शास्त्रीय संगीत, अन्य सुश्राव्य गायन-वादन मैफल किंवा गाण्यांच्या अन्य कार्यक्रमांना ‘रात्री दहा’च्या वेळेचा बडगा पोलीस यंत्रणेकडून दाखवला जातो. पण त्याच वेळी कानठळ्या बसवणारा आणि छातीत धडकी भरवणारा ‘डीजे’, रस्त्यावरून जाणाऱ्या मिरवणुका, वरात, आवाजी फटाके फोडणे व अन्य गोंगाटाबाबत मात्र पोलीस यंत्रणा सौम्य धोरण स्वीकारते किंवा दुर्लक्ष करते. दक्ष नागरिकांकडून तक्रार केल्यानंतरच ते थांबविण्याची कार्यवाही केली जाते. प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांनी अलीकडेच समाजमाध्यमांद्वारे याविषयी आपली जाहीर भूमिका मांडली होती. त्यानिमित्ताने.. 

गानसरस्वती किशोरीताई आमोणकर यांची मैफल रंगात आलेली.. किशोरीताईंसह रसिक श्रोतेही त्या स्वरवर्षांवात मंत्रमुग्ध झालेले असतात आणि अचानक रसभंग होतो. मैफल ‘आटपावी’ लागते. कारण रात्री दहाची मर्यादा. श्रोते हिरमुसले होऊन परततात. वेळ मर्यादेचा बडगा दाखवून ती मैफल ‘गुंडाळली’ जाते. किशोरीताई हे एक प्रातिनिधिक उदाहरण. वेळेच्या मर्यादेचा आणि त्यामुळे रंगलेली मैफल किंवा गाण्यांचा कार्यक्रम संपवावा लागल्याचा अनुभव किमान एकेकदा तरी अनेक दिग्गज गायकांसह अन्यही छोटय़ा-मोठय़ा गायकांनी नक्कीच घेतला असेल.

तर दुसरीकडे रात्रीचे दहा वाजून गेले आहेत तरीही रस्त्यावरून उत्सवाच्या मिरवणुका किंवा लग्नाची वरात चालली आहे. कुठेतरी लग्नाच्या हळदीचा कार्यक्रम सुरू आहे आणि तिथे कानठळ्या बसतील व छातीत धडकी भरेल अशा आवाजात ‘डीजे’ वाजतोय. शांततेचा भंग करणारे फटाके वाजविण्यात येत आहेत. येथे मात्र वेळेची मर्यादा नाही. अनेकदा स्थानिक ‘बडय़ा’ धेंडांकडून हे सर्व बिनदिक्कत सुरू असते. कोणी दक्ष नागरिकाने पोलीस ठाण्यात तक्रार केली तर ‘आमच्याकडे पुरेसा स्टाफ नाही, आमची माणसे आम्ही पाठवतो, थोडय़ा वेळात होईल बंद’ अशी उत्तरे मिळतात. हा अनुभवही आपल्यापैकी प्रत्येकाला आला असेल.

शास्त्रीय संगीत व गाण्याचे कार्यक्रम यांना एक न्याय आणि मिरवणुका, वरात व फटाके फोडणाऱ्यांना दुसरा न्याय असे चित्र सगळीकडेच दिसून येत आहे. याच दुजाभावाबाबत प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांनी अलीकडेच समाजमाध्यमांवर आपल्या मनातील हा ‘राग’ जाहीरपणे व्यक्त केला. पोलिसांकडून संगीत मैफलींना मिळणाऱ्या दुटप्पी भूमिकेबाबत ‘फेसबुक’वर नाराजी व्यक्त केली होती. ‘वराती आणि मिरवणुकीतील डिस्को म्युझिक, डीजेचा धांगडिधगा आम्ही उशिरापर्यंत सहन करायचा. शास्त्रीय संगीताची मैफल मात्र रात्री दहाच्या जरा  पुढे गेली की सर्वोच्च न्यायालयाचा हवाला देत स्थानिक पोलीस लगेच हजर होतात. असे का?’, अशा शब्दांत राहुल देशपांडे यांनी आपला निषेध व्यक्त केला होता. ‘फेसबुक’वर राहुल देशपांडे यांच्या या पोस्टला जोरदार ‘लाइक्स’ मिळाल्या. सर्वानीच या भूमिकेशी सहमती दर्शविली. अनेकांनी ती पोस्ट शेअरही केली.

