प्रसिद्ध दाक्षिणात्य पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांना करोनाची लागण झाली आहे. बालसुब्रमण्यम यांनी फेसबुकवर व्हिडीओ पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली. करोनाची सौम्य लक्षणं जाणवत असल्याचं त्यांनी या व्हिडीओत सांगितलं. त्यासोबत त्यांच्या आरोग्याविषयी चिंता न करण्याचं आवाहन त्यांनी चाहत्यांना केलं.

“गेल्या दोन-तीन दिवसांपासून माझी तब्येत बरी नाहीये. सर्दी आणि ताप होता. त्यामुळे मी करोना चाचणी करून घेतली. तेव्हा रिपोर्ट करोना पॉझिटिव्ह आला. डॉक्टरांनी मला घरीच क्वारंटाइनमध्ये राहण्याचा सल्ला दिला”, असं त्यांनी या व्हिडीओत सांगितलं.

घरी क्वारंटाइनमध्ये राहिल्यास कुटुंबीय अधिक चिंतेत राहतील म्हणून बालसुब्रमण्यम यांनी स्वत:ला रुग्णालयात दाखल करून घेतलं. रुग्णालयात त्यांच्यावर योग्य ते उपचार सुरू असून येत्या दोन-तीन दिवसांत डिस्चार्ज देण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. या व्हिडीओत बालसुब्रमण्यम यांनी त्यांच्या मित्रांना कॉल न करण्याची विनंती केली.

एस. पी. बालसुब्रमण्यम यांना आवाजाचा जादूगार म्हटलं जातं. त्यांनी जवळपास ४०,००० गाण्यांना आपला आवाज दिला आहे.