आक्षेपार्ह टिवटिव करणाऱ्या गायक अभिजीत भट्टाचार्यला ट्विटरवरुन सस्पेंड केल्यानंतर त्याच्या समर्थनार्थ गायक सोनू निगमने धाव घेतली असून त्याने स्वत:चं ट्विटर अकाऊंट डिलिट करण्याचा निर्णय घेतला आहे.

‘काश्मिरमध्ये दगड फेकणाऱ्यांपासून बचाव करण्यासाठी युवकाचा मानवी ढाल म्हणून उपयोग करण्याऐवजी अरुंधती रॉय यांनाच जीपला बांधायला हवं होतं’, असं वादग्रस्त ट्विट अभिनेते आणि खासदार परेश रावल यांनी केलं होतं. त्यांच्या या ट्विटचं गायक अभिजित भट्टाचार्यने समर्थन केलं. ‘अरुंधती यांना गोळ्या घालायला हव्यात’, असं आणखी एक वादग्रस्त ट्विट त्याने केले होते. त्यानंतरच ट्विटर इंडियाने अभिजीतचं ट्विटर अकाऊंट सस्पेंड केल्याच पाहायला मिळालं.

गायक सोनू निगमला या गोष्टीचा सुगावा लागताच त्याने एकामागोमाग एक बरेच ट्विट करत अभिजीतचं समर्थन केलं. या सर्व प्रकारावर नाराजीचा सूर आळवत त्याने अभिजीतच्या समर्थनार्थ आपलं ट्विटर अकाऊंट डिलीट करण्याचं जाहीर केलं आहे. ‘काय…. खरंच त्यांनी अभिजीतचं अकाऊंट सस्पेंड केलं? का? या परिस्थितीत तर शिवीगाळ, धमकावणारे ट्विट करण्याऱ्या जवळपास ९० % लोकांचं अकाऊंट बंद करायला पाहिजे’, असं ट्विट सोनूने केलं. या ट्विटसोबतच त्याने सलग काही ट्विट करत अभिजीतची पाठराखण केली.

‘मी आज ट्विटरवरील या एकतर्फी व्यवहाराच्या विरोधात ट्विटरवरुन काढता पाय घेत आहे. प्रत्येक समजुतदार आणि देशभक्त व्यक्तीने असंच करायला हवं.’ असं म्हणते अखेर सोनूने ट्विटरवरुन काढता पाय घेतला. त्याच्या या निर्णयाबद्दल आता बऱ्याच चर्चा रंगल्याचं पाहायला मिळत आहे.

sonu sonu-nigam-tweet_650x603_41495603274-1