राहुल देशपांडे यांच्या या पोस्टमुळे हा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या आधीही काही गायक कलाकारांनी या विषयाबाबत        आपली नाराजी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे व्यक्त केली होती. मात्र तरीही यात कोणतीही सुधारणा किंवा फरक पडलेला नाही. कला आणि संस्कृती या फक्त भाषणातून बोलायच्या गोष्टी आहेत. प्रत्यक्षात कलेसाठी काहीही करायचे नसते किंवा कधी कधी काहीतरी केल्यासारखे दाखवायचे असते अशी निगरगट्ट मनोवृत्ती सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, राजकारणी आणि शासकीय यंत्रणांची झालेली आहे. कोणतेही तारतम्य न बाळगता शास्त्रीय संगीत व गाण्याच्या अन्य कार्यक्रमांना वेळेचा व कायद्याचा बडगा दाखविणारी पोलीस यंत्रणा मिरवणुका, वरात यातील धांगडधिंगा आणि फटाके वाजवण्याच्या बाबतीत अशी चपळता आणि कार्यक्षमता का दाखवत नाही, हा कलाकारांप्रमाणेच सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न आहे.

अपवाद वगळता पाश्चात्त्य संगीताच्या ‘ठणाणा’ कार्यक्रमांनाही वेळेच्या बंधनातून सवलत दिल्याची काही उदाहरणे आहेत, तशी काही उदाहरणे अर्थात अपवादात्मक स्वरूपात शास्त्रीय संगीत मैफल किंवा गाण्यांच्या कार्यक्रमांच्या बाबतीत असतीलही. पण हे सगळ्याच शास्त्रीय संगीत मैफली किंवा गाण्यांच्या कार्यक्रमाबाबत घडत नाही. शास्त्रीय संगीत महोत्सव किंवा अभिजात संगीताच्या मैफली करणाऱ्या अनेक संस्था आज  महाराष्ट्रात आहेत. वर्षांनुवर्षे या संस्था शास्त्रीय संगीत प्रसारासाठी आणि शास्त्रीय संगीताचा आनंद रसिकांना मिळवून देण्यासाठी काम करत आहेत. या संस्थांकडून अशा मैफली किंवा कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. पण त्यांना तसेच सुगम संगीत, भावसंगीत किंवा चित्रपट संगीतविषयक कार्यक्रम आयोजित करणाऱ्या आयोजकांनाही वेळेच्या मर्यादेचा बडगा सहन करावा लागत आहे. या मंडळींनी वेळोवेळी आपले म्हणणे शासनापर्यंत आणि संबंधित यंत्रणांपर्यंत पोहोचवलेही आहे. पण ‘कुंभकर्णी’ शासन आणि यंत्रणांनी त्याची दखल घेतलेली नाही. दखल घेतली असे दाखविले जाते, काही वेळेस स्थानिक पातळीवर अशा मैफली किंवा संगीत कार्यक्रमांबाबत ‘उदारता’ही दाखविली जाते. पण ते तात्पुरते असते.

खरे तर याबाबत स्पष्ट आणि ठोस धोरण आखण्याची व त्यानुसार अंमलबजावणी करण्याची गरज आहे. शास्त्रीय संगीत मैफली, संगीतविषयक कार्यक्रम आयोजित करणाऱ्या संस्था, शास्त्रीय संगीताचे जतन आणि संवर्धनासाठी त्यांनी दिलेले योगदान, अशा मैफलीतून सहभागी होणारे मान्यवर आणि ज्येष्ठ गायक कलाकार यांचे योगदान या सगळ्याचा वेळेच्या मर्यादेचा बडगा उगारताना विचार झाला पाहिजे. पोलिसांनी त्याचे भान ठेवावे आणि तारतम्य बाळगावे, अशी कलाकार आणि सर्वसामान्य रसिक व आयोजकांची अपेक्षा आहे. तर दहाची वेळमर्यादा शास्त्रीय संगीत कलाकारांनी पाळली पाहिजे हे योग्यच आहे. मात्र मग त्याचबरोबर रात्री दहानंतर रस्त्यावरून धांगडधिंगा व डीजेच्या कानठळ्या बसविणाऱ्या आवाजातील मिरवणुका, वराती, फटाके फोडणे यालाही कठोरपणे कायद्याचा चाप लावलाच पाहिजे, अशी अपेक्षा कलाकारांकडून व्यक्त होते आहे.

