मराठी संगीत रंगभूमीच्या सुवर्णकाळातील एक मानाचं पान असलेलं अजरामर संगीत नाटक म्हणजे कट्यार काळजात घुसली. पुरुषोत्तम दारव्हेकर यांच्या लेखणीतून उतरलेलं आणि पं. जितेंद्र अभिषेकींच्या बहारदार संगीताने सजलेलं हे नाटक रंगभूमीवर आलं आणि त्याने एक नवा इतिहास रचला. कला मोठी की कलाकार ? गायकी महत्त्वाची की घराणं ? या दोन प्रश्नांवर या नाटकाची पूर्ण गोष्ट आधारली आहे. हे नाटक जेंव्हा रंगभूमीवर आलं होतं त्या काळात देशात अनेक मोठमोठी संगीत घराणी आपल्या गायकीद्वारे संगीताची सेवा करीत होते. पण या सेवेसोबतच या घराण्यांमध्ये स्वतःचं वेगळेपण आणि श्रेष्ठत्व सिद्ध करण्याची स्पर्धाही रंगत होती. अमूक एक राग, बंदीश किंवा ठुमरी जी आपण गाऊ शकतो तशी इतर कुणाला गाता येणे शक्य नाही त्यामुळे आपली गायकी आणि आपलंच घऱाणं हे इतरांपेक्षा श्रेष्ठ असं या स्पर्धेचं स्वरूप होतं. याच कथासुत्रातून कट्यार.. ची निर्मिती झाली. कट्यार काळजात घुसलीमध्ये पंडित भानूशंकर, खॉंसाहेब आफताब हुसैन आणि सदाशिव गुरव ही तीन मुख्य पात्रे. यात खॉंसाहेबांची भूमिका साकारली होती ती पंडित वसंतराव देशपांडे यांनी तर भानूशंकरजीच्या भूमिकेत होते ज्येष्ठ गायक अभिनेते पं. भार्गवराम आचरेकर. एवढ्या वर्षांनंतरही या नाटकाची लोकप्रियता कमी झालेली नाही. आजही रंगभूमीवर अनेकांचे वेगवेगळ्या संचासह या नाटकाचे प्रयोग चालू आहेत. हेच नाटक आता भव्य रूपात प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे चित्रपटाच्या रूपेरी पडद्यावर. एस्सेल व्हिजन आणि श्री गणेश मार्केटिंग अॅंड फिल्मस् यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे अभिनेता सुबोध भावेने. यानिमित्ताने सुबोध दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहे हे विशेष. यासोबत या चित्रपटात आणखी एका कलावंताचं रूपेरी पडद्यावर पदार्पण होणार आहे. आजवर आपल्या गायनाने आणि बहारदार संगीताने भारतातच नव्हे तर जगभरातील श्रोत्यांना वेड लावणारा गायक शंकर महादेवन याचं. यानिमित्ताने शंकर महादेवन प्रथमच अभिनय करताना दिसणार असून तो पंडित भानूशंकर शास्त्री ही व्यक्तिरेखा साकारणार आहेत. या चित्रपटातील त्याचं हे नवं रूप सादर करणारा शानदार सोहळा मुंबईत शुक्रवारी पार पडला. यावेळी शंकर महादेवनसोबत दिग्दर्शक सुबोध भावे, निर्माते सुनिल फडतरे, एस्सेल व्हिजनचे संस्थापक नितीन केणी आणि बिझनेस हेड निखिल साने आदी मान्यवर उपस्थित होते. याशिवाय शंकर महादेवनच्या या नव्या कारकिर्दीला शुभेच्छा देण्यासाठी सुप्रसिद्ध तालवादक तौफिक कुरेशी आणि शंकर महादेवन यांचे कुटुंबियही उपस्थित होते.
याप्रसंगी शंकर महादेवन म्हणाला की, “संगीत कट्यार काळजात घुसली हे नाटक सर्वार्थाने अजरामर आहे. याची कथा ही आजच्या काळातही लागू होते. अभिषेकीबुवांच्या अजरामर संगीताने सजलेल्या नाटकावर आधारित या चित्रपटात मी अभिनयाद्वारे प्रेक्षकांसमोर येतोय ही माझ्यासाठी खरंच भाग्याची गोष्ट आहे. पंडितजींची ही अजरामर भूमिका साकारणं खूप अवघड आणि आव्हानात्मक काम होतं. यासाठी मी स्वतःला पूर्णपणे दिग्दर्शक सुबोध भावेच्या स्वाधीन केलं आणि त्यानेही अतिशय योग्य पद्धतीने ही भूमिका आणि त्यातील बारकावे समजावून सांगितले ज्याचा मला खूप फायदा झाला. अभिनयासोबतच चित्रपटाच्या डबिंगसाठीही तेवढीच मेहनत घेतली. या चित्रपटासाठी गणेशाच्या वंदनेचं ‘सूर निरागस हो’ हे एक नवीन गाणं  तयार करण्यात आलं. मला वाटतं हेच या चित्रपटाचं सार आहे. पावित्रपणा हा संगीताचा आत्मा असतो आणि तोच जपण्याची भावना या ‘सूर निरागस हो’ मधून आणि चित्रपटातूनही व्यक्त करण्यात आली आहे.” या चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रापत पदार्पण करणारे सुबोध भावे आपल्या या वेगळ्या अनुभवाविषयी म्हणाले की, “शास्त्रीय संगीतावर माझं अपार प्रेम आणि श्रद्धा आहे. मला स्वतःला गाता येत नसलं तरी मी शास्त्रीय संगीताचा निस्सिम चाहता आहे. पंडित जितेंद्र अभिषेकीं यांना मी गुरूस्थानी मानतो आणि हा चित्रपट ही त्यांनाच वाहिलेली छोटीशी आदरांजली आहे असं मी मानतो.”
katyar-kaljat-ghusli
‘कट्यार काळजात घुसली’ ही कथा जेवढी दोन घराण्यातील संघर्षाची आहे तेवढीच गुरू – शिष्याच्या नात्याची सुद्धा आहे. कट्यार.. चा आकर्षणबिंदू आहे ते यातील गाणी. ‘घेई छंद मकरंद’, ‘तेजोनिधी लोह गोल’, ‘सुरत पिया की छिन बिसरायी’ ही आणि अशीच इतर लोकप्रिय गाणी. विविध राग, हरकती आणि आवाजातील नजाकतीने सजलेल्या या गाण्यांना संगीतबद्ध केलं होतं पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी. ही गाणी त्याच चालीवर पण नव्या आवाजात या चित्रपटामधून ऐकायला मिळणार आहेत. याशिवाय यात काही नवीन गाण्यांचाही समावेश आहे. यातील मूळ गाण्यांचं पुनर्ध्वनिमुद्रण आणि ही नवीन गाणी संगीतबद्ध केली आहेत शंकर-एहसान-लॉय या लोकप्रिय संगीतकार त्रयींनी. हिंदीतील अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांना आपल्या संगीताने चार चॉंद लावणारं हे त्रिकूट या निमित्ताने मराठीत पदार्पण करीत आहे हे विशेष. येत्या दिवाळीत १३ नोव्हेंबरला हा संगीताचा सुरेल नजराणा तुमच्या भेटीला येतोय.