ एका टेकमध्ये त्या हे गाणं गायल्या आणि निघून गेल्या..) गायचं धाडस तिनं केलंय. दुसरं म्हणजे, तबला किंवा तानपुऱ्याशिवाय ती गात्ये. केवळ सुराचंच नाही तर तालाचं व पर्यायाने लयीचंही तिला उत्तम भान आहे, हे जाणवतं. खोटच काढायची झाली तर तिच्या आवाजात साखर थोडी कमी आहे, (म्हणून तर लतादीदी ग्रेट) गायकीत गोलाईची उणीव आहे, स्वरांना एक प्रकारचा आकार असावा लागतो, तो तितका दिसत नाही. मात्र योग्य गुरू लाभला तर यात सुधारणा होणं अशक्य नाही. अध्र्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या, एका रात्रीत महागायक-गायिका होणाऱ्या सध्याच्या कलाकारांपेक्षा ही कितीतरी पटीने उजवी आहे, यात अतिशयोक्ती नाही.
लतादीदींना सुरुवातीला अनेक संगीतकारांकडून खूप काही शिकायला मिळालं, अनेक संगीतकारांनी त्यांच्यासाठी उत्तमोत्तम सुरावटी निर्माण केल्या. आता मात्र, संगीतप्रवाह कमालीचे बदलले आहेत. झंडू, फेव्हिकॉल, हलकट जवानी, पव्वा चढा के असे शब्द असलेली व स्वरमाधुर्याचा मागमूस नसलेली गाणी (काहींचा अपवाद) कानांवर आदळतायत. अशा परिस्थितीत या अनामिकेसारख्या गायिका कोणती गाणी गाणार? शिवाय, ती तर अज्ञात प्रांतातच आहे. अंधारातला हा गंधार प्रकाशात आला नाही तर तो फार मोठा अन्याय ठरेल.