ravi10‘किमान एक तासाची  मुदत वाढवून मिळावी’

वेळेच्या मर्यादेमुळे मैफल आटोपती घ्यावी लागल्याचा अनुभव मीही घेतला आहे. त्यामुळे कलाकार आणि रसिक श्रोते दोघांचाही विरस होतो. अभिजात शास्त्रीय संगीताच्या मैफलींसाठी दहाच्या वेळेची मर्यादा शिथिल करण्यात यावी. अशा मैफलींसाठी किमान एक तासाची वेळ  वाढवून देण्याबाबत विचार व्हावा. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कार्यक्रम आयोजक, प्रेक्षक, सहभागी गायक कलाकार, कार्यक्रमातून भाषण करणारे वक्ते या सर्वानीच वेळेचे भान आणि तारतम्य बाळगावे. संगीत महोत्सव किंवा अशा प्रकारच्या शास्त्रीय संगीत मैफलीत काही वेळेस चार ते पाच कलाकार सहभागी झालेले असतात. कलाकार जास्त संख्येत असतील तर जो गायक मैफलीची सांगता करणार असेल त्याला साहजिकच कमी वेळ मिळतो. त्यामुळे ती संख्या मर्यादित ठेवता येईल का, त्याचाही विचार व्हावा.
पंडित डॉ. अजय पोहनकर

‘न्यायव्यवस्थेची बंधने कलाकारांबरोबर इतरांनी पाळायलाच हवीत’
ravi11शास्त्रीय संगीताचे सादरीकरण हे निवांतपणे आणि कोणत्याही बंधनाशिवायच सादर करायचे असते. वेळेचे बंधन हे कलाकार आणि श्रोते या दोघांसाठीही विरस करणारे आहे, मात्र असे असले तरी सामाजिक व्यवस्था आणि न्यायव्यवस्थेने जी बंधने घालून दिली आहेत ती पाळली जावीतच. रात्री दहानंतर संगीत मैफली नकोत तसेच रस्त्यावरच्या वाहनांचे भोंगेसुद्धा वाजता कामा नयेत किंवा अन्य स्वरूपाचा कोणताही गोंगाट, धांगडधिंगा होऊ नये. शास्त्रीय संगीताच्या मैफिली या बंदिस्त सभागृहात घेण्यात आल्या तर मग त्याला वेळेचे बंधन राहणार नाही. त्या दृष्टीनेही विचार करून पाहायला हवे. 
आरती अंकलीकर टिकेकर

‘अभिजात शास्त्रीय संगीत मैफिलीसाठी तरी वेळेचे बंधन नको’
  ravi12‘शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठान’तर्फे गेली ७५ वर्षे औंध येथे संगीत महोत्सवाचे आयोजन आम्ही करतो आहोत. औंधसारख्या मुंबईपासून दूर असलेल्या भागातील आणि परिसरातील रसिक श्रोत्यांसाठी हा महोत्सव नि:शुल्क भरवण्यात येतो. त्यामुळे अशा कार्यक्रमांचे महत्व रसिकांच्या दृष्टीने औरच असतो. पण वेळेच्या बंधनामुळे कलाकार आणि रसिक श्रोते दोघांचाही रसभंग होतो ही गोष्ट खरी आहे. त्यामुळे अभिजात शास्त्रीय संगीत मैफिलीसाठी तरी वेळेच्या मर्यादेचे बंधन नसावे, असे वाटते. यावर सारासार विचार व्हायला हवा.

अपूर्वा गोखले, सहसचिव-शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